प्रसंग १ – स्थळ- काकांचे निवासस्थान. वेळ- तातडीची! सगळे जण अस्वस्थपणे काकांची वाट पाहत बसले आहेत. दिवाणखान्याच्या दरवाजाचा पडदा हलकेच बाजूला होतो आणि चुळबुळ सुरू होते. ‘आले काका..’ कुणी तरी कुजबुजतं. सारे जण उत्सुकतेने पाहतात. पलीकडे दादा असतात.  ‘सगळे जण जमले आहेत या ठिकाणी!’ दादा शक्य तितक्या नम्र सुरात सांगतात आणि काका उठतात. हसतमुखाने काका दिवाणखान्यात दाखल होतात. सभोवती नजर टाकतात. सारे जण हात जोडून ‘नमस्ते’ पुटपुटतात आणि सोफ्यावर बसून नॅपकिनची घडी तोंडावर फिरवत काका मिस्कील हसतात. ‘‘काय काम काढलंत? आज बऱ्याच दिवसांनी आमची आठवण आली?’’ चेहऱ्यावरचे मिस्कील भाव तसेच ठेवून काका विचारतात आणि जमलेले सारे एकमेकांकडे पाहू लागतात.. मग काकाच बोलू लागतात.. ‘‘तीन-चार वर्ष झाली असतील ना, तुम्हाला तिकडं जाऊन?’’ एकाला उद्देशून काका विचारतात.. ‘‘होय साहेब.. आपणच तर त्यांना फोन करून सांगितलं होतं, म्हणून आमचा प्रवेश तिकडं नक्की झाला.. न्हाईतं कोन घेनार व्हतं तिकडं?’’ कसंनुसं हसत तो म्हणाला. साहेबांनी सांगितलं म्हणून तर आपण तिकडं गेलो आणि आपल्याला मानाचं पान मिळालं. साहेबांचा शब्द वपर्यंत कुणीच मोडत नाही, म्हणूनच सगळं जमलं हे सगळ्यांनाच माहीत होतं.  साहेब पुन्हा हसतात. ‘‘मग? आता काय करायचं? पुन्हा काही तरी निकाल घ्यायला हवा..’’ साहेब समोरच्या सगळ्यांनाच उद्देशून बोलतात. ‘‘साहेब, तुम्हीच ठरवा आनि आमाला सांगा!’’.. कुणी तरी धीर करून बोलतं. ‘‘मग, करा घरवापसी.. टाकू या शब्द तिकडे’’.. असं साहेब दिल्लीच्या दिशेने बोट दाखवतात.. काकांनी निकाल घेतला, हे पाहून सगळ्यांचे चेहरे खुलतात आणि सारे जण बाहेर पडतात.

बाहेर च्यानेलवाल्यांची गर्दी जमलेली असते. एक जण बरोबर संजयाला गाठतो.  बूम समोर येताच संजय बोलू लागतो.. ‘‘पराभव होणार हे आम्हाला माहीतच होते.. त्यांनी रस्ता बदलायला नको होता!’’.. लगेचच टीव्हीवर बातम्या सुरू होतात.. संजय टीव्हीवर दिसू लागतो.. बातम्या पाहता पाहता नॅपकिन चेहऱ्यावरून फिरवत काका मिस्कील हसतात आणि आसपास कुणी नाही हे पाहत फोन फिरवतात..

प्रसंग २- स्थळ रावसाहेबांचे निवासस्थान. वेळ- तीच, तातडीची!.. नेत्यांची बैठक सुरू असते. ‘‘आता काय करायचं?’’.. चिंतातुर चेहऱ्याने रावसाहेब विचारतात. कुणीच काही बोलत नाही.

तिकडे सहाव्या मजल्यावर महत्त्वाची मीटिंग सुरू असतानाच साहेबांचा फोन वाजतो. काही तरी बोलणं होतं आणि तातडीने मीटिंग आटोपून साहेब रावसाहेबांकडे निघतात. साहेब पोहोचताच सारे जण सुस्कारा सोडतात.

साहेब येऊन सोफ्यात बसतात आणि रावसाहेब पुन्हा तोच प्रश्न विचारतात, ‘‘बोला, आता काय करायचं?’’ सारे जण साहेबांकडे पाहतात. साहेब ठेवणीतले हसतात.. ‘‘मला वाटतं, आपण वाल्मीकीकरण योजना तूर्त लांबणीवरच टाकावी!’’ साहेब एवढंच बोलतात आणि सारे जण सहमती दर्शवतात.. रावसाहेबांचा चेहरा पडतो, पण तेही मान हलवून होकार भरतात.. बैठक संपते!