आता कॅमेरा सोबत आहे म्हटल्यावर अ‍ॅक्शन आलीच ना! मग अशा वेळी कृतिशीलता दाखवायला नको? तेच तर हरकसिंग रावतांनी केले. तरीही त्यांची खिल्ली उडवता! डझनभर पत्रकार सोबत असल्यावर त्यांनी जंगलाला लागलेल्या आगीकडे अश्रू गाळत पाहणे तुम्हाला अपेक्षित होते काय? मोठ्या अपेक्षेने जमलेल्या माध्यमांचा वेळ फुकट जायला नको म्हणून घेतली त्यांनी फांदी हातात व विझवली आग तर बिघडले कुठे? हो, पडले असतील त्यांच्या वनखात्याच्या कार्यालयात आग विझवणारे ‘फायर ब्लोअर’ शेकड्याने. ते आगस्थळी आणेपर्यंत काय माध्यमांना वाट बघायला लावायची? आग विझवण्यासाठी पाण्याचा बंब घेऊन जायला तरी त्यांच्याकडे वेळ होता का? मग पटकन सुचेल अशी कृती केली तर त्यात वावगे काय? उलट तत्परता दाखवली म्हणून तुम्ही रावतांचे कौतुक करायला हवे. ते सोडून फांदीने झोडपल्यासारखा प्रकार करता. एकीकडे हे आग लावणारे अशी टीका करायची नि दुसरीकडे ती विझवली तर टर उडवायची. असला दुटप्पीपणा सोडा आता. बिचारे रावत या वारंवारच्या वनवणव्यांमुळे अस्वस्थ होते. कित्येक रात्री त्यांनी तळमळत काढल्या. आपण खरोखरचे संस्कृतीचे पाईक असू तर स्वत: शौर्य दाखवावेच लागेल, हे लक्षात आल्याबरोबर ते जंगलाकडे धावले. भर रात्री विंचूसापाची पर्वा न करता जंगलात शिरून सपासप फांदी चालवणे सोपे वाटले की काय तुम्हाला? अहो, यालाच शौर्य म्हणतात. आहे का देशातल्या एका तरी वनमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत! या त्यांच्या एका कृतीमुळे वणव्याशी लढणाऱ्या हजारो वनमजुरांना मिळालेल्या प्रेरणेकडे लक्ष द्या जरा, आता बघा हे सारे कसे आग नियंत्रणासाठी झटून कामाला लागतील. काय? प्रसिद्धीचा हव्यास? छे हो, संकटाचा सामना करताना अग्रभागी असणे हाच शुद्ध हेतू होता रावतांचा. अनेकदा अशा ठिकाणी जमलेली माध्यमे काही तरी कृती करायला सांगतात, त्यामुळे टिपली जाणारी दृश्ये जिवंत भासू लागतात, असले काही मनातही आणू नका! आग बघताच मंत्र्यांना कर्तव्याची जाणीव झाली नि आपसूकच त्यांचे हात फांदीकडे वळले. काय? मंत्री निघून गेल्यावरही ती आग धगधगतच राहिली? हो, असेल ना, चारपाचदा भुईवर फांदी आपटल्याने आग पूर्ण थोडीच विझणार? नंतरचे काम वन खात्याचे. ते त्यांनी केले नसेल तर त्याला रावत दोषी कसे? अहो, या शाखा-कृतीला इतके फाटे फोडण्यापेक्षा त्यांची यामागची भावना समजून घ्या. उत्तरांचली देवभूमीतले लोक आहेत ते. संकटकाळी अचाट कामगिरी करून दाखवण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. मागे पूर आला तेव्हा दोन दिवसांत चौदा हजार गुजराती बांधवांना विमानाने परत पाठवण्यात हेच लोक अग्रेसर होते. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची धमक या भूमीत आहे. तसेही जुन्या काळी जंगलातल्या आगी फांदी आपटूनच विझवण्याची परंपरा होती. त्याने विझत नाही हे लक्षात आल्यावर नवी उपकरणे आली. जे प्राचीन तेच उज्ज्वल असा ध्यास घेतलेल्या रावतांनी पुरातन गोष्टीवर विश्वास ठेवला तर त्यात काय वाईट? म्हणे, राज्यप्रमुखांइतकी आपल्यालाही प्रसिद्धी मिळावी म्हणून त्यांनी असे केले! नाही हो… एक रावत जाऊन दुसरे रावत कधीही येऊ शकतात हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांना लक्ष्य करणे सोडा आता. अहो, त्यांनी फांदी आपटून अनेक झाडांना जीवदान दिले. त्या महाराष्ट्रीय मंत्र्यांप्रमाणे कुणाच्या मृत्यूचा आरोप तर झेलला नाही! मग श्रेष्ठ कोण? ठरवा तुम्हीच!