आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘यंत्रज्ञाना’च्या स्पर्धेत मागे पडलेल्या ‘कोल्हापुरी’ नावाच्या एका अस्ताला चाललेल्या हस्तकलाकारीचे आता ‘सोने’ होऊ  घातले आहे. कोल्हापुरी हे केवळ गावाचे नाव नाही, तर ते ‘मराठीपणा’चे जिवंत ‘विशेषण’ आहे. हे विशेषण मिरविणाऱ्या अनेक गोष्टींची आठवण झाली की जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही ठिकाणी राहणाऱ्या मराठी खवय्याच्या जिभेला पाणी सुटते. चटकदार मिसळ, पांढरा-तांबडा रस्सा, दावणगिरी लोणी डोसा असे अनेक पदार्थ म्हणजे मराठमोळ्या रसवंतीला कोल्हापूरने दिलेला चवदार नजराणाच. दिवसागणिक त्यात भर पडत असते. कुणाला चटपटीत भेळ आठवते तर कुणाला ‘खांडोळी’ची नवी चव भुरळ घालते. कोल्हापूर हे हमखास स्मरणरंजनाचे आगळे स्थान. जो कुणी आयुष्यात एकदा तरी कोल्हापुरात जाऊन येतो, त्याच्या मनात या नगरीच्या आठवणीचा नवा कप्पा तयार होतो आणि कुठूनही गप्पा कोल्हापुरावर आल्या की हा कप्पा अलगद उघडतो. मग आठवणींच्या ‘नादखुळ्या’ सरीत नखशिखान्त चिंब व्हायला होते, आणि कोल्हापुरी संस्कृतीचे एकामागून एक पदर उलगडू लागतात. खास कोल्हापुरी बाजाच्या शब्दसंग्रहाचा ‘खटका’ आणि चटकदार चवीचा झटका आठवत मन शहरभर भटकू लागते. कधी काळी रंगलेल्या मैफिलीचे आठवणीतील सूर कानात घुमू लागतात. ‘जलसा मंदिरा’तील एखाद्या फडात रंगलेल्या ठसकेबाज लावणीच्या केवळ आठवणीवर पावले थिरकू लागली, की आठवते, कोल्हापुरी चप्पल! या चप्पलचा तोरा काही न्याराच असतो. केवळ चामडी धाग्यांच्या घट्ट विणीची आणि पारंपरिक कलात्मक चणीची ही चप्पल पायात सरकवून कुणी मिशीला पीळ भरत पावलं टाकू लागला, की त्याकडे केवळ पाहतानाही कोल्हापूरकराची छाती अभिमानाने फुलून यावी. कोल्हापुरी चप्पल हा कोल्हापूरचा अनमोल ऐवज आहे. तिचा करकरणारा आवाज ही त्या चप्पलची शान आहे, आणि एखाद्या सुंदरीच्या तळव्यावरील नजाकतदार मेंदीलाही लाजविणारी नक्षीदार कलाकुसर असलेला पट्टा हे या चप्पलचे सौंदर्य आहे. चप्पल व्यवसायात तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञान शिरले आणि ही पारंपरिक नजाकत काळवंडली. स्पर्धेच्या जगातून माघार घेऊन दडून बसली. कोल्हापुरी चप्पल पादत्राण उद्योगात पिछाडीवर गेली असली, तरी कोल्हापूरकरांचा तिच्याविषयीचा अभिमान तसूभरही ढळलेला नाही. म्हणूनच, ‘जगात भारी, कोल्हापुरी’ असे मानत नाही, तो कोल्हापूरकर नव्हेच! आता ही ‘कोल्हापुरी’ खरोखरच ‘जगात भारी’ ठरण्यासाठी सरसावली आहे. तिच्या हरवत चाललेल्या सौंदर्याला सोन्याची झळाळी चढणार आहे, कारण कोल्हापुरी चप्पलला खादी मंडळाच्या मदतीने ‘पॅरिस-स्पर्श’ होणार आहे. पॅरिसच्या पादत्राण उद्योगातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरी चप्पल नवा साज घेऊन स्पर्धेच्या जगात उतरण्यास तयार झाली आहे. ‘परिसा’चा स्पर्श झाला, की गंजलेल्या लोखंडाचेही सोने होते म्हणतात. कोल्हापूरच्या हरवत चाललेल्या या कलात्मकतेला तर ‘पॅरिस’चा स्पर्श झाला, की तिचे सोने होणारच, आणि पुन्हा ही कोल्हापुरी, ‘जगात भारी’ ठरणारच!

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Traditional and Kolhapuri style Maharashtrian Recipe Katachi Amti Gives more flavor to puranpolli Note recipe
झणझणीत, कोल्हापुरी स्टाईल ‘कटाची आमटी’; पुरणपोळीला देईल अधिक स्वाद, पाहा सोपी रेसिपी…
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू