‘डान्स’ असेल तर ‘बार’ नाही आणि ‘बार’ असेल तर ‘डान्स’ नाही अशी भूमिका घेऊन ‘डान्स बार संस्कृती’ बंद पाडण्याचा हट्ट न्यायालयास पटवून देताना राज्य शासनाच्या नाकात दम येणार असे दिसत आहे. डान्स बारमध्ये मद्यबंदीची अट घालून आणि थेट नृत्यगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे बंधन घालून राज्य सरकार नवसंस्कृतीच्या पाऊलवाटाच बुजवीत असल्याची भावना बळावणे आश्चर्यकारक नाही. अशा परिस्थितीत, सरकारवर बुरसटलेल्या मानसिकतेचा रोखठोक ठपका सर्वोच्च न्यायालयाने ठेवल्यामुळे, बारमालकांना आणि संगीताच्या ठेक्यावर पोट भरणाऱ्या बारबालानामक उद्योगिनींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता बळावली आहे. डान्स बार असे नाव द्यायचे आणि मद्यपानावरच बंधने आणावयाची असतील, तर ठेक्याच्या तालावरली धुंदी अनुभवण्याचा षौक जडलेल्यांनी एसटी स्थानकांवर असलेल्या रसवंतीगृहात जाऊन बसावे काय?.. नाथपंथी रसवंतीगृहांतील उसाच्या चरकाच्या फिरत्या चाकालाही घुंगरे बांधलेली असतात आणि त्याच्या नादालाही लय असते. त्या ठेक्यावर  समोरच्या ग्लासातील उसाच्या फेसाळत्या रसाचे घुटके घेत मनाचा पिसारा हलकाहलका करण्याइतकी रसिकता डान्स बारच्या प्रेमीजनांकडे असती, तर डान्स बारचा मुद्दाच निकाली निघाला असता आणि हाती खुळखुळणारा पैसा कृषिप्रधान संस्कृतीमार्गाला वळवून अर्थचक्राला उसाच्या चरकाची गती देता आली असती. पण त्याऐवजी पैशाला छमछमाटाची चटक लागून शेकडो संसारांचे मातेरे होत असल्याचे पाहून राज्यकर्त्यांची निबर हृदयेदेखील कधीकाळी हेलावून गेली आणि संसार नावाची खासगीपणाचा पहिला हक्क असलेली व्यवस्थाच विस्कटणारी डान्स बार संस्कृती संपविण्यासाठी सरकारने पावले टाकली. पण हे पटविणे सोपे नाही याची जाणीवही एव्हाना सरकारला होऊ  लागली असणार. सार्वजनिक ठिकाणीदेखील खासगीपणा जपणे हा हक्क असल्याचा युक्तिवाद या निमित्ताने पुढे आला, हेदेखील प्रागतिक विचारसरणीचे लक्षण आहे. घर ही खासगीपणा जपण्याची हक्काची जागा असली तरी त्याच्या प्रत्येक खोलीला असणारे दरवाजे ही घरातील खासगीपणा जपण्याच्या हक्काची प्रतीके असतात, ही बाब वेगळी! सार्वजनिक ठिकाणी खासगीपणा जपण्याचा हक्क सांभाळला जावा ही नवी अपेक्षादेखील या निमित्ताने पुढे आली आहे. तसे झाले, तर खासगीपणा आणि सार्वजनिकपणा यांतील सीमारेषा पुसल्या जाऊन समाजाला प्रगतीच्या नव्या दिशेने झेपावण्यास प्रोत्साहन मिळेल. सरकारने आपली बुरसटलेली मानसिकता झुगारून त्याचाही विचार केला पाहिजे. कारण खासगीपणा हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि सार्वजनिक ठिकाणीदेखील तो जपला जावा, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. डान्स आणि बार या दोन्ही गोष्टी जशा आहेत तशाच एकत्र सुरू ठेवण्याने त्याला हातभार लागत असेल, तर संसार उद्ध्वस्त होतात, एवढय़ा कारणाकडे कानाडोळा करण्याचा प्रयोग करून पाहावयास काय हरकत आहे?..