News Flash

खंडणीखोरी.. एक इष्टापत्ती

काश्मीरमधील दगडफेक थांबली. दहशतवादी कारवायांना आळा बसला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आजपावेतो आम्ही खंडणीखोर पाहिले होते ते चित्रपटांत. डोळ्यांवर गडद रंगाचा गॉगल, अंगात भारी रंगाचा शर्ट, गळ्याभोवती गुंडाळलेला रुमाल, या वेशभूषेस साजेशी पँट आणि पांढऱ्या रंगाचे बूट. खर्जातल्या आवाजात फोनवर समोरच्याला सांगणार.. ‘इतक्या पेटय़ा दे.. इतकी खोकी दे.. नाही तर बघ.’ दुसरे प्रत्यक्षातील खंडणीखोर पाहिले होते ते गल्लीतले. कोपऱ्यावरची चाळ पाडून तेथे टोलेजंग इमारत उभी राहिली तेव्हा गल्लीतल्या बारकूदादाने ती इमारत बांधणाऱ्यांना धमकावून काही पेटय़ा पदरात पाडून घेतल्या होत्या, अशी जोरदार चर्चा होती. खंडणीखोरांबाबतच्या आमच्या माहितीत आता मोलाची भर पडली आहे. नव्या खंडणीखोरांची माहिती आम्हाला झाली आहे. ते फोन वगैरे करीत नसल्याने त्यांचा आवाज खर्जातला आहे की कसे, याची कल्पना नाही. त्यांचे सगळे काम ऑनलाइन. संगणकाच्या मेंदूत साठवलेल्या माहितीचे बखोटे ते धरून ठेवतात आणि धमकावतात.. ‘पैसे टाक, नाही तर ही माहितीच पळवून नेतो की नाही ते बघ.’ ‘वान्नाक्राय रॅनसमवेअर’ असले काही तरी अनघड नाव त्यांचे. या नव्या खंडणीखोरांनी सगळ्यांचीच मोठी पंचाईत करून टाकली आहे. जगभरातील लोक बोटे मोडत आहेत त्यांच्या नावाने. पण त्यामुळे झालेला एक फायदा लक्षात आलेला दिसत नाहीये कुणाच्या. हा फायदा झाला आहे सरकारचा.. म्हणजेच पर्यायाने आपल्या देशाचा. राष्ट्राचा. या सायबर खंडणीखोरांनी गेल्या शनिवारी जगभर धुमाकूळ घातल्यानंतर आपल्याकडील अनेक बँकांची एटीएम तातडीने बंद करण्यात आली. सायबर हल्ल्याचा एटीएमला फटका बसू नये, म्हणून सावधगिरीचा उपाय होता तो. सावधगिरीची ही आपल्याकडील रीत आदर्शवत आहे. पाऊस खूप पडत असेल तर नागरिकांना सांगायचे.. गरज असल्याखेरीज घराबाहेर पडू नका. रेल्वेगाडय़ांची काही समस्या असेल तर प्रवाशांना सांगायचे.. गरज असेल तरच प्रवास करा. वीज उत्पादन घटले असेल तर लोकांना प्रेमळ सल्ला द्यायचा.. गरज असेल तेव्हाच वीज वापरा. त्याच धर्तीवर या खंडणीखोरांच्या प्रतापानंतर एटीएम बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या हाती रोख रक्कम पडली नाही. आता काही जण म्हणतात, की ‘मुळात एटीएममध्ये कित्येक दिवस रोकडटंचाई आहेच. हे निमित्तच मिळाले एटीएम बंद ठेवण्यासाठीचे.’ तर ते असेना का. रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक तातडीने रोकडरहित व्यवहारांकडे वळले. ऑनलाइन व्यवहारांना चालना मिळाली. काळ्या पैशांना धरबंद बसला. काश्मीरमधील दगडफेक थांबली. दहशतवादी कारवायांना आळा बसला. केवढे हे फायदे. नोटाबंदीमागील सरकारचा हेतू साध्य होण्यात हातभारच लागला या प्रकाराचा. हे सगळे घडले ते केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसरा वाढदिवस साजरा करण्याच्या बेतात असताना. एका अर्थाने ही खंडणीखोरी इष्टापत्तीच ठरली देशासाठी. राष्ट्रासाठी. त्यासाठी खरे तर त्या ‘वान्नाक्राय रॅनसमवेअर’वाल्यांचे मनापासून आभारच मानायला हवेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक तेवढा मिळाला की कळवा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 1:01 am

Web Title: ransomware facts
Next Stories
1 धन्य ते.., धन्य ती..
2 ही तर ‘महा’श्रमांची झलक..
3 बिबर फीवर..
Just Now!
X