गुरुजी आले. त्यांनी वर्गात नजर फिरविली. गण्या शेवटच्या बाकावर मान खाली घालून लपला होता. हे सोशल मीडिया सुरू झाल्यापासून गुरुजी आपल्यालाच प्रश्न विचारतात आणि नंतर धू धू धुतात हे माहीत झाल्याने गण्या मागच्या बाकावरच बसायचा. गुरुजींनी पुस्तक उघडले आणि कविता शिकवायला सुरुवात केली. ‘कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा’.. अशी ओळ वाचून गुरुजी थांबले. त्यांची नजर वर्गभर फिरू लागली आणि गण्या पुन्हा लपला; पण गुरुजींनी त्याला हेरलेच. ‘‘गण्या, सांग बघू, गडकरींनी दगडांच्या देशा असे का बरे म्हटले असावे?’’ गुरुजींच्या प्रश्नाने गण्या गांगरलाच. एक तर गडकरी असे काही बोलल्याचे त्याला कळले नव्हते. हे गडकरी कोण, असाही त्याला प्रश्न पडला; पण आता इलाज नव्हता. गण्याने उभे राहून डोके खाजविले आणि तो म्हणाला, ‘‘गुरुजी, ज्यांना भावना नसतात, त्यांना दगड म्हणतात. म्हणून गडकरी तसे म्हणाले असावेत’’.. एवढे बोलून गण्याने नेहमीप्रमाणे जीभही चावली. आता गुरुजी आपल्याला धुणार आणि सोशल मीडियावर जोक टाकून राजीनामा वगैरे देण्यासाठी जाणार असेही गण्याला वाटले; पण गुरुजी काहीच बोलले नाहीत. गण्या अचंबित झाला. गुरुजी तर अंतर्मुख झाले होते. त्यांनी कविता शिकवून संपविली आणि तास संपताच ते वर्गाबाहेर पडले; पण त्यांच्या डोक्यात गण्याने दिलेल्या उत्तराचा भुंगा भुणभुणत होता. शाळा सुटल्यावर ते घरी गेले आणि सवयीप्रमाणे वर्तमानपत्र चाळू लागले. मुख्यमंत्र्यांनी सहकारी बँकेत विठ्ठलाच्या मूर्तीचे लोकार्पण केले, अशी बातमी त्यांना दिसली आणि त्यांना पुन्हा गण्याचे उत्तर आठवले. ‘आता इथे ही मूर्ती काय करणार’, असा विचारही त्यांच्या मनात आला. दोनच वर्षांपूर्वी, याच बँकेवर सहकार आयुक्तांनी ताशेरे ओढले होते, ही बँक फक्त स्वत:पुरताच धंदा पाहते, असा ठपका सहकार आयुक्तांनी ठेवल्याचे त्यांनी वाचले होते. एकूणच सहकार क्षेत्रातील आणि राज्य सहकारी बँकेतील कारभाराच्या कहाण्याही त्यांनी तेव्हा वाचल्या होत्या. आता त्याच सहकाराला मुख्यमंत्र्यांनी वारीची उपमा दिल्याचे वाचून गुरुजी उदास झाले. ‘वारी बिघडली म्हणायची’.. ते मनाशी पुटपुटले आणि वाईट विचार मनात आल्याबद्दल मनातल्या मनात विठ्ठलाची मूर्ती नजरेसमोर आणून गुरुजींनी हातही जोडले. गेल्या आषाढीला मुख्यमंत्र्यांना पंढरीची पूजा करता आली नव्हती, तो विठ्ठल बँकेतील मूर्तीच्या रूपाने त्यांच्यासमोर उभा राहिला, असा विधायक विचार केला, तेव्हाच गुरुजींचे मन शांत झाले. ‘भागवत धर्माला ज्याप्रमाणे विठ्ठलाने सहकार शिकविला, तसे काम ही बँक करेल’ असे मुख्यमंत्र्यांचे बोल वाचून ते गोंधळले. आपला गण्या होतोय असे त्यांना वाटू लागले. गण्याला सकाळी गडकरी कोण, असा प्रश्न पडला होता, ते गुरुजींनी ओळखले होते. आता आपल्यालाही, ‘भागवत कोण’ असा प्रश्न पडतोय की काय, अशी गुरुजींना भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी तो विचार सोडून दिला आणि उद्या शाळेच्या फळ्यावर हाच विचार ‘सुविचार’ म्हणून लिहावा असे ठरवून गुरुजींनी पेपर मिटला. दुसऱ्या दिवशी मराठीच्या तासाला त्यांनी पुन्हा गण्याला उभे केले. ‘‘गण्या, सांग पाहू, विठ्ठलाने सहकाराला कोणती शिकवण दिली?’’.. गण्या काहीच बोलला नाही, मग गुरुजींनी गण्याला धू धू धुतला..