आता अवघडच झालं म्हनायचं हे. म्हंजे दादा – आमचे चंद्रकांतदा पाटील वो.. व्हय, तेच ते महसूलमंत्री आणिक भाजपाचे ज्येष्ठ नेते – म्हनायले की भाजपा म्हंजे काय भजनी मंडळ नाही. तो एक राजकीय पक्ष आहे. म्हणताना मग अन्य पक्षाचे गुणदोष त्याच्यात असणारच की! आता आमची सांगली-कोल्हापूरची मान्सं म्हंजे तशी मोकळीढाकळीच. तुमच्या पुन्या-बॉम्बेसारखं मनात एक आणिक ओठात एक असं काही त्यांच्यात आसत नाही. हे म्हंजे तुमच्या त्या वऱ्हाडाशीच नातं सांगणारं बरं का. आपले ते नितीनदा गडकरीपण बघा. वट्ट असेच. खायचे आणि दाखवायचे दात असं काय भिन्न भिन्न नाही त्यांच्याकडं. त्यांचे सगळे दात खायचेच! तर मुद्दा काय की, चंद्रकांतदा असेच येकदम मोकळेपणाने म्हणून गेले की भाजपा म्हंजे काय भजनी मंडळ नाही. तर आता ह्याच्यात लोकांनी काय हसायचा संबंध आहे का? पण आपले लोकपण असे ना! हल्ली कशालापण हसतात. परवा आमच्या आमितशांनी राम मंदिराचा मुद्दा काडला, तर हे लागले मापं काढायला. आख्खा शनवार बाजार डोक्यावर घेतला हो हसून हसून. आता असं बघा – याला जुमला म्हणतात. तो राजकारण्यांनी सांगायचा असतो. पेप्रातल्या लोकांनी छापायचा असतो आणिक आपण मतदार बंधुभगिनींनी गप ऐकायचा असतो, हेच खरं राज्यशास्त्र आहे. पण हे कुठलं लोकांना समजायला? आतापण हसून हसून विचारायलेत, की मग तुमच्या त्या वाल्याच्या वाल्मीकीचं काय झालं? हे म्हंजे आवघडच झालं म्हनायचं. बाकीच्या पक्षातले वाल्ये निवडून त्यांच्यावर संघसंस्कार करायचे, तर ते काय एका रात्रीत होणारं काम आहे का? त्याला किमान २०२५ साल तर उजाडनारच का नाही? दरम्यानच्या काळात या मान्सांमुळं पक्षाचं काय तरी इस्कुट होणारच का नाही? शेवटी ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, तर वाण नाही पण गुण तरी लागणारच की नाही? मग चंद्रकांतदा काय दुसरं बोलले? ते दुसऱ्या भाषेत हेच म्हणाले की – की आम्हाला काय गुंडांचे ‘माजी गुंड’ नाही करता आले. अखेर निसर्गनियमच असाच आहे की – की कमळाच्या पानाआड चिखल असणारच. त्या नाइलाजाला इलाजच नाही. सत्ता हस्तगत करायची तर हे करावंच लागतं ल्येका. सत्तेत वर मोदीसायेब असले म्हंजे झालं. मतदारांना तेवढं मायंदाळ झालं. मग खाली सत्ता राबविणारे वाल्ये आहेत का माजी गुंड हे कशाला कोण तपासायला जातंय? आमची इच्छा अशी, की जाऊच नये त्यांनी. पण काही लोक असे उंडगे, की लगेच लागले विचारायला की कृष्णेकाठच्या पूर्वीच्या कुंडलचं काय झालं? पार्टी विथ डिफरन्सचं काय झालं? साधं सोपं राज्यशास्त्र आहे हे, की तोसुद्धा एक जुमलाच होता. आणि तसंपण कोणा सज्जनानं म्हणूनच ठेवलंय की, की भाजपा म्हणजे काय, तर काँग्रेस अधिक गोमाता! बाकी काय फरक नाहीच. आता याच्यात हसण्यासारखं, टीका करण्यासारखं आहे का काही? चंद्रकांतदा मोकळेपणानं हेच तर सांगायलेत. त्याच्यावर फिदीफिदी करण्याऐवजी सबंध महाराष्ट्राने त्यांचा सत्कारच करायला हवा, की या मंत्रिमंडळात असे एक मंत्री आहेत, की जे जनतेस राज्यशास्त्र शिकवताहेत, की सत्तेसाठी एकदा लाज सोडून नाचावयास लागल्यानंतर नैतिकतेचं घुंगरू तुटणारच की! म्हणताना मग- भाजपाच्याही पायातलं घुंगरू तुटलं तर त्यात काय हसायचं?