आधीच सांगून ठेवतो… अजिबात त्या योगगुरू बाबांच्या औषधाला दोष द्यायचा नाही. हो, झाली असेल त्या औषधाची भलामण करणाऱ्या शिवराजजी, रुपाणीजी, बिप्लव देबजी आणि आता योगीजींना करोनाबाधा. याचा अर्थ औषधात खोट आहे असा होत नाही. अहो, हे जनतेचे लोकप्रिय सेवक. सतत लोकांमध्ये मिसळणे त्यांच्याठायी  भिनलेले. त्यांना जरा कुठे त्याची लागण झाली तर इतका बाऊ करण्याचे कारण काय? आजवर ते बचावले याचाच अर्थ औषधाने त्याचे काम केले. योगपीठाच्या औषधांचेही काही नियम असतात. कदाचित त्याचे पालन या चौघांकडून झाले नसेल. तेही ते ‘नील’ की काय ते, जरा घट्ट आहे. प्राशन केल्यावर रक्तात मिसळायला वेळ लागतो. अशावेळी शरीराचे रक्ताभिसरण योग्य ठेवावे लागते. त्यासाठी योग करावा लागतो. कामाच्या व्यग्रतेत नसेल झाला चौघांकडून व्यायाम. त्यामुळे नसेल पडली मात्रा लागू. त्याचा एवढा बागुलबुवा? योगींचे म्हणाल तर व्यायामाच्या बाबतीत ते फारच दक्ष. विरोधी नेते जशी त्यांच्यावतीने चालणे व व्यायामासाठी माणसे ठेवतात तसले प्रकार योगी अजिबात करत नाहीत. एखादी वेळ चुकली असेल. नेमका त्याचवेळी या चिनी विषाणूने डाव साधला. जनसेवेत व्यग्रतेमुळे त्यांना गंगेत डुबकी घ्यायला सुद्धा जाता आले नाही. एकदा ते अभ्यंगस्नान झाले असते तर काय बिशाद होती या विषाणूची त्यांच्या शरीरात प्रवेश करण्याची. तसेही प्रत्येक संस्कृती रक्षकांच्या शरीरात हे बाबांचे औषध फारच प्रभावीपणे काम करते. करोनाच काय सगळे रोग ‘निल’ करून टाकते. त्यामुळेच तर या चौघांची अवस्था गंभीर झाली नाही. आता तुम्ही बघा, योगीही आठव्या दिवशी ठणठणीत होतील. या बरे होण्याला वैद्यकीय पथकाचे प्रयत्न कारणीभूत या समजावर अजिबात विश्वास ठेवू नका. ही पथके बाबांची मात्रा योग्यरीतीने काम करते की नाही एवढे बघण्यासाठीच होती. आणि हो, या बाधेमुळे याच चौघांनी त्यांच्या राज्यातून योगपीठाची औषधे ट्रकच्या ट्रक भरून परत पाठवली ही शुद्ध अफवा आहे. विरोधकांनी उडवलेली. तीवर अजिबात विश्वास ठेवू नका. उलट या लागणीच्या वार्ता कळल्याबरोबर बाबा या चौघांच्याही संपर्कात होते,आहेत, असणारच. तरीही रोगमुक्त झाल्यावर यांच्यापैकी कुणीही हरिद्वारमुळेच बचावले असे बोलत का नाहीत? बाबाही गप्प का? असले फालतू प्रश्न विचारू नका. स्वदेशीला प्रोत्साहन देताना काही गोष्टी योग्य वेळ येताच उघड कराव्या लागतात हे समजून घ्या. योगीसुद्धा बरे झाल्यावर याविषयी काही बोलणार नाहीत. त्यामुळे प्रश्न विचारून उगीच स्वत:वर ट्रोलधाड आणू नका. करोना नसताना बाबांचे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढवते व तो झालाच तर तातडीने विषाणू नष्ट करते. हाच अनुभव या चौघांचा असणार यावर विश्वास ठेवा. इतक्या मुख्यमंत्र्यांपैकी एक केरळचे पिनरायी वगळता

या चौघांनाच करोना का झाला हा प्रश्न मात्र जरूर विचारा. एकाच विचारधारेच्या नेत्यांना ही बाधा होण्यामागे निश्चितच मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे तसेच यात काही परदेशी औषध कंपन्यांचा हात असू शकतो अशीही कारणे देता येतील! त्यामुळे जनतेत स्वदेशीचे स्फुल्लिंग जागे करण्यासाठी या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याला आमची कोणतीही हरकत नाही. गंगामय्या की जय!