News Flash

सल्ल्यांचे आगार!

स्वयंघोषित सल्लागारांच्या प्रतिभेला या देशात बहर येतो म्हणजे येतोच.

चर्चा संकटकाळाची असो अथवा आनंदकाळाची. स्वयंघोषित सल्लागारांच्या प्रतिभेला या देशात बहर येतो म्हणजे येतोच. आता प्राणवायूचेच बघा ना! लागला ना अख्खा देश कामी. या वायूच्या तुटवडय़ावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नांना ऊत आलाय नुसता. आहेत का इतके प्रतिभावंत अन्य देशात? नाही ना! मग उगीच नावे कशाला ठेवता? काय सुरू नाही या देशात? या मुद्यावर ते उत्तराखंड नामक देवभूमीचे प्रमुख तिरथ सिंग वदले, लोकांनी ऋषीमुनीसारखे प्राणवायूअभावी जगणे शिकायला हवे. तसे करायचे असेल तर साऱ्यांना वेदाकडे वळावे लागेल. या पौराणिक सत्याची त्यांच्याकडून वाच्यता होताच सर्वत्र वेदपुराणांच्या पुस्तकांची ऑनलाइन विक्री वाढली म्हणे! आता हे ऋषीमुनी प्राणवायू न घेता प्राणायाम कसे करत होते असले प्रश्न विचारू नका. श्रद्धेतून आलेल्या सत्यात तर्काला स्थान नसते. समस्त देशवासीयांनी या सत्याचा अवलंब एकदा का सुरू केला की प्राणवायूचा तुटवडा संपलाच समजा. भले त्यात काहींना जीव गमवावा लागला तरी प्राणवायूमुक्त जीवनासाठी तेवढे सहन करायची तयारी ठेवावीच लागेल आपल्याला. त्यांनीच आधी हे करून दाखवावे असले उचकट मुद्दे अजिबात नकोच. वारंवार प्रमुख बदलणे देवभूमीला परवडेल का?

या वायूच्या तुटवडय़ामुळे कासावीस झालेले काही वैद्यक रुग्णांवर उपचार करताना बरे झाल्यावर २५ झाडे लावलीच पाहिजेत अशी अट घालत आहे म्हणे! किती हा उदात्त हेतू. संकटकाळी अशी दूरदृष्टी दाखवणाऱ्यांचे कौतुक करायला हवे. झाडे मोठी केव्हा होतील, त्यातून वायू कधी मिळेल, तोवर लाट कशी थोपवायची, झाडांमधून मिळणाऱ्या प्राणवायूने रुग्ण कसा जगेल असले ‘वाम’मार्गी प्रश्न विचारणे म्हणजे या उपायकारांचा अवमानच. कोणताही देशप्रेमी माणूस तो करण्यास धजावणार नाही याची खात्री बाळगायलाच हवी. तरीही कुणी हरकत घेतलीच तर त्याला ‘अमर अकबर अँथनी’ मधला थेट रक्तदानाचा सीन दाखवा- रक्त देता येते मग वायू का नाही असा प्रश्न विचारून निरुत्तर करा! आणि त्या चांद्याच्या भाऊंनी लावलेली ५० कोटी झाडे कुठे गेली, ती असती तर आजचे संकट टळले असते अशी नकारात्मक भाषा अजिबात नको. त्या झाडांचे वय अजून प्राणवायू वाटपाएवढे झाले नाही हे लक्षात घ्या. या साऱ्या उपायांना तर्काचे अधिष्ठान कुठे असला प्रश्न तर विचारूच नये. त्याऐवजी ही बोधकथा वाचून मन रमवावे. ‘एकदा अकबराच्या नोकराकडून चूक घडते. संतापलेला राजा त्याला थंड पाण्यात २४ तास उभे राहण्याची शिक्षा देतो. ती संपल्यावर पहारेकरी त्याला दरबारात हजर करतात. त्याने खरच शिक्षा भोगली का हे राजा पहारेकऱ्यांना विचारतो तेव्हा त्यातला एक सांगतो. हा नोकर पाण्यात उभा असताना पाच फुटावर असलेल्या एका दिव्याकडे बघून ऊब घेत होता. संतापलेला अकबर त्याला शंभर फटक्यांची शिक्षा सुनावतो. घाबरलेला नोकर बिरबलाकडे धाव घेतो. दुसऱ्या दिवशी दरबार भरताच राजा बिरबलाला बोलावतो. तिकडून उत्तर येते बिरबल खिचडी शिजवत आहेत. दरबार संपला तरी बिरबल आला नाही म्हणून राजा त्याच्याकडे जातो. बिरबल चुलीपासून पाच फूट उंच तिकाटण्यावर खिचडी ठेवून शिजवत असतो. अरे, इतक्या खाली जाळ लावल्यावर खिचडी शिजेल कशी, असे राजाने विचारताच बिरबल त्या नोकराच्या उबेचा मुद्दा उपस्थित करतो. खजिल राजा शिक्षा रद्द करतो.’ प्राणवायूवर उपाय शोधणाऱ्यांना ही कथा अजिबात ऐकवू नये, एवढेच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 3:25 am

Web Title: ulta chasma planting trees amid covid 19 oxygen shortage during covid crisis zws 70
Next Stories
1 शेतकऱ्यांशी कट्टी
2 पीपीई-विवाह
3 मुखपट्टीचे घर…
Just Now!
X