कडक निर्बंधांमुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची नजर चुकवत सकाळी गल्लीबोळातून ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या तात्यांची नजर सहज पार्कातल्या प्रवेशद्वारावर लागलेल्या फलकाकडे गेली व ते थबकलेच. ‘छोडो आलस, भगाओ लस’ ही अक्षरे वाचताच त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. आत्मनिर्भर मंचाने चिनी लशीच्या विरोधात पुकारलेल्या या आंदोलनात सहभागी व्हायचे असे ठरवत ते घरी आले तेच मुळी आनंदात! निर्बंधांना वैतागून रोज कटकट करणाऱ्या तात्यांना आज झाले काय, असा प्रश्न काकूंना पडला. तो मनातल्या मनात गिळत त्यांनी गुळवेलचा काढा त्यांच्यासमोर ठेवला. तो घेताच तात्या तयारीला लागले. चिनी लशीविरुद्धच्या निदर्शनांत सहभागी व्हायला चाललो असे ते मोठ्याने म्हणाले, पण लॅपटॉपला कवटाळून बसलेल्या बंड्याने त्यांच्याकडे लक्षही दिले नाही. त्याच्यावर एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकत तात्या बाहेर पडू लागले तर काकू समोरच उभ्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव समजताच ते उद्गारले, ‘टाळेबंदीसदृश स्थिती असली तरी राष्ट्रभक्तांना देशहिताच्या आंदोलनासाठी अडवण्याची कुणाची ताकद नाही. बंदी काय आज आहे उद्या नाही, पण त्या चिन्यांपासून देश वाचवला पाहिजे. आणि झालाच गुन्हा दाखल तर देशासाठी खटल्याला सामोरे जाण्याची तयारी आहे माझी’ असे जोरात ऐकवत ते पार्काकडे निघाले. तिथे जमलेली माणसे बघून त्यांना हुरूप आला. गेले वर्षभर घरात बसून एकट्याने चीनच्या नावाने बोटे मोडून तसेही ते कंटाळलेच होते. या सततच्या बंदीमुळे स्वदेशीचा जागर मागे पडतो की काय अशी भीती त्यांना सतावू लागली होती. आता हे लशीचे निमित्त बरे; असे मनात म्हणत ते व्यासपीठावर सुरू झालेली भाषणे ऐकू लागले. ‘विरोधकांना हाताशी धरून चिनी लस देशात आणण्याचा मोठा कट रचला जात आहे. तो चीनचा औषधनियंत्रक गाओ फू लस परिणामकारक नाही असे सांगतोय तरी विरोधकांनी हा डाव रचलाय. गाव फुंकायला यांना आपलाच देश सापडतो का? ज्याप्रमाणे चिनी मालावर, अ‍ॅपवर बंदी घालून आपण त्यांना दणका दिला त्याप्रमाणे या लशीच्या संभाव्य आगमनाविरुद्ध आपल्याला जनयुद्ध छेडायला हवे. चिनी बनावटीची लस ती! चालली नाही आणि भलताच परिणाम झाला तर? याचा सर्व प्रखर राष्ट्रभक्तांनी विरोध केलाच पाहिजे व राष्ट्रवादी लशीचा आग्रह धरला पाहिजे. चीनच्या या नव्या विस्तारवादाचे स्वरूप लोकांना समजावून सांगण्यासाठी एक व्यापक जनआंदोलन छेडण्याची गरज आहे, यासाठी समर्पण निधीची गरज असून सर्वांनी सहकार्य करावे’ असे आवाहन वक्त्याने करताच तात्यांसकट जमलेल्या सर्वांचे हात खिशात गेले. थोड्याच वेळात निधीची झोळी भरून गेली! मग सर्वात शेवटी चिनी लशीच्या प्रतीकात्मक बाटल्या फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. तात्यांनीही शेजारच्याच्या हातातली काठी घेत सर्व शक्ती एकवटून कार्डबोर्डच्या बाटल्यांवर प्रहार केले. आंदोलन संपताच तृप्त मनाने ते परत निघाले. स्वदेशी बनावटीची हैदराबादचीच लस घेण्यासाठी आठ दिवस कशी पायपीट करावी लागली हे त्यांना आठवले. ते घरात आले तर बंड्या काकूंना लॅपटॉपवर काही तरी दाखवत असलेला त्यांना दिसला. काय असे त्यांनी खुणेने विचारताच काकू म्हणाल्या, ‘तो सांगतोय चीनची लसच सगळ्यात प्रभावी असे चिली देशातल्या संशोधकांनी सिद्ध केलेय.’ काकूंचे हे वाक्य ऐकून तात्यांना घेरी यायचीच बाकी राहिली.