भारताची स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टिम NavIC सोबत फोन लाँच करणारा आमचा पहिला ब्रँड असेल, अशी घोषणा शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी केली आहे. जैन यांनी ट्विटरवर या घोषणेसोबतच एक फोटोही शेअर केला. यामध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना Redmi K20 Pro हा स्मार्टफोन देताना दिसत आहेत.
Glorious new chapter for tech in #India!
Proud to announce that upcoming #Redmi phone will be 1st in world to feature @isro‘s #NavIC – Nation’s own satellite navigation system!
Great meeting Dr. K Sivan (Chairman #ISRO) & team to finalize this!#Xiaomi #NavICinXiaomi pic.twitter.com/GcE1EEocmL
— Manu Kumar Jain (@manukumarjain) February 25, 2020
Redmi K20 Pro या फोनमध्ये NavIC सपोर्ट नाहीये. पण, जैन यांनी फोटो शेअर केल्यानंतर ट्विटर युजर्सनी सिवन यांच्या खिशात सॅमसंगचा जुना फ्लॅगशिप फोन दिसतोय याकडे लक्ष वेधलं आणि शाओमीची सिवन यांच्या सॅमसंग फोनला रिप्लेस करण्याची इच्छा असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. फोटोमध्ये सिवन यांच्या शर्टच्या खिशातून एक फोन बाहेर येताना दिसत होता. फोटो झूम केल्यावर ते सॅमसंगचा जुना फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy Note 8 चा वापर करत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जैन यांच्या ट्विटवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. “नवीन NavIC सिस्टिम आणि Redmi K20 Pro चं काय कनेक्शन? सिवन यांनी आता जुना फोन बदलावा आणि नवीन पॉप-अप कॅमेऱ्याचा Redmi K20 वापरावा अशी शाओमीची इच्छा आहे. म्हणून नवीन फोन दिला”, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या.
जानेवारी महिन्यात क्वॉलकॉमने तीन नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 720G, 662 आणि 460 लाँच केले आहेत. त्यासोबत जीपीएसचा ‘मेड इन इंडिया’ पर्याय NavIC चा सपोर्ट देण्यात आला आहे. ही नेव्हिगेशन सिस्टिम इस्रोने डेव्हलप केलीये. अनेक देशांकडे स्वतःची नेव्हिगेशन सिस्टिम आहे. रशियाकडून GLONASS चा वापर केला जातो. तर, युरोपियन युनियन आणि चीन अनुक्रमे Galileo आणि BeiDou सॅटेलाइट सिस्टिम्स (BDS) चा वापर करतात. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत योग्य माहिती देईल, असं इस्रोचं म्हणणं आहे. GPS असताना NavIC ची आवश्यकता काय असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर, 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान अमेरिकेने भारताला पाकिस्तानी लष्कराशी निगडीत GPS डेटा देण्यास नकार दिला होता. तेव्हा पहिल्यांदा भारताला स्वतःच्या नेव्हिगेशन सिस्टिमची आवश्यकता भासली. दोन दशकांनंतर, आता इस्रो क्वॉलकॉम आणि शाओमीसोबत NavIC सिस्टिमबाबत चर्चा सुरू आहे.