दिवस सणांचे आहेत. नवरात्र सुरू आहे.. दसरा आलाय आणि त्यानंतर दिवाळी आहेच. म्हणून दिवस खरेदीचेही आहेत. सणासुदीची खरेदी म्हणजे कोण व्याप. बाजारात जायचं म्हणजे ठीकठाक कपडे घाला. पिशव्या शोधा. पाकीट घ्या. दुकानात जाऊन तिथल्या गर्दीशी झुंजत झुंजत मान पुढे करून विक्रेत्यांना, ‘अहो जरा ते अमकं द्या हो,’ असं विनवा. गर्दीत आपला हात चुकून दुसऱ्याच्या खिशातील पाकीट काढणार नाही, याची काळजी घेत स्वत:च्याच खिशातील पाकीट काढा. पैसे दुकानदारास द्या. गर्दीतून खिंड लढवल्याप्रमाणे पिशव्या सांभाळत, पुढे सरकत दुकानाबाहेर पडा. पण सांप्रतकाळी हे असले श्रम करण्याची आवश्यकता नाही खरं तर. फक्त इतकंच करायचं की भल्या पहाटे उठायचं आणि मोबाइल हाती घ्यायचा वा संगणकापुढे मनोभावे – किंवा डिजिटल इंडियाला स्मरून नमोभावे – बसायचं. सणासुदीच्या तोंडावर सेल, महासेल, जंबोसेलच्या फलकस्वरूपी जाहिराती पेपरांच्या प्रथमपृष्ठाआधीच झळकत असतात. या कंपन्यांच्या जाहिरातींत दिल्यानुसार भल्या पहाटे उठून पहिलं काम म्हणजे या कंपन्यांच्या संकेतस्थळावरील खरेदीच्या अंगणात दाखल होणं. हे दाखल होणं म्हणजे येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे. मुळात संकेतस्थळ तातडीने समोर दिसू लागलं तर तुमच्यासारखे पुण्यवान तुम्हीच. त्यानंतर त्यावरील खरेदीच्या अंगणात तुम्हाला लगेच दाखल होता आले तर मग तुम्ही दुप्पट पुण्यवान. खरेदी अंगणात दाखल झाल्यानंतर, संकेतस्थळ कोसळण्याआधी तुम्हाला तुमच्या मनपसंत वस्तूंची खरेदी करता आली पाहिजे. त्यात या वस्तूंची संख्या मर्यादित असेल तर मग तुम्हाला तुमचं संकेतस्थळ हाताळणीचं कौशल्य अधिकच परजता आलं पाहिजे. हे सगळं सांभाळून तुम्ही तुमची मनपसंत वस्तू खरेदी केलीत, म्हणजे मग तुम्हाला थोडय़ाच वेळात तुमच्या मोबाइलवर संदेश येणार, की अमकी वस्तू तुम्ही खरेदी केली आहे ती तीन-चार दिवसांतच तुमच्या घरी येईल. इथे व्यवहार पूर्ण. फक्त एकच करायचं. ही खरेदी झाली की निदान पुढचे तीन-चार दिवस पुन्हा त्या कंपनीच्या संकेतस्थळावर जायचं नाही, किंवा त्या कंपनीच्या जाहिराती बघायच्या नाहीत. तुम्ही एखाद्या संकेतस्थळावरून ज्या किमतीला एखादी गोष्ट खरेदी केली असेल, त्यापेक्षा किती तरी कमी किमतीत तीच वस्तू दुसऱ्या संकेतस्थळावर तोऱ्यात तुम्हाला वाकुल्या दाखवीत असते. सेल लागलेल्या एका दुकानातून तूरडाळ १७२ रुपये किलो आणि बासमती तुकडा ९४ रुपये किलो अशा भावाने विकत घेऊन तुम्ही निघता. जिनसाच्या पिशव्या सांभाळता सांभाळता समोरच्याच दुकानाच्या बाहेर लागलेला ‘तूरडाळ १६४ रुपये किलो.. बासमती तुकडा ९० रुपये किलो’ असा दरफलक तुमच्या दृष्टीस पडल्यावर काय वाटतं? आपलं पाकीट कुणी तरी मारलंय असं काहीसं. खांद्याला पिशव्या लटकलेल्या अवस्थेत अर्र.. अरेच्चा.. अरेरे.. अशी अकारयुक्त बाराखडी उघड आणि xxxची बाराखडी उघड वा मनातल्या मनात घोकत तुम्ही अंतिम सत्यापाशी येता.. ऑनलाइन काय, ऑफलाइन काय.. आपण शेवटी गिऱ्हाइकच..!