News Flash

माणूस काय, गाढव काय..

कच्छच्या रणातील साडेचार हजार जंगली गाढवांच्या कळपात तर सध्या ऋणगौरव समारंभच सुरू असेल.

माणूस काय, गाढव काय..

कच्छच्या रणातील साडेचार हजार जंगली गाढवांच्या कळपात तर सध्या ऋणगौरव समारंभच सुरू असेल. गुजरातमधील या स्वच्छ गाढवांची स्तुती महानायक अमिताभ बच्चन यांनी केली आणि ही गाढवे न्याहाळण्यासाठी माणसांचे कळप कच्छच्या रणरणत्या रणात दुर्बिणी लावून बसू लागली. शिवाय, गुजरातची गाढवे हे आणखी वेगळेपण लाभल्याचेही त्यांना कौतुक असेलच. या गुजरातच्या गाढवांकडे पाहा आणि स्वत: गाढव असण्याचा अभिमान बाळगा, असा संदेश महानायक बच्चन यांनी दिला, तेव्हा या कळपातील अनेक गाढवे आनंदातिरेकाने फुरफुरू लागली होती असे म्हणतात; पण पुढे आपल्या या गौरवाचा राजकीय वापर होणार असे त्यांना त्या दिवशी स्वप्नातही वाटले नसेल. माणूस काय किंवा गाढव काय, प्रसिद्धीचे झोत अंगावर पडू लागले की, त्यांची पावले जमिनीवर ठरत नाहीत, असे म्हणतात. काल तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एका जाहीर सभेत त्यांचे बच्चनकृत गुणगौरवगीत गाऊन दाखविले. अशा तऱ्हेने, गुजरातचे गाढव उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत गाजले. ते साहजिकही होते. या गुजराती गाढवांचा प्रचार करू नका, अशी गळ अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे एके काळचे सदिच्छादूत बच्चनजींना घातली असली, तरी आता त्या सभेतील भाषणामुळे बच्चन यांच्या तीस सेकंदांच्या प्रचारफितीहूनही मोठी प्रसिद्धी आपल्याला लाभणार या समजुतीने गुजरातच्या गाढवांची छाती आणखीनच फुलली असणार.. अगोदरच, गुजरातच्या केवळ नामोच्चारानेदेखील अनेकांच्या जिभांना धार चढते आणि त्या उन्मादी तलवारबाजी करू लागतात. त्यात गुजरातची गाढवे म्हटल्यावर तर रसवंतीला अधिकच बहर येणार हे तर ठरलेलेच! प्राण्यांच्या उद्धाराविना राजकारण मिळमिळीत होत असावे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात अगोदरच हत्तीने बस्तान बसविलेच आहे. इकडे महाराष्ट्रात वाघ-सिंहांचे पंजे आणि जबडय़ात हात घालून कुणी त्यांच्या दातांची मोजणी करीत असतो, तर उत्तर प्रदेशात गुजरातच्या गाढवांचा उद्धार होत असतो. देशातील प्रत्येक राज्यात तर घोडेबाजाराशिवाय राजकारण पूर्णच होत नाही. साप, नाग, उंदीर या प्राण्यांचाही अधूनमधून सुळसुळाट सुरूच असतो. कुठे बैल आणि रेडे-म्हशी झुंजत असतात, तर या गदारोळात आपले काय होणार या चिंतेने गाईंना ग्रासलेले असते. माकडे तर फांदीफांदीवर बसून मजा न्याहाळत असतात आणि कधी कमी पडल्यास डुकरांनाही बोलाविले जाते. त्यांना तर या चिखलात लोळायचा आनंद हवाच असतो. अशा रीतीने राजकारणाच्या मैदानात जमलेले सारे प्राणी जेव्हा माणसाच्या मुखातून आपले गुणगौरव गीत ऐकतात, तेव्हा माणसाविषयीच्या कृतज्ञतेने त्यांचा ऊर भरून येतच असणार..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 3:32 am

Web Title: akhilesh yadav bjp gujarat narendra modi amitabh bachchan
Next Stories
1 सरणापाशी समान सारे..
2 वारा गाई गाणे..
3 माणसाचे काय नि गेंडय़ाचे काय?
Just Now!
X