केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे भाजपमधीलच नव्हे, तर राजकारणातीलच दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. असा नेता कोणत्याही राजकीय पक्षात झाला नाही, पुढे होणेही नाही. निवडणुकीचा हंगाम आहे, नुकताच शिमगाही पार पडला आहे. आणि इकडे जेटली व्यथित झाले आहेत. जीभ घसरण्याचे फायदे जेटलींच्या वाटय़ाला कधी आलेलेच नसावेत. तसे नसते, तर, वाचाळवीरांची संख्या भाजपमध्ये मोठी आहे अशी कबुली देण्याऐवजी, त्याबद्दल अभिमान व्यक्त करावा असे त्यांनाही वाटले असते. जीभ घसरल्यास आपण रंगेहाथ पकडले जाणार आणि अलीकडे थेट कॅमेऱ्यांसमोर चित्रण होत असल्याने बचावाचे मार्ग उरणार नाहीत हे माहीत असूनही, बेताल बडबडण्याची हिंमत करणारे राजकीय नेते दुधखुळे असतात अशी समजूतही आता धूसर होत चालली आहे. उलट, बेताल बडबडलेच पाहिजे, तसे केले नाही तर प्रसिद्धी नाही, आणि चर्चाही नाही हेच सिद्ध होत असल्याने बेताल बडबडीच्या स्पर्धेत आपण मागे राहू नये यासाठीच अनेकांचा आटापिटा सुरू असतो, हे जेटली यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यास माहीत नाही यावरच विश्वास ठेवणे अंमळ अवघडच आहे. वाचाळवीरांची सर्वात मोठी फौज आपल्याच पक्षात आहे, याची त्यांना जाणीव आहे. खुद्द पंतप्रधानांनाही हे माहीत आहे. पण वाचाळवीरांच्या सैल जिभांना लगाम घालण्याचे धाडस पक्षसंघटनेने फारसे कधी दाखविलेले नसते. असे का होते हे सामान्य माणसांसाठी गूढ असले तरी राजकीय पक्षांच्या संघटनात्मक स्तरावर ते सरसकट सर्वास ठाऊक असले पाहिजे. केंद्रापासून राज्याराज्यातील मंत्र्यांपर्यंत आणि सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्षांपासून प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्वच नेते कधी ना कधी या जीभ घसरण्याच्या स्पर्धेत उत्साहाने उतरलेले असतात, आणि त्यानंतर काही काळ सर्वाधिक चर्चेतही राहण्याचा आनंदही उपभोगतात, हे आता नवे नाही. वृत्तवाहिन्यांचा सुळसुळाट नव्हता, त्या काळात, ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’ असे बिनदिक्कतपणे बोलून, घसरलेली जीभ सावरणे कोणासही शक्य होत असे. पुढे कॅमेऱ्यासमोर उभे राहून बोलावयाची वेळ आली तरीदेखील, ‘विपर्यासाचा पर्याय’ अजूनही जिवंत आहे. ‘आमच्या जनतेसमोर कधीकधी तसे बोलावेच लागते’ असेही काही नेत्यांना वाटते. रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष याच एका कारणामुळे अनेकदा आपली जीभ बिनदिक्कतपणे घसरू देतात, हे जेटली यांच्या कानावर गेले असावे. प्रदेशाध्यक्षाचे प्रत्येक वाक्य हे पक्षाशी बांधील असते, आणि ‘असे बोलावेच लागते’ या समजुतीवर श्रद्धा असलेले दानवे हे काही एकमेव नेते नसल्याने, त्यांच्या ‘असे बोलण्या’च्या सवयीपुढे केवळ नरमाईचेच धोरण ठेवावे लागते. जीभ घसरणे हा राजकीय नेत्यांचा बहुधा हक्क असतो, आणि जीभ घसरण्याकडे हतबलपणे पाहात राहणे ही जेटलींसारख्या अनेकांची हतबलता असते. उद्या जेटली यांच्या सुरात सूर मिसळून बेताल बडबडीबद्दल व्यथित झाल्याचे आव आणण्याचा सभ्यपणा कदाचित राजकीय नेत्यांमध्ये दिसेलही, पण त्यामुळे या हक्कावर गदा येणे कोणासही कबूल असणार नाही. कोणी व्यथित झाले तरी सैलावलेल्या जिभांना हाड लावता येत नाही.