ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर विविध अफवा पसरत असल्यामुळे रुग्णालय प्रशासन त्यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिनद्वारे वेळावेळी माहिती देते आहे. त्यानुसार, रविवारी रुग्णालय प्रशासनाने त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा उत्तम असल्याचे सांगितले. विनोद खन्ना यांचा अशक्त अवस्थेतील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या चर्चा रंगल्या. या चर्चा एवढ्यावर न थांबता त्यांच्या निधनाची अफवा पसरल्याचे पाहायला मिळाले होते. पण विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटल्यानंतर बॉलिवूडकर आणि त्यांच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी विनोद खन्ना यांची तब्येत बरी असल्याची माहिती त्यांचा मुलगा राहुल खन्ना याने दिली होती. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी त्यांची खूप चांगली काळजी घेत आहेत. त्यामुळेच त्यांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असल्याने लवकरच त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल, असे राहुल म्हणाला होता. दरम्यान, विनोद खन्ना यांना आणखी किती दिवस उपचारासाठी रुग्णालयात राहावे लागेल, याबाबत अद्याप काहीही समजले नाही. विनोद खन्ना यांना मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचे समजते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अमिताभ यांच्यासोबतचा ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट देखील चांगलाच गाजला. याशिवायही त्यांनी अनेक चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली आहे.