महामहीम उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडूजी यांच्या सूचनेमुळे भारतीय लोकशाहीचा मनमोर आनंदाने थुईथुई करू लागला आहे. भरून आली आहे लोकशाहीची सव्वाकोटी इंचाची छाती. तिच्या डोळ्यांत दिसते आहे एक कृतज्ञ भावना. नायडूजींना तर राखीपुनवेला एखादी राखीच बांधावी असा सुविचारही तिच्या डोक्यात चमकून गेला. वाटले तिला, आपला खरा बंधुराया तोच. तोच आपला सुखकर्ता, तोच विघ्नहर्ता. नाही तर अधिवेशन असे तोंडावर आले की काच लागायचा तिला. नको नको वाटायचे ते संसदेत जाणे. ती राज्यसभा, लोकसभा.. नुसता गोंधळ, गदारोळ. त्यापेक्षा सेंट्रल हॉल बरा. तेथे कसे छान वातावरण असते. लोक हसत असतात, ‘गप्पे’ मारत असतात.. भले पाठीमागे धरलेल्या हातात असेल सुरा; पण दुसऱ्याने तर हस्तांदोलन करत असतात. सभागृहात काय होते कोण जाणे त्यांना? उगाच भाषणे काय करतात, एकमेकांच्या अंगावर काय जातात, चक्क हौद्यात उतरून दंगा करतात. छे! छे! पाहावत नाही ते. कधी कधी तर पाणीच येते डोळ्यांत ती सभापती आणि अध्यक्षांची असहायता पाहून. बिच्चारे! रोज रात्री घरी गेल्यावर गरमागरम हळददुधाने घसा शेकवावा लागत असेल. त्यांचे ते दु:ख, ती वेदना मात्र व्यंकय्याजींनी बरोबर टिपली. त्यांच्या लक्षात आले, की ‘लोकशाही बचावो, लोकशाही बढावो’ असे करायचे असेल, तर आधी सभागृहातील वातावरण सुधारले पाहिजे. खासदारांनी कसे छान वागावे ना गुणी बाळांसारखे! सभागृहात हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून बसावे. सरकार जे करते ते लोकशाहीच्या, देशाच्या भल्यासाठीच ना? त्याला मान डोलावून मान्यता द्यावी. उगाच विरोधबिरोध करण्यात काय हशील? मुळातच विरोधक ही संकल्पनाच रद्द केली पाहिजे. तो विरोधविकासवाद की काय म्हणतात, ती का भारतीय कल्पना आहे? आपल्याकडे कसे साथी हाथ बढाना. एक मोदीजी अकेले थकून जातील. तेव्हा सर्वानी गप्प बसून त्या अवतारपुरुषावरचा विरोधाचा बोजा कमी केला पाहिजे. आपल्या वेळी वेगळी गोष्ट होती. तेव्हा आपण काही सत्तेवर नव्हतो. त्यामुळे लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपल्याला शब्दांची अस्त्रे चालवावीच लागत हौद्यात उतरून. पण आपल्या त्या गोंधळातही संस्कृती होती, वीरता होती, देशहिताची भावना होती. आता तसे काही आहे का? हे विरोधक उगाच लोकशाहीच्या बुलेट ट्रेनला खीळ घालतात आणि म्हणूनच नायडूजींनी ती सूचना केली, की खासदार हौद्यात उतरले रे उतरले की झालेच त्यांचे निलंबन, अशी नवी दुरुस्तीच संसद नियमावलीत करायला हवी. झालेच तर या गोंधळी खासदारांना चारचौघांत बदनाम करायला हवे. नायडूजींच्या त्या सूचनेने खरोखरच लोकशाही मनापासून मोहरून गेली. तिला वाटले, बस्स. आता अच्छे दिन येणार आपल्यालाही..