सहा महिन्यांपूर्वी ज्या चर्चेला महाराष्ट्रात उधाण आले होते, तीच चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ‘मराठी हृदयसम्राट’ या स्वनामाभिधानालंकृत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या एकखांबी तंबूचे आधारस्तंभ, आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपविरोधी पक्षांच्या आशेचे किरण ठरलेले राजसाहेब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एका नव्या राजनीतीसाठी सज्ज झाले आहेत. राजसाहेबांचे राजकारण ‘अनाकलनीय’ आहे, याबद्दल एव्हाना दुमत राहिलेले नाही. त्यांची एखादी राजकीय खेळी नेमक्या कोणत्या राजकीय पक्षासाठी फायद्याची ठरते, हे कोणासच समजत नाही असे म्हणतात. म्हणजे, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजसाहेब जेव्हा भाजपविरोधी प्रचारासाठी रणांगणात उतरले, तेव्हा त्याचा साहजिक लाभ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांस होईल, असाच जाणकारांचा होरा होता. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील चाणक्य व ‘जाणत्या’ नेत्यांनाही तेव्हा तसेच वाटले होते. त्यांच्याशी सल्लामसलत करूनच राजसाहेब भाजपविरोधात उभे  राहिले, अशीही चर्चा निवडणुकीआधी होत होती. भाजपने तर त्या ‘लाव रे तो व्हिडीयो’चा धसकाच घेतला होता. भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे मातब्बर पक्ष नामशेष होऊन राजसाहेबांच्या पक्षाच्या एकखांबी तंबूचा आसरा घेतील की काय असेही काही मोजक्या विश्लेषकांना वाटू लागले होते. पण राजसाहेबांच्या खेळीने सगळ्यांनाच चकविले. निकालानंतर पुन्हा त्यांच्या ‘अनाकलनीय’ राजकारणाचे नवे विश्लेषण सुरू झाले. राजसाहेबांच्या प्रचार मोहिमांचा फायदा भाजपलाच झाला, असे छातीठोक विश्लेषण करून ‘सत्तामित्रां’च्या सुप्रसिद्ध ‘कुजबुज आघाडी’ने या अनाकलनीय संभ्रमात भर घातली. साहेबांच्या प्रचार सभा हाच आता आपल्या पक्षाच्या भवितव्याचा आधार आहे, या आशेने प्रचाराची सारी भिस्त त्यांच्यावरच सोपवून काहीसे निर्धास्त झालेले काँग्रेसजन तर त्यामुळे निकालानंतर चक्रावूनच गेले. अजूनही राजसाहेबांच्या त्या खेळीचे नेमके विश्लेषण त्यांच्या गोटात सुरूच आहे  अशी चर्चा असतानाच, राजसाहेबांनी आपल्या पुढच्या राजकीय खेळीची चुणूक दाखविली आहे. निवडणूक आयोगाची भेट घेण्याचे  नाममात्र निमित्त करून राजसाहेब दिल्लीत सोनियाजींच्या दारी उभे ठाकतील, असा अंदाजही नसलेले राज्यातील काँग्रेस नेते त्यांच्या या अनपेक्षित खेळीने अधिकच चक्रावून गेले असतील यात शंका नाही. राजसाहेबांच्या पक्षाला आघाडीत दाखल करून घ्यायचे की नाही, अशी द्विधा स्थिती राज्यातील काँग्रेसजनांमध्ये माजलेली असतानाच राजसाहेबांनी थेट सोनियाजींचीच भेट घेतल्याने आघाडीचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद करण्यासाठी सरसावलेले नेते आता त्यांच्यासाठी पायघडय़ा घालण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत, अशी कुजबुज सुरू झाली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजसाहेबांनी बजावलेल्या कामगिरीमुळे मोठा फायदा झाल्याच्या भावनेने आनंदित असलेल्या भाजपच्या गोटात आता पुन्हा नव्या आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या, असेही बोलले जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात, ‘धोबीपछाड’ आणि ‘कात्रजचा घाट’ नावाचे दोन डाव  हिरिरीने खेळले जातात. या दोन्ही डावांत तरबेज मानला जाणारा नेताही असाच, अनाकलनीय आहे, असे म्हणतात. त्याच्या राजकीय कृतीचा अर्थ उमगेपर्यंत अनेकांचा ‘कात्रजचा घाट’ झालेला असतो, असेही म्हणतात. पुण्यातील त्या जाहीर मुलाखतीच्या आगळ्या प्रयोगानंतर राज्यात एका नव्या राजकीय गुरुशिष्य परंपरेचे पुनरुज्जीवन झाले. त्याच परंपरेतील या पहिल्या शिष्याने आपल्या अनाकलनीय राजकारणाची पहिली चुणूक दाखविली होती. आता हा  मातब्बर शिष्य सोनिया भेटीनंतर नेमकी कोणती खेळी खेळणार याचा अंदाजच येत नसल्याने, राजकीय विश्लेषक दिङ्मूढ झाले आहेत. यांच्या खेळीचे विश्लेषण व संभाव्य परिणाम, दोन्ही ‘अनाकलनीय’ असतील, एवढेच सध्या म्हणता येईल. अनाकलनीय राजकारणाच्या परंपरेतील पुढची पिढी आता तयार झाली आहे, एवढे मात्र खरे!