22 October 2019

News Flash

हे कंकण करि बांधियले..

आर्टीओ’च्या प्रतिमेस लागलेले ग्रहण यातून सुटेल अशी शक्यताच नाही!

हा अन्याय आहे. घोर अन्याय आहे. हे खरे आहे, की प्रादेशिक परिवहन विभाग- म्हणजे सर्वत्र साध्या भाषेत ज्याला ‘आर्टीओ’ असे म्हटले जाते- काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ विभाग नाही असाच सर्वसाधारण समज असतो. दलालामार्फत दाखविला तरच इथल्या देवाला नैवेद्य पोहोचतो अशीच सर्वसाधारण समजूत आहे, हेही खरे. पण हा संपूर्ण विभागच अशा दलदलीने माखलेला आहे असा याचा अर्थ नव्हे! अत्यंत गलिच्छ अशा चिखलातही सुंदर कमळे फुललेली असतात, त्याप्रमाणे बदनाम म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या परिवहन विभागात, म्हणजे, ‘आर्टीओ’मध्येही, काही चांगले, दिलासादायक असणारच की! पण मायबाप सरकारनेच संशयाच्या काळ्या काचा लावल्यावर सारे काही गढूळच दिसू लागणार अशी अवस्था सध्या या खात्याची झाली आहे. साध्या वाहनचालन परवान्यापासून वाहन खरेदी-विक्री वा अन्य वाहतूकविषयक कोणत्याही कामासाठी या कार्यालयात जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात मुळातच, या खात्याविषयीच्या असंख्य खऱ्या-खोटय़ा आख्यायिकांचे भूत घर करून राहिलेले असल्याने, या कार्यालयात जावयाचे म्हणजे एक तर दलालाची अजीजी करावयाची, किंवा स्वतचा खिसा पुरेपूर भरूनच तेथील पायरी चढावयाची असाच एक समज झाला आहे. तो दूर करण्याऐवजी यास खतपाणी घालण्याचेच काम सरकार नामक व्यवस्थेकडून होत असेल, तर या खात्याचे काही खरे नाही असेच म्हणावे लागेल. या खात्याचे कर्मचारी खरे तर, समाजसेवेच्या म्हणजेच राष्ट्रसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन बढती, पदोन्नती आदी नोकरीतील लाभाकडेही प्रसंगी दुर्लक्ष करून व आहोत त्याच पदावर अहोरात्र काम करून समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी तत्पर असताना, बढती नाकारण्यामागे काही ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांचे किंवा आर्थिक हितसंबंधांचे धागे तर नाहीत ना असा संशय मायबाप खात्यानेच त्यांच्यावर घ्यावा, हे त्या कर्मचाऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. अन्य खात्यांत कोणी जनसेवेचे कंकण हाती बांधून बढती वा पदोन्नतीची अपेक्षा न बाळगता काम केले असते, तर ते खरे तर स्वार्थनिरपेक्षतेचे पराकोटीचे आदर्श उदाहरण ठरले असते.

पण प्रादेशिक परिवहन खात्याचे पालकत्व असलेल्या परिवहन विभागास मात्र, यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हेतूविषयीच शंका येते आणि त्यांच्या व्यवहारांची थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे घाटते, ही असहिष्णुताच म्हणावी लागेल. असे करण्याआधी, पदोन्नती नाकारून आहोत त्याच पदावर काम करण्यामागे या कर्मचाऱ्यांची सेवावृत्ती किंवा स्वार्थनिरपेक्ष राष्ट्रसेवेची भावना तर नाही ना, याची शहानिशा करावयास हवी होती. ती न करता केवळ त्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयीच संशय घेऊन या खात्याने जनतेच्या मनात अगोदरच या विभागाविषयी असलेल्या असंख्य संशयांना आणि शंकाकुशंकांना खतपाणीच घातले, असाच लोकांचा समज होईल.

आपल्याच अखत्यारीतील एका खात्याच्या अगोदरच मलिन झालेल्या प्रतिमेवर आणखी धूळ माखण्याचाच हा प्रकार झाला! ‘आर्टीओ’च्या प्रतिमेस लागलेले ग्रहण यातून सुटेल अशी शक्यताच नाही!

First Published on May 9, 2019 1:35 am

Web Title: rto inspectors refuse promotion in maharashtra