आजकाल मुले उगाच शिकतात. पालकही तसेच. जास्तीत जास्त शिक्षण, त्यात जास्तीत जास्त गुण, मोठय़ा पदावरची नोकरी वा व्यवसाय हीच प्रतिष्ठा, अशी या दोघांचीही समजूत असते. सध्याच्या युगात ही समजूत कालबाह्य़ होत चालली आहे. याची जाणीव अजूनही समस्त पालक व मुलांच्या वर्गाला झालेली दिसत नाही. नाव, पद, पैसा कमावण्यासाठी नवनवीन क्षेत्रे खुली झाली आहेत. खरे तर या सर्वानी आता या नवीन  वाटा चोखाळायला हव्यात. मुलांना लहानपणापासून बाबा-महाराज बनण्याचे प्रशिक्षण द्यायला हवे. यासाठी फार खर्चही येत नाही! कुणालाही समजणार नाहीत अशा मंत्रांचे जप करायला शिकवायचे, मुलाला जटाधारी बाबा करायचे असेल तर केशकर्तनालयांपासून त्याला दूर ठेवायचे. साधू किंवा बाबा व्हायचे असेल तर विक्षिप्तपणा अंगी भिनवावा लागतो. तसाही तो प्रत्येक व्यक्तीत थोडाफार अंतर्भूत असतोच. त्याला खतपाणी कसे मिळेल, याची व्यवस्था करायची. बाबा आधुनिक युगातील आहेत असे भासवायचे असेल तर  नव्या तंत्रज्ञानाशी त्याची ओळख करून द्यायची. सामान्यांच्या श्रद्धेचे विषय काय व कोणत्या विषयाला स्पर्श केला की लोक भक्तिभावाने डोलू लागतात, याचे बाळकडू मुलाला पाजावे. शिक्षणावरच्या ‘फिजूल’ खर्चापेक्षा हा खर्च केव्हाही परवडणाराच. अशा पद्धतीने एकदा बाबा तयार झाला की एखाद्या नदीकाठच्या मठात त्याला सोडून द्यायचे. पुढच्या पाच वर्षांत या बाबाचे रूपडेच पालटलेले तुम्हा-आम्हा सर्वाना दिसेल. जसे मध्य प्रदेशातील ‘कॉम्प्युटरवाला बाबां’चे पालटले आहे. काँग्रेसच्या सरकारने या कॉम्प्युटरबाबांना नर्मदा, क्षिप्रा व मंदाकिनी नदी न्यासचे अध्यक्षपद दिले आहे. आधीच्या भाजपच्या राजवटीत याच बाबांना नर्मदेच्या बचावासाठी नेमून राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला होता. भाजपवर नाराज असलेल्या बाबांनी मंत्रिपदाचा त्याग केला, काँग्रेसचा प्रचार केला व आता त्यांना अध्यक्षपदाचे बक्षीस मिळाले. वर्तमानातील कथा एवढीच आहे. पण त्यामागील अर्थ समस्त पालकवर्गाने समजून घ्यायचे आहेत. कुठलेही शिक्षण घेऊन मुलाची मंत्रिपदापर्यंतची प्रगती शक्य झाली नसती. मुलाला राजकारणात कार्यकर्ता म्हणून जरी पाठवले असते तरी तो इतका कमी काळात मंत्री होऊ शकला नसता. बिचारा खुर्च्याच उचलत राहिला असता. त्यापेक्षा हा प्रगतीचा शॉर्टकट केव्हाही चांगला. प्राचीन काळी साधू व बाबा झाल्याव भौतिक प्रगतीच्या संधी नसायच्या. सांप्रतकाळी प्रगतीच्या संधींची नवनवी दालने रोज खुली होत आहेत. आजवर बाबांचा पक्ष म्हणून माध्यमे भाजपलाच बोल लावायची. आता काँग्रेसनेही त्यात आघाडी घेतली आहे. एकदा बाबाला  कवेत घेतले की त्याचे भक्तगण आपसूकच पक्षाच्या झेंडय़ाखाली येतात, याची जाणीव देशातील दोन मोठय़ा पक्षांना होणे हे प्रगत लोकशाहीचे लक्षण समजायला हरकत नाही. आता तर अशा साधू, बाबांना हाताळण्यासाठी मध्य प्रदेशात आध्यात्मिक मंत्रालयसुद्धा सुरू झाले आहे. कॉम्प्युटरवाले बाबांची नियुक्ती याच मंत्रालयाने केली. प्रत्येकच बाबाच्या नशिबात मंत्रिपद नाही आले, तरी मंत्र्यांना पायासमोर झुकायला लावण्याची ताकद आज केवळ साधू व बाबांमध्येच आहे. त्यामुळे बाबांच्या या प्रगतीकडे नव्या दृष्टिकोनातून बघणे हेच कालसुसंगत असणार आहे.