शाळा भरली आणि पाहुण्यांच्या आगमनाकडे मुलांचे डोळे लागले. गुरुजी अस्वस्थपणे दरवाजातून बाहेर पाहू लागले. खुद्द शिक्षणमंत्रीच मुलांना अध्ययन निष्पत्तीवर मार्गदर्शन करणार होते. त्यांना संवाद साधायला आवडते, हे गुरुजींना माहीत होते. गुरुजींनी खूण केली आणि मुलांनी मंत्रिमहोदयांचे स्वागत केले. अध्ययन क्षमतेच्या प्राथमिक स्तरावर तरी मुले तयार झाली आहेत असे समजून मंत्रिमहोदयांनी संवाद साधण्यास सुरुवात केली. मंत्रिमहोदयांनी लॅपटॉप सुरू केला. समोरच्या पडद्यावर एक लेख उघडला आणि मंत्रिमहोदय तो वाचून दाखवू लागले.. ‘‘शाळेत येताना मुले आपल्याबरोबर खूप काही घेऊन येत असतात. जसे, आपली भाषा, आपले अनुभव आणि जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, इत्यादी.. या अनुभवातून मुले अधिक समृद्ध झालेली असल्याने त्यांच्या अनुभवाचा, भाषिक संपत्तीचा वापर भाषा शिकणे व शिकविणे यांसाठी केला गेला पाहिजे. लिपीबद्ध चिन्ह आणि त्याच्याशी संबंधित स्वर, ध्वनी, हे विद्यार्थ्यांसाठी अमूर्त स्वरूपात असतात, त्यामुळे शिकण्याची सुरुवात अर्थपूर्ण साहित्यातून व्हायला हवी..’’ एवढे बोलून मंत्रिमहोदय थांबले.  मुलांकडे त्यांनी एक नजर टाकली. सारे जण स्तब्ध, शांत होते.. मंत्रिमहोदय विचारात पडले. या मुलांच्या अध्ययनक्षमतेत वाढ व्हावी यासाठी काही केले जाते की नाही, असा प्रश्न विचारावा असेही त्यांच्या मनात आले; पण त्यांनी तो मनातच ठेवला. आता आपण मुलांसमोर बोलत असलो, तरी शिक्षकांसाठी बोलत आहोत, असे मंत्रिमहोदयांना वाटू लागले. ते बोलू लागले. ‘‘मुले आपल्यासमोरील जगाशी संबंधित आपली समज आणि आपले ज्ञान स्वत:च निर्माण करीत असतात. या ज्ञानाची निर्मिती कोणाच्या शिकवण्यातून अथवा कोणाच्या दबावातून होत नसते..’’ पुन्हा मंत्रिमहोदयांनी मान वळवून गुरुजींकडे पाहिले. गुरुजींनी समजूतदारपणे व समजल्याच्या आविर्भावात नम्रपणे मान हलविली आणि आपल्या भाषणाची अपेक्षित निष्पत्ती होत आहे या समाधानाने ते स्वत:वरच खूश झाले. समोर मुले एव्हाना कंटाळली होती. हे सारे मुलांच्या समोर बोलण्याचे कारण काय, असा प्रश्न पडून गुरुजींचा चेहराही कंटाळवाणा झाला होता.  मंत्रिमहोदयांनी ते ओळखले आणि मुलांना उद्देशून ते बोलू लागले. अध्ययन ही पाठय़पुस्तकी प्रक्रिया न राहता, एक योजना व युक्ती असली पाहिजे.. पुन्हा मंत्रिमहोदयांनी मुलांच्या चेहऱ्यांवरून नजर फिरविली.. एकदा घसा खाकरला. ‘‘म्हणूनच, आम्ही अध्ययन निष्पत्तीची पत्रके घरोघरी वाटली आहेत. त्यासाठी सव्वानऊ  कोटींचा खर्च केला आहे..’’  मुलांनी टाळ्या वाजविल्या. मंत्रिमहोदयांनी विचारले, ‘‘आता सांगा, राज्याचा शिक्षणमंत्री कोण?’’.. ‘‘तुम्हीच..’’ शेवटच्या रांगेतून गण्या ओरडला.. ‘‘तू कसे ओळखलेस?’’ खूश होऊन मंत्रिमहोदयांनी गण्याला विचारले. ‘‘साहेब, तुमचा फोटू हाय त्या पत्रकावर!’’.. गण्याने धिटाईने उत्तर दिले. आता मंत्रिमहोदय कमालीचे खूश झाले होते. मोहिमेची अपेक्षित निष्पत्ती झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते. आपण उगीच अगोदर लांबलचक भाषण झोडले, असेही त्यांना वाटून गेले. वर्गाबाहेर निघताना मंत्रिमहोदयांनी गण्याची पाठ थोपटून त्याच्यासोबत सेल्फी काढली.. गण्याचा भाव वधारला होता.