सकाळचा बागेतला फेरफटका आटोपून आरामखुर्चीत बसल्या जागी झोका घेत वर्तमानपत्र वाचता वाचता मोरूच्या बाबांची नजर उजव्या कोपऱ्यातील एका लहानशा बातमीवर खिळली. एका मिनिटात त्यांनी ती बातमी वाचून काढली, आणि मोरूचे बाबा स्वत:शीच खुशीत हसले. जिल्ह्य़ाच्या कॉलेजात मोरूला शिकायला पाठवलं, तेव्हा त्यांनी खूप मोठी स्वप्नं पाहिली होती. मोरूला डिग्रीला फर्स्ट क्लास गोल्ड मेडल मिळाल्यावर त्याने परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, भल्या मोठय़ा पगाराची कॉर्पोरेट हाऊसमधली नोकरी करावी, शहरात मोठा फ्लॅट घेऊन संसाराचा जम बसवावा असा हट्ट आपण त्या वेळी उगीचच धरला होता, ते आठवून मोरूचे बाबा थोडेसे खजीलही झाले. पण मोरू विचारी होता. पदवीचे भेंडोळे घेऊन घरी आल्यावर बाबांच्या आग्रहाला न जुमानता तेव्हा मोरूने  गावातल्या गावात तलाठय़ाची नोकरी पटकावली. तेव्हापासून घरात लक्ष्मी नांदू लागली आणि शेतीवाडीचा पसारा पाहून मोरूला घरच्या घरी अनेक साइड बिझिनेस करणे शक्य झाल्याने मोरूचे बाबा अगोदरपासूनच खूश होते. आजची ती बातमी वाचल्यापासून त्यांना आणखीनच आनंद झाला. मोरूला नोकरीतून पगाराशिवाय बऱ्यापैकी वरकमाई होती, आणि तलाठय़ाच्या रुबाबामुळे चांगला मानसन्मानही मिळत असल्याने तेव्हापासून मोरूच्या बाबांचे गावातील वजनही वाढले होते. एकंदरीतच, असे खुशीचे दिवस सुरू असल्याने मोरूचा संसार सुखाने सुरू होता. मोरूच्या बाबांनी वर्तमानपत्राची घडी करून, डोळे मिटून ते जुने दिवस आठवू लागले. मोरूला सरकारी नोकरी लागल्यापासूनच्या सुखाच्या दिवसांचा पट बाबांच्या नजरेसमोरून तरळू लागला, आणि ते स्वत:शीच पुटपुटले, ‘सुखाच्या सावलीत सुख आणखी वाढते म्हणतात.. अशीच कृपा असू दे रे देवेंद्रा!’.. असे म्हणत त्यांनी देवघराकडे पाहात हातही जोडले. आता मोरूला मुलांच्या शिक्षण, परीक्षांची तयारी आदी कारणांसाठी आणखी सहा महिन्यांची रजा वर्षांतून घेता येणार होती. सरकारने तसा निर्णय घेतला होता. वर्षांच्या सार्वजनिक सुट्टय़ा १५ दिवस. वर्षांतील रविवारच्या सुट्टय़ा ५० आणि सध्याच्या हक्काच्या, अर्जित पगारी रजा ३०,  म्हणजे जवळपास शंभर दिवस असेच सुटतात. पाच दिवसांचा आठवडा झाला, तर आणखी ५० दिवस सुटतील. म्हणजे १५० दिवस गेले. ३६५ दिवसांच्या वर्षांतील १५० दिवस तर हक्काने घरी बसता येत असताना, आणखी १८० दिवसांची सुट्टी मिळणार.. जरा हिशेबीपणा दाखवला, तर वर्षांच्या पगारात जेमतेम ३५ दिवस कामाचे राहतील.. मोरूच्या बाबांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी  नारळीच्या बागेत पाणी लावणाऱ्या मोरूला जोरदार हाळी दिली. बनियनला हात पुसत मोरू बाबांसमोर उभा राहिला. पेपरातल्या बातमीवर बोट आपटत बाबांनी दाखवलेली ती बातमी वाचून मोरूचा चेहरा उजळला.. ‘बाबा, बिझिनेस वाढवूया.. भांडवलाची काळजी करू नका.. ते मी इकडून कमावतो.. शिवाय सातवा वेतन आयोग मिळेलच..’ मोरू आनंदातिशयाने म्हणाला. मोरूची बायको चहाचे दोन कप घेऊन समोर उभीच होती. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, ‘आज काहीतरी गोडधोड केले पाहिजे’ असा विचार करीत मोरूची बायको स्वयंपाकघरात कामाला लागली..