प्रसिध्द पत्रकार बरखा दत्त यांनी एनडीटीव्हीच्या सल्लागार संपादक पदावरून राजीनामा दिला आहे. गेली २१ वर्ष एनडीटीव्हीमध्ये पत्रकार म्हणून देशात तसंच जगात आपल्या पत्रकारितेने नाव कमावणाऱ्या बरखा दत्त आता स्वत:ची मीडिया कंपनी सुरू करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनीही त्यांच्या ट्वीटमधून असंच सुचवलं आहे,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

१९९५ साली एनडीटीव्हीमध्ये पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात करणाऱ्या बरखा दत्त यांनी त्यांच्या आक्रमक शैलीने सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. इंग्लिश पत्रकारितेमध्ये  त्यावेळी मोजकीच नावं आघाडीवर होती. त्यात बरखा दत्त यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जायचं. महिलांना आजही पत्रकारिता करायला घरातून आणि समाजाकडून विरोधाचा सामना करायला लागत असताना गेली दोन दशकं बरखा दत्त यांचा आवाज देशातल्या अनेक प्रश्नांवर अधिकारवाणीने भाष्य करत होता. या संपूर्ण काळात महिलांसाठी त्या एक आयकाॅन होत्याच पण निर्भिडतेने पत्रकार करू पाहणाऱ्या अनेकांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या. १९९९ सालच्या कारगिल युध्दाच्या वेळेस बरखा दत्त यांचं थेट रिपोर्टिंग देशभर पाहिलं गेलं.आज मीडियानमध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकारांची एक संपूर्ण पिढीच बरखा दत्त यांच्यासारख्या पत्रकारांना पाहत पुढे आली आहे.

बरखा दत्त यांच्यावर अनेकदा टीकाही झाली. राडिया टेप्स प्रकरणात त्यांचं नाव वरचेवर घेतलं जाऊ लागल्यानंतर दत्त यांच्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं. तसंच २६/११ च्या हल्ल्यांच्या वेळेस ताज आणि ट्रायडंट हाॅटेलच्या बाहेर उभं राहून केलेल्या लाईव्ह रिपोर्टिंगवरूनही त्यांना सगळ्यांनी लक्ष्य केलं. भारतातल्या मीडिया क्रांतीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांच्या लाईव्ह रिपोर्टिंगमुळे दहशतवाद्यांना माहिती कळल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.

‘टाईम्स नाऊ’ चे माजी संपादक अर्णब गोस्वामी आधी एनडीटीव्हीमध्ये काम करत असल्यापासून बरखा दत्त त्यांच्या सहकारी होत्या. पण टेलिव्हिजन पत्रकारितेच्या शैलीविषयी या दोघांमध्ये मतभेद असल्याचं काही महिन्यांपूर्वी दिसून आलं. दोघांकडूनही एकमेकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव न घेता टीका करण्यात आली. अर्णब गोस्वामी आता टाईम्स नाऊमधऊन बाहेर पडून ‘रिपब्लिक’ या नावाने स्वत:चं मीडियाहाऊस उभं करत आहेत. गेले काही दिवस या ना त्या कारणामुळे रिपब्लिक चर्चेत होतंच. आता बरखा दत्त यांनी ही असेच संकेत दिल्याने एकमेकांशी मतभेद असणारे हे एकेकाळचे सहकारी यापुढे एकमेकांविरूध्द थेट उभे राहत आहेत की काय असंच वाटायला लागलंय

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barkha dutt quits ndtv might start a new venture
First published on: 15-01-2017 at 20:32 IST