इमान अहमद जगातली सगळ्यात लठ्ठ महिला. ५०० किलोंचं वजन आणि वजनामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ती अंथरूणातच खिळली होती. बाहेरच्या जगापासून दूर असं तिचं विश्व होतं. तिच्या जगण्याची आशा घरच्या मंडळीने केव्हाच सोडली होती, पण भारतातले डॉक्टर आणि सुषमा स्वराज यांच्या मदतीने तिला नवे जीवनदान मिळाले. गेल्या दोन महिन्यात तिने जवळपास अर्ध्याधिक वजन कमी केले आहे. गेल्या दोन महिन्यात तिने जवळपास २४२ किलो वजन कमी केले आहे.
काही दिवसांपूर्वी तिच्यावर बेरिआट्रिक सर्जरी करून तिचे वजन ५०० वरून ३८० किलोंवर आणण्यात आले होते. गेल्याच महिन्यात तिच्या पोटाकडच्या भागावर सर्जरी करून त्या भागातले ७५ टक्के वजन घटवण्यात आले होते. इमान हिला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक विकार जडले आहेत. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या तिच्या अनेक आजारांवर नियंत्रण आणण्याचे काम डॉक्टरांना करावे लागत आहे. पण गेल्या दोन महिन्यात योग्य तो प्रतिसाद मिळाल्याने तिचे अर्धे वजन घटवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. लवकरच हे वजन आणखी कमी करण्यात येइल असे डॉक्टर मुज्जफर लकडावाला यांनी सांगितले. त्यांनी तिच्या उपचारांसाठी आतापर्यंत २१ लाख रुपयांची मदत गोळा केली आहे.
इमानला दोन महिन्यांपूर्वीच इजिप्तहून मुंबईला आणण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने उचलून तिला विमानातून खाली हलवण्यात आले होते. तिच्यासाठी सैफी रुग्णालयात खास कक्षही तयार करण्यात आला असून १३ डॉक्टरांचा चमू तिच्यावर उपचार करत आहे. अकराव्या वर्षांपासून अंथरुणाला खिळल्यानंतर दैनंदिन काम करण्यासाठीही तिला आई आणि बहिणीवर अवलंबून राहावे लागे. तिला रोजची स्वच्छता, जेवण झोपलेल्या अवस्थेतच करावे लागते. तिला या महिन्याच्या अखेरपर्यंत इजिप्तला पाठण्यात येइल असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. घरची वारंवार आठवण येत असल्याने ती सारखी चिडचिड करते तसेच इतरांशी बोलणंही बंद करते असेही डॉक्टरांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.