पेशवे सवयीप्रमाणे एकटेच चतुरंगाचा डाव मांडून बसले होते. आपल्याशिवाय हा खेळ चालू शकतो यावर विश्वासच नसणाऱ्या काही सोंगटय़ा त्यांनी डावात घेतल्याच नव्हत्या. अमात्यांची एक सोंगटी सातत्याने घर बदलत होती, तर काळ्यापांढऱ्या सोंगटय़ांमध्ये प्रथमच खाकी मोहरे लुडबुड करताना दिसत होते. मोहीम अर्धवट सोडून आलेल्या प्रतिपेशव्यांची एक सोंगटी कशी चाल करेल याचा अंदाज पेशव्यांना सध्या तरी लागत नव्हता. तर एका स्वयंघोषित पेशव्यांची सोंगटी एकोणसाठाव्या घरातच थिजली होती. पुण्यनगरीला नवस लावलेल्या सोंगटय़ांवर डाव लावण्याची हिंमत नसल्यामुळे पेशव्यांनी काही निरुपयोगी सोंगटय़ांना धारातीर्थी पाडून आपल्या उरीचा सल दूर केला होता. हा सर्व पट दुरूनच, पण कौतुकाने पाहणारे महाराज दिल्लीच्या दिशेने येणारा खाकरल्यासारखा आवाज ऐकून काहीसे सावरले आणि पेशव्यांना म्हणाले, ‘‘पेशवेऽ, महाराज आपण आहात की आम्ही? स्वत: आम्ही निवडलेल्या सर्व स्वदेशी सोंगटय़ा आपण डावातून कशा काय बाद करू शकता? याची सजा म्हणून आम्ही आपणास वानप्रस्थाश्रमात धाडू शकतो.’’

‘‘महाराजांचा गैरसमज नसावा. आम्ही स्वराज्यरक्षणास बांधील आहोत. आम्ही उत्तरेकडून कुमक आणली असून, त्यांच्या चालीही निर्धारित करून दिल्या आहेत.’’

महाराजांनी तीक्ष्ण नजरेने युवराजांकडे पाहिले. युवराज संदेशवाहक यंत्रावर अंगुलिप्रघात करीत असल्याने त्यांना या विषयाची माहितीच नव्हती.

‘‘बरोबर आहे, महाराज’’ –  एवढेच ते म्हणाले.

तरीदेखील, पश्चिम दर्याला साक्षी ठेवून महाराजांच्या येरझारा सुरूच होत्या.

‘‘पेशवे!’’-  महाराज कडाडले, ‘‘जगदंबेच्या साक्षीने आम्ही निर्णय घेतला आहे. आपण आमच्या मर्जीखेरीज आणि मनसबदारांच्या अपरोक्ष पट मांडताहात, हे कदापिही सहन केले जाणार नाही. आपणास वानप्रस्थाश्रमात जाण्याखेरीज कोणता म्हणजे कोणताही पर्याय नाही! सरनोबतांना पेशवे नेमण्याचा आमचा मानस आहे. त्यांना सांगावा धाडावा आणि आज्ञापत्र तयार करावे!’’

पेशव्यांनी विचारपूर्वक आपला चेहरा गंभीर, उदास, दीनवाणा वगैरे केला. पटावरील सोंगटय़ांचे युद्ध आवरते घेणे आवश्यक होते. या युद्धात कागदांचा खच पडला, शाईचा चिखल झाला. खतावण्या तर किती कामी आल्या गणतीच नाही. महाराज तथा उपमहाराज वगळता अन्य मनसबदारांना या युद्धाची गंधवार्ताही लागली नाही. ‘‘महाराज, महाराज..’’ पेशवे विचारपूर्वक घाबरत म्हणाले, ‘‘शूरनविस सदरेवरून रवाना झाले आहेत. आता आज्ञापत्र कोण बनवणार?’’

‘‘शूरनविस खरेच शूर असतील तर सासवडमार्गे या फाल्गुनातच पुरंदरला पोहोचतील!’’ महाराज आपल्या अंगभूत मिश्कीलपणे वदले. अंत:पुरातून हास्याची पोच प्राप्त झाली. एवढय़ात स्वराज्यात घुसलेल्या विध्वंसक जंतूंची आठवण सर्वाना झाली. ‘‘खामोऽश!’’ महाराज कडाडले, पण आधीच खामोशी असल्याने वातावरण बदलले नाही. ‘‘पेशवे, या स्वराज्यभक्षक जंतूंचा नायनाट झाला म्हणजे झालाच पाहिजे. जंतुनियंत्रण कक्ष आपण जिवापाड सांभाळला यावरून आपली दूरदृष्टी पुन्हा एकवार, आपल्या म्हणजेच स्वराज्याच्या हितरक्षणार्थ सज्ज आहे याची नोंद होते आहे पेशवे!’’ महाराज पाठमोरे झाले. तोच इकडे उत्साही शब्द ऐकू आले, ‘‘प्रधान, रयतेशी सुसंवाद साधलाच पाहिजे आणि तो साधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. करा ती मुखपुस्तिका जिवंत!’’