चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे १७००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोना या विषाणूच्या संसर्गाचं केंद्र वुहान असल्यामुळे येथील शाळा, कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच शाळा बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी त्यांना एका अॅपच्या माध्यमातून शिकविले जात आहे. मात्र या विद्यार्थ्यांनी लढविलेल्या एका शक्कलमुळे या होमवर्क अॅपवर बंद होण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं.

अलीबाबा (Alibaba) या कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या डिंग टॉक (Ding Talk) या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरबसल्या शिकविण्यात येत होतं. हे अॅप उत्तम असल्यामुळे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं. मात्र अचानक त्याच्या रेटींगमध्ये घट होत असल्याचं लक्षात आलं. पूर्वी या अॅपचं रेटींग ४.९ होतं. मात्र अचानक या रेटींगमध्ये घसरण होतं ते १.४ वर पोहोचलं. विशेष म्हणजे अचानक या रेटींगमध्ये होण्यामागचं कारण कोणालाच उलगडत नव्हतं. परंतु नंतर लागलेल्या शोधामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांमुळेच या रेटींगमध्ये घट झाल्याचं लक्षात आलं. या लहान मुलांनी अभ्यासापासून सुटका व्हावी यासाठी एक भन्नाट शक्कल लढवल्याचं समोर आलं.

‘लंडन रिव्ह्यु ऑफ बुक्स’च्या अहवालानुसार, अभ्यासापासून सुटका करुन घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी डिंग टॉक अॅपला कमी रेटींग दिले. विद्यार्थ्यांनी या अॅपला चक्क १ स्टार रेटींग दिलं. या अॅपला १ स्टार रेटींग मिळालं तर त्याला प्ले स्टोरवरुन हटविण्यात येईल हे विद्यार्थ्यांना चांगलंच ठावूक होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लागोपाठ या अॅपला कमी रेटींग दिलं, त्यामुळे या रेटींगमध्ये प्रचंड घट झाली.

विद्यार्थ्यांनी केलेल्या या प्रतापानंतर अॅपने चायनीज स्ट्रीमिंग संकेतस्थळ BiliBili वर एक मीम्स आणि कार्टून ट्युन असलेला व्हिडीओ शेअर करत लहान मुलांची माफी मागितली आहे. तसंच आम्हाला १ स्टार रेटींग देऊ नका, असं आवाहनही केलं आहे. हा व्हिडीओ चीनी भाषेतील आहे.

वाचा : Video : अरे देवा! लायसन्स मिळताच पठ्ठ्या गाडी घेऊन गेला अन् ….

लहान मुलाना आवाहन करणाऱ्या या गाण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे – “तुम्हाला अशा सुट्टीची अपेक्षा नव्हती हे आम्हाला माहित आहे. परंतु मुलांनो कृपा करुन आम्हाला १ स्टार रेटींग देऊ नका. आमचं काम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठीच आहे. त्यामुळे आम्ही काहीच करु शकत नाही”. या व्हिडीओला जवळपास १ कोटी ७० लाख व्ह्युज मिळाले आहेत.