‘वा वा महाराज, काय बोललात तुम्ही.. आयकर रद्द करण्याचा अर्थक्रांतिकारक विचार २०१४ नंतर कोणीही केलाच नसेल. तुम्ही तो बोलून दाखवलात, तोही त्यांच्याच व्यासपीठावर. महाराज बोलत होता तेव्हा साऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. वेबिनार असला तरी मी साऱ्यांच्या मुद्रा टिपत होतो. कुणी हूं करत होते, कुणी घाम पुसत होते, कुणी पाण्याचा घोट घेत अस्वस्थता घालवत होते. तुम्ही आकडय़ांवर आकडे फेकत होता आणि सहभागी सारे सिस्मित होऊन ऐकत होते. त्यात न्यायमूर्ती होते, केंद्रातले सारे बडे बाबू होते. तुमचा तेजस्वी चेहरा, तेवढेच धारदार बोलणे ऐकून सारे स्तंभित झाले होते.’ सेवकाकडून होणारी स्तुती ऐकून सद्गुरू सुखावले. तेजोमयी नेत्यामुळेच आपल्याला अर्थव्यवस्थेला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली याची त्यांना मनोमन जाणीव होती. कैवल्य, आत्मा, ब्रह्म, ब्रह्मांड या वैदिक शब्दांच्या पलीकडेसुद्धा आपल्याला बरेच ज्ञान आहे याची कल्पना यानिमित्ताने देशाला व्हायला हवी. शेवटी साधूच देशाचे भाग्यविधाते असतात हे जनतेला समजलेच पाहिजे या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे मंद स्मित उमटले. ‘अरे त्या काळे पैसेवाल्या बाबाचे काय सुरू आहे रे’ सद्गुरूंच्या प्रश्नाने सेवक चपापला. अशा वेळी काय बोलायचे असते हे त्याला ठाऊक होतेच. ‘महाराज, सध्या काळ्या पैशाची जादू ओसरली आहे. यातून काहीच हाती लागणार नाही हे लक्षात आल्याने ‘तेजोमयी’ हैराण झाले आहेत. त्यामुळे ते बाबांशी फटकून वागू लागले आहेत. बाबाने सध्या फॅक्टऱ्यांवर लक्ष देणे सुरू केले आहे. नवा मुद्दाही सुचत नसावा त्यांना. त्यामुळे तेजोमयी व त्यांच्यात फारसा संवाद राहिलेला नाही.’ सेवकाने पुरवलेली माहिती ऐकून जग्गी आणखी सुखावले. तेजोमयींच्या अवतीभवती आपल्या विचारकिरणांशिवाय दुसरा प्रकाश नको याची खबरदारी ते घेतच आले होते. तेवढय़ात त्यांना श्री श्रींची आठवण झाली. पुन्हा सेवकाला विचारणे आलेच. ‘जगभर फिरून ज्ञान पाजण्याच्या त्यांच्या सवयीला सध्या करोनामुळे आपसूकच लगाम बसला आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्याही झपाटय़ाने रोडावत चालली आहे. तेजोमयी मध्यस्थीसाठी त्यांना वापरायचे; पण मंदिराच्या प्रश्नात त्यांचे दिव्यज्ञान काही कामी आले नाही. दिल्लीतला त्यांचा महासोहळासुद्धा फसला. तेव्हापासून राजधानीतील लोक त्यांच्याशी अंतर ठेवू लागले आहेत. शिवाय ते नवा क्रांतिकारी विचारसुद्धा देशाला देत नाहीत. त्यामुळे परिवारापासून जरा दूरच गेले आहेत.’

ही माहिती ऐकून जग्गी दाढीतल्या दाढीत मंद हसले. नवा अर्थविचार देण्याची ताकद या दोघांमध्येही नाही. त्यांची तेवढी क्षमताही नाही. नुसते जगभर हिंडले म्हणजे अक्कल येतेच असे नाही! सद्गुरूंच्या मनात काय चालले आहे ते सेवकाने बरोबर ओळखले. ‘आता आपले स्थान कुणीच हिरावू शकत नाही,’ असे सेवकाने म्हणताच सद्गुरूंनी दीर्घ जांभई दिली व म्हणाले, ‘अरे, मी तो आयकराचा उत्पन्नातील वाटा १६ टक्के म्हणालो पण, नंतर कुणीतरी २८ टक्के म्हणत प्रतिवाद केला. कोण होता तो?’- ‘काळजी करू नका. त्याला तोंड बंद ठेवण्याच्या सूचना तेजोमयी वर्तुळातून गेल्या आहेत महाराज.’ उत्तर ऐकताच सद्गुरू आध्यात्मिक अर्थविचारात गढून गेले.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…