04 March 2021

News Flash

शब्द नव्हेत निव्वळ वारा..

‘राष्ट्रवाद’ मान्य नाही, म्हणजे ‘राष्ट्रवाद’ हा शब्द मान्य नाही.

एक कवी म्हणतो, ‘शब्द बापुडे केवळ वारा, अर्थ राहतो मनात सारा’; तर दुसरा त्याहून ज्येष्ठ कवी म्हणतो, ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने.’ आता यापैकी ऐकायचे कुणाचे? म्हणजे शब्द फुकाचा वारा मानायचा, की भरभक्कम धन मानायचे? भारतीय जनता पक्षाचे नेते तरुण विजय यांचे याबाबतचे मत, शब्द म्हणजे भरभक्कम धन असे असावे. शब्द वापरताना त्याचा संदर्भ काय, त्याचा उघड अर्थ काय, त्याचा छुपा अर्थ काय अशा सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. इथे एकदम तरुण विजय यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे कुमाऊँ साहित्य संमेलनातील त्यांचे वक्तव्य. ‘राष्ट्रवाद आपल्याला मान्य नाही’, असे त्यांचे सांगणे. ‘राष्ट्रवाद’ मान्य नाही, म्हणजे ‘राष्ट्रवाद’ हा शब्द मान्य नाही. कारण या पाश्चात्त्य धर्तीच्या शब्दाआडून नाझीवाद, स्टालिनवाद वाकुल्या दाखवतात. म्हणून मग ‘राष्ट्रवाद’ऐवजी आपल्या संस्कृतीतला ‘राष्ट्रधर्म’ हा शब्द योजावा, असे तरुण विजय यांचे म्हणणे. (एका माजी पंतप्रधानांनी आजी पंतप्रधानांना करून दिलेल्या ‘राजधर्मा’च्या आठवणीची आठवण येथे कुणाला आल्यास तो आठवण येणाऱ्यांचा दोष समजावा.) तरुण विजय यांनी त्यांच्या मातृसंस्थेचे मुखपत्र मानले जाणाऱ्या ‘पांचजन्य’चे संपादकपद सांभाळलेले. ‘पांचजन्य’ हा भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धाआधी फुंकलेला शंख. त्यामुळे विजय यांच्या मातृसंस्थेच्या मुखपत्रासाठी या नावाची योजना अगदीच चपखल. शंख करणे आणि पांचजन्य फुंकणे यांतील गुणात्मक फरक आपणा मराठीजनांना तरी नक्कीच कळेल. त्यामुळेच या संदर्भातील तरुण विजय यांचे सांगणे पटण्यासारखे. आता विजय यांच्या मातृसंस्थेतील अनेकांना नाझीवादाविषयी, अ‍ॅडॉल्फ हिटलरविषयी छुपी आत्मीयता वा आकर्षण आहे, हा मुद्दा वेगळा. पण आपली राजकीय मंडळी शब्दांच्या योजनेबाबत किती जाणती, सावध व चोखंदळ आहेत, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. आता ‘सामाजिक एकता’ या शब्दाचेच बघा. शब्द तसा साजिरा, पण अर्थाच्या गाभ्यापासून थोडा दुरावा राखणारा. मग अर्थाच्या गाभ्याला कवटाळून घेणारा जाणारा नवा शब्द आणण्यात आला.. ‘सामाजिक समरसता.’ हा शब्द कसा समतेची सक्ती न करता अवघ्या जनांचे एकत्व साधणारा. शब्दांचे वजन किती भरभक्कम असते, ते या शब्दावरून कळावे. हा शब्द तर तसा जुना झाला. पण सांप्रतकाळी असे किती तरी वजनदार शब्द आपल्या अवतीभवती फेर धरून आहेत. अच्छे दिन, युवराज, पप्पूगिरी, छप्पन इंची छाती, सूटबूट की सरकार, खून की दलाली, सर्जिकल स्टाइक, लक्ष्यभेद, चमचा, नागीण, दादा, साहेब, ताई..  एक ना अनेक. इतक्या मोठय़ा प्रमाणात शब्दांची रास आपल्यासमोर ओतणाऱ्या पुढाऱ्यांप्रति आपण खरे तर कमालीचे कृतज्ञ असायला हवे. बाकी काही नाही तरी आपल्यासारख्या पामरांचा शब्दसंग्रह तरी त्यामुळे वाढतो, याची जाणीव आपल्याला राखायला हवी. शब्द म्हणजे निव्वळ वारा नव्हे, एवढे तरी आपल्याला कळायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:16 am

Web Title: bjp leader tarun vijay statement
Next Stories
1 ‘शकुंतले’चा वनवास संपवा..
2 मुंबईची ‘एलओसी’.?
3 शिक्कामोर्तब!
Just Now!
X