आपल्याकडे तोकडे स्कर्ट घालून वावरणं यात फार काही आश्चर्य नाही पण सौदी अरेबिया सारख्या देशात मात्र तोकडे कपडे घालून फिरणं म्हणजे भयंकर गुन्ह्यापेक्षा कमी नाही. पाश्चिमात्य कपडे घातले, हिजाब परिधान केला नाही यासारख्या अनेक कारणांमुळे महिलांना इथे शिक्षा झाल्यात. महिलांना तुरुंगात डांबणं, त्यांना चाकबाचे फटके देणे अशा शिक्षांना अनेकदा त्यांना सामोरे जावे लागते, कित्येक महिलांनी याविषयीचे आपले अनुभव देखील मुक्तपणे मांडले आहेत. पण नियमांचा धाक मोडून एका तरूणीनं हिजाब न घालता तोकड्या स्कर्टमध्ये सौदीच्या रस्त्यावर फिरण्याचे धाडस केलंय.

वाचा : श्रीमंतांकडे चोरी करुन गरिबांचं भलं करणारा ‘रॉबिन हूड’ अखेर पोलिसांच्या ताब्यात

‘खुलूद’ नावाने ती सध्या सौदी अरेबियात प्रसिद्ध झालीय. सौदीच्या राजधानीपासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या एका प्राचीन किल्ल्यावर ती क्रॉप टॉप आणि तोकडे स्कर्ट घालून मुक्तपणे फिरत होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिथे महिलांना उपभोगाची वस्तू यापलीकडे दुसरा कोणताही दर्जा दिला जात नाही तिथे तिचं मुक्त वागणं सौदी पुरुषांना कसं काय रुचेल? तेव्हा या महिलेला पकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सौदीमध्ये हिजाब, आयबा परिधान करण्याची महिलांना सक्ती आहे. हे नियम मोडणाऱ्या महिलेला शिक्षा दिली जाते. पण इथे येणारे परदेशी पर्यटक मात्र ड्रेसकोडबाबतचे हे नियम पाळत नाही. खुलूदचा व्हिडिओवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सौदीमधल्या नैतिक पोलिसांना पत्रही पाठवण्यात आलं असून तिला लवकरात लवकर पकडून चाबकाचे फटके देण्यात यावेत अशी मागणी सौदीमधल्या पुरुषांनी केलीय.

वाचा : ‘ऑन ड्युटी’ माणुसकी दाखवणाऱ्या वाहतूक पोलिसाला सलाम!