कित्ती मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि इथे थंडी वाजतेय रिसॉर्टच्या खोलीत. अरे, जरा तो एसी बंद करा रे कुणी तरी. रिसॉर्टचा आहे, फुकट गार वारा मिळतोय म्हणून काय झालं? आत्ता बंद करा. आत्ताच भिजून आलोय ना बाहेरून. गरम पाण्यानं आंघोळी करू या. नंतर बैठकीला बसलो की लावू या पुन्हा एसी. अरे, तो हा कुठे गेला? हा हा तोच तोच. दिसत नाही तो कुठे? का त्यानेही सक्काळी सक्काळीच बैठक लावलीये. अरे, अरे, मला ढकलतंय कोण उगाच? फोनही लागत नाहीये त्याचा. व्हॉट्सअ‍ॅप करून बघतो. हा हा हा.. अरे, त्याचा डीपी बघ. खांद्यावर नांगर धरलेल्या माणसाचा आहे. हातानं चेहरा झाकलाय, तरी ओळखू येतोच मनोजकुमार आणि स्टेटस बघ काय.. ‘मेरे देश की धरती, सोना उगले..’ शनिवारी सकाळी त्याचा डीपी पँटच्या खिशात हात आणि गॉगलने चेहरा झाकलेल्या सलमान खानचा होता आणि स्टेटस होतं ‘हुड हुड दबंग दबंग दबंग..’. आपली गाडी निघाली तेव्हा बदलले असणार ते बहुतेक. आज रात्री घरी जाताना किंवा उद्या सकाळी नक्कीच पुन्हा दबंग दबंग गात सलमान येईल. असो. देश तसा वेश.. आणि दिवस तसा डीपी. अरे, अरे.. ढकलू नका ना मला. किती वेळा सांगायचं. हा.. आता एसी बंद केल्यावर जरा बरं वाटतंय. बाकी तीन दिवस कसे गेले कळलंच नाही हो. ना सीएल, ना पीएल, ना खोटी सिक लीव्ह.. तरीही तीन दिवस जोडून सुट्टी. शनिवार, रविवार, सोमवार. मस्तच. ना साहेब, ना बायको, ना ऑफिसची झिगझिग, ना घरातली कटकट. तीन दिवस पूर्ण स्वातंत्र्य. अगदी जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं स्वातंत्र्य. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. खाण्याचं.. पिण्याचं.. बोलण्याचं.. ऐकण्याचं.. गाण्याचं.. नाचण्याचं.. स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. कुठला श्रावण नि कसलं काय. ते फक्त घरी. इकडे, स्वातंत्र्यमासी हर्ष मानसी.. सहलीविना स्वातंत्र्य कुणा मिळाले.. मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू.. छोडो कल की बाते, कल की बात पुरानी.. अरेच्चा.. एकदम स्वातंत्र्याची पदेच आठवायला लागलीत मला नि सुचायलाही लागलीत. मी जरा खाली बसतो रे. काय म्हणताय, खालीच बसलेलो आहे मी? बरं. ठीकाय. काही नाही, साहेबांना जरा एक अर्ज करतोय व्हॉट्सअ‍ॅपवरून. कसं आहे ना साहेब, की तुमची कृपा नसतानाही, तुम्हाला अर्ज न करताही आम्हा सगळ्यांना ही सुट्टी मिळाली. त्यामुळे अनेकांच्या पारतंत्र्यातून मुक्त होत आम्हाला स्वातंत्र्य सेलिब्रेट करता आलं. पुढच्या वर्षीचं कॅलेंडर पाहिलंत का. पुढच्या वर्षी १५ ऑगस्ट मंगळवारी येतोय. तेवढं १४ तारखेचं जरा बघा ना. त्या सोमवारी सीएल मिळाली तर बरं होईल. तेवढंच जरा यंदापेक्षा एक दिवस जास्तीचं स्वातंत्र्य. बाकी विशेष काही नाही. सीएल दिलीत तर आभार. कळावे. आपला..