एकेकाळी साम्यवादाचे प्रतीक म्हणून माझ्याकडे बघितले जाई. जग बदलण्याची क्षमता असलेल्या प्रत्येक कामगाराच्या हातात मी दिसे. घरात मी असणे म्हणजे प्रगतीचे लक्षण समजले जायचे. ऐंशीच्या दशकापर्यंत तर मी प्रत्येक तरुणाच्या गळ्यातला ताईत होतेच. ‘जाणून घेण्या मैत्रिणीचा कल, असावी लागते आपल्यासोबत एक सायकल’ अशा स्वरचित कविता गुणगुणत रस्त्यावर विहार करणारे तरुण-तरुणी साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र असायचे. त्या काळातला कुठलाही सिनेमा घ्या, माझी उपस्थिती त्यात हमखास असायची. स्वत:चा तोल सावरत चकचकीत डांबरी रस्त्यावरून माझ्यावर स्वार होत गाणे गाणारी नायिका व तिच्या मागे धावणारा नायक माझ्या अनिवार्यतेची जणू साक्षच काढायचे. तरुणांपैकी ज्यांची ऐपत नसायची ते मग मला भाडय़ाने तरी घ्यायचे. तेव्हा माझी इतकी क्रेझ होती की मला चालवता न येणाऱ्याला मागास समजले जायचे. आबालवृद्ध प्रत्येकाला साथ देण्यासोबतच शारीरिक श्रमाचे महत्त्व नकळत समजून सांगणारी मी नंतर काळाच्या ओघात विस्मृतीत जाऊ लागले. भांडवलशाही, त्यातून येणाऱ्या भौतिक प्रगतीच्या नादाला लागलेले लोक अधिक वेगाच्या प्रेमात पडू लागले व माझ्या वापराचा जोश हळूहळू उतरू लागला. एकेकाळी प्रत्येक घराच्या दर्शनी भागात असलेले माझे स्थान अडगळीत गेले. प्रगतीच्या नादात दृष्टी हरवलेल्या मध्यमवर्गाने मला टाकले, पण गरिबांसाठी मी कायमचा आधार राहिले. म्हणूनच निवडणुकीच्या काळात माझे वाटप ठरलेले असायचे. नंतर तंत्रज्ञानाच्या नादी लागलेल्या राजकारण्यांनी मला बाद करत मोपेड, लॅपटॉप अशा वस्तूंचा वापर करायला सुरुवात केली. हे दु:खाचे दिवस मला कष्टी करणारे होते. कालौघात माझ्यातही बरेच बदल झाले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी माझ्यावर जगभरात वेगवेगळे प्रयोग केले गेले. त्यातून माझे नाना प्रकार विकसित झाले. व्यायामावर तसेच जगभरात होणाऱ्या माझ्या स्पर्धासाठी माझी बहुविध रूपे वापरली जाऊ लागली. भले माझा वेग मर्यादित असेल, पण स्पर्धामधून उद्भवणारा थरार अनेकांचे लक्ष वेधून घेऊ लागला. विकसित जगात माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली. माझा वापर पर्यावरणपूरक प्रेमाचा संदेश देणारा ठरू लागला. तरीही तो एका मर्यादेपलीकडे गेला नाही. त्यामुळे माझे उत्पादन करणाऱ्या अनेकांना नांगी टाकावी लागली. तेवढय़ात हा करोना आला आणि माझे नशीब फळफळले. अचानक तंदुरुस्तीची आठवण झालेल्या अनेकांना ‘जुने ते सोने’ या म्हणीचा प्रत्यय येऊ लागला. टाळेबंदीने अनेकांच्या वावरावर बंधने आली आणि अडगळीत पडलेली मी पुन्हा घराच्या अंगणात दिसू लागले. कसलाही परवाना नाही, माझ्यावरचा दिवा तर कधीचाच हद्दपार झालेला. मग काय विचारता! आरोग्याप्रति दक्ष झालेले लोक आता माझ्यावर पूर्वीसारखे प्रेम करू लागले आहेत. आधी वेगावर प्रेम करण्याच्या नादात तंदुरुस्ती हरवून बसलेले लोक रस्त्यावरून जाताना माझ्याकडे तुच्छतेने कटाक्ष टाकायचे. माझ्यावर स्वार झालेला माणूस रस्त्यावर जरा कुठे थांबला तरी शिव्या घालायचे. आता मात्र वाट मोकळी करून देण्याचे दिवस आले आहेत. एका विषाणूने केलेले माझे हे पुनरुज्जीवन याला प्रगती म्हणायचे, अधोगती म्हणायचे की डोळे उघडणे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

मी मात्र पूर्वी होते तशीच आजही आहे. प्रत्येकाच्या शरीराची काळजी घेत त्यांच्या कामातही साथ देणारी!