Kankavali bus driver sent vulgar video to women after booking tickets: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेने बस चालकाला अश्लील व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी या चालकला महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. या पीडित महिलेने खाजगी ट्रॅव्हल्सचं बुकिंग केलं होतं. यावेळी महिलेचा नंबर मिळाल्यानंतर बस चालकाने तिला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर या महिलेने थेट या बस चालकाला चांगलाच चोप दिला. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेमुळे खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असताना महिलांना स्वत:चा नंबर बुकिंगसाठी देणंही धोकादायक ठरू शकतं.
नेमकं काय घडलं होतं?
प्रवासाचं बुकिंग केल्यानंतर एका अनोळखी नंबरवरून या महिलेला एक व्हिडीओ आला. हा व्हिडीओ डाउनलोड करून पाहिला असता तो अश्लील व्हिडीओ असल्याचे या पीडित महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर या महिलेने जाब विचारण्यासाठी त्याच नंबरवर फोन केला असता बस चालकाने मात्र फोन उचलला नाही. काही वेळाने त्याने आणखी एक अश्लील व्हिडीओ तिला पाठवला. त्यानंतर तो बस चालक हे जाणूनबुजून करत असल्याचे लक्षात आले.
या प्रकारानंतर त्या बस चालकाला धडा शिकवण्यासाठी म्हणून ही महिला थेट त्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बुकिंग ऑफिसमध्येच पोहोचली. तिथे हा नंबर कोणाचा आहे याची खातरजमा केली. हा बस चालक तिथे उपस्थित असल्याने महिलेने अखेर त्याला बघताक्षणी मारायला सुरूवात केली. संबंधित प्रकार मंगळवारी घडल्याची माहिती सध्या मिळत आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. तर या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.