मला भक्त म्हणून हिणवता काय? थांबा दाखवतोच तुम्हाला मी काय चीज आहे ते, तसेही तुम्हा पुरोगाम्यांना हिणवण्याशिवाय येतेच काय? असा सवाल करत काका तणतणत चौकातून घरी आले. दार खाडकन लावून घेतले. आल्याबरोबर त्यांनी आलमारीच्या खणात ठेवलेले जीन्सचे कापड कात्रीने कापायला सुरुवात केली. आज भारतीय बनावटीची विजार शिवायचीच या निर्धाराने ते शिलाई मशीनवर बसले. साधारण तासाभरात तो शिवून झाल्यावर त्याला लावायची चेन कुठे मिळते का याची चौकशी सुरू केली. अनेक पुरवठादारांना फोन केले. साऱ्यांनी ही चेन चीनमधून येते असे सांगितल्यावर काकांचा चडफडाट झाला. आत्मनिर्भर होण्याचा पहिला प्रयत्न फसला म्हणूान काका हार मानणारे नव्हते. लगेच त्यांनी टेबलावरील संगणकाचा एकेक भाग सुटा करायला सुरुवात केली. भले हे भाग ग्लोबल असतील, पण लोकली ते आपण जुळवू शकलो तरी पुरे असा यामागचा त्यांचा ध्यास! साधारण अर्ध्या तासात सुटय़ा भागांचा पसारा मांडून झाल्यावर ते त्यांनी जुळवायला घेतले. मध्येच काकू  त्यांच्याकडे रागाने बघून डोकावून गेल्या, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. संगणकाची पुनर्बाधणी झाल्यावर त्यांनी तो सुरू करायचा प्रयत्न के ला, पण फट्फट् असा आवाज फक्त आला, पडदा जिवंत झाला नाही. आत्मनिर्भरतेच्या सिद्धतेसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना छेडणे योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा नाद करायचा नाही, असे ठरवले. आपण स्वत: जोवर काही शोध लावू शकत नाही तोवर आत्मनिर्भरता सिद्ध करणे शक्य नाही हे त्यांना जाणवले. मग लगेच ते बाहेर पडले. दुकानातून त्यांनी वायर, छोटे बल्ब आणले. ते चिनी तर नाही ना याची खात्री दुकानातच करून घेतली. दुपारच्या वामकु क्षीनंतर त्यांनी दीपमाळ तयार करायला सुरुवात के ली. तास दोन तास खपल्यावर माळ तयार झाली. त्याची चाचणीही काकांना दिलासा देणारी ठरली. सायंकाळी घरातले सर्व दिवे घालवून त्यांनी दीपमाळेचे तोरण लावले. पाचच मिनिटांत पुन्हा फट्फट् असा आवाज झाला व माळेतील एके क दिवे विझत गेले. आता मात्र काका वैतागले. आत्मनिर्भरता व भक्तीचा संयोग जुळवून आणण्यासाठी काय करावे या चिंतेत असतानाच त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी घरातली द्राक्षे लगेच आंबवायला ठेवली. रात्री जेवतानाही त्यांचे लक्ष या आंबवणाकडेच होते. रात्री उशिरा त्यांनी आंबवण उकळून त्यापासून वाइन तयार करण्याची खटपट सुरू केली. ती कशी करायची याबाबत इंटरनेटवर असलेले ज्ञान वाचण्याचा मोहसुद्धा त्यांनी टाळला. कारण.. पूर्ण स्वदेशीचा ध्यास! पहाटे दोनच्या सुमारास चांगली ग्लासभर वाइन तयार झाली. आत्मनिर्भर झालो या आनंदात त्यांनी त्या ग्लासातला एक घोट काकूंना झोपेतून उठवून जबरीने पाजला. ‘कसला काढा?’ हे काकूंचे उद्गार ऐकू न काका सुखावले. चला, निर्भरतेची एक पायरी तर आपण चढलो या आनंदात ते सहज नातवाच्या खोलीत डोकावले.. गाढ झोपला होता बाळ. पण हे काय?  पलंगाच्या शेजारीच चिनी मांज्याचे रीळ..  हा नक्कीच चौकातल्या पुरोगाम्यांचा कट! ‘पण ती पहाट उजाडेलच’ म्हणत रागाने काका पलंगावर आडवे झाले.  झोप मात्र उडाली होती. ‘द्राक्षासवा’ची नशा कुठल्या कुठे पळून गेली होती.