News Flash

एकवचनी दैवत, चेकवचनी भक्त

आताच्या अयोध्येचे म्हणाल तर तिथेही आहेतच की अशी माणसे. म्हणून तर अयोध्यावासीयांच्या न वटलेल्या धनादेशांची संख्या दोन हजार निघाली.

(संग्रहित छायाचित्र)

उडवा, उडवा खिल्ली… त्याशिवाय तुम्हाला दुसरे येतेच काय? मंदिरासाठीच्या समर्पण निधीला देशव्यापी प्रतिसाद मिळाला ते तुम्हाला दिसत नाही आणि अवघे १५ हजार चेक बाउन्स काय झाले तर त्याची चर्चा करता, टर उडवता? अरे, आम्हाला दणदणीत जनादेश मिळत असताना या धनादेशांचे काय घेऊन बसलात. ते वठले नाहीत, ‘बाउन्स’ झाले तरी वटणावळ जमाच झाली ना आमच्या खात्यात. तीही रक्कम घसघशीत आहे! दैवत एकवचनी, म्हणून काय प्रत्येकाने निदान ‘चेकवचनी’ तरी असावे अशी अपेक्षा कशी काय करता? अहो, आधुनिक युग आहे हे. व्यग्रतेमुळे नसेल वेळ मिळाला त्यांना बँकेत योग्य ती रक्कम जमा करायला. आता त्याची आठवण करून द्यायला आहेच की आमचे समर्पित कार्यकर्ते. जातील ते न वटणाऱ्याच्या घरी. तुम्ही कशाला सुतावरून स्वर्ग गाठता? अशा फसवणुकीने कसे रामराज्य येणार असले प्रश्न तर विचारूच नका. ते येणार म्हणजे येणार. अहो, प्रत्येकच राज्यात असतात असे लोक विसरभोळे! भक्तीत आकंठ बुडालेले. नाही राहात आठवण कधी कधी. म्हणून काय त्यांच्या हेतूवरच शंका घ्यायची? म्हणे देणगी मागताना बळजोरी केली म्हणून असे घडले हा तुमचा तर्क आहे हो. तोही खवचट. निधी समर्पणाचे हे कार्य देशभर अतिशय सुरळीत पार पडले. बळजोरीच्या बातम्यांची राळ तुम्ही उठवली. आणि आताचा गवगवाही तुमचाच. आम्ही त्याची अजिबात चिंता करत नाही. एव्हाना आमची कुजबुज आघाडी कामाला लागलीसुद्धा असेल. या १५ हजार जणांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश जातील. देणगी बुडवणे पाप आहे, प्रभु स्वप्नात आले तर काय उत्तर द्याल, देवाची फसवणूक करणे हा कायद्यापेक्षा मोठा गुन्हा आहे, अशा स्वरूपाचे. शिवाय ज्यांचे चेक वठले त्यांना आलेले पुण्य पदरी पडल्याचे अनुभवसुद्धा यांना पाठवले जातील. देणगी दिल्याबरोबर घरात सुखशांती समृद्धी नांदू लागली, आर्थिक भरभराट झाली अशा आशयाचे. मग बघा हे न वटणारे कसे वठणीवर येतात ते!

आताच्या अयोध्येचे म्हणाल तर तिथेही आहेतच की अशी माणसे. म्हणून तर अयोध्यावासीयांच्या न वटलेल्या धनादेशांची संख्या दोन हजार निघाली. या साऱ्यांना सत्प्रवृत्तीकडे नेणे म्हणजेच रामराज्य. एकदा मंदिर उभारले की लगेच पूर्णत्वास आलेच समजा. जे दैवताला जमले नाही ते तुम्हाला कसे जमणार असे फालतू प्रश्न तर विचारूच नका. आणि ते धनादेश वटले नाही म्हणून दैवताच्या भक्तीत कमतरता आली अशा वावड्या पसरवणे बंद करा.

खूप वर्षाआधी आम्ही मंदिर उभारणीसाठी देशभरातून विटा गोळा केल्या होत्या. तेव्हाही त्यातल्या काही फुटक्या निघाल्याच ना! तेव्हाही तुम्ही अशीच कोल्हेकुई चालवली होती, पण आमच्या निर्धारात काही फरक पडला का? नाही ना! उलट तुमच्या या कृतीमुळे आमचा निर्धार अधिक वज्र होत गेला. शेवटी आलेच ना सारे जुळून. तेव्हा आमच्या धनादेशाची चिंता सोडा. तुमच्या या नुसत्या गवगव्यामुळे अनेक धनादेशकर्ते माफ करा, चूक झाली असे म्हणत देणगीची सव्याज परतफेड करू लागतील. भक्तांना माफीची सोय आहे. आमच्या राज्यात. तुम्ही तुमचे बघा. एकदा मंदिर झाले की दर्शनाची तयारी तेवढी ठेवा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:06 am

Web Title: loksatta ulta chahsma article abn 97
Next Stories
1 इथेही विदेशी कंपन्याच… ?
2 ‘टीका’ उत्सवातले समदु:खी…
3 न खाने देंगे..
Just Now!
X