एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना रस्त्यावर मात्र पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कायदा सुव्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घेत आहेत. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी रस्त्यांवर २४ तास दक्ष असणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अनेक योद्ध्यांनाही करोनाची लागण झाली आहे. हे सर्व लक्षात घेता आता बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने मुंबई पोलिसांना सॅनेटायझर देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे हृतिकने मदत केल्याचे सांगितले आहे. ‘ऑन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांना हॅण्ड सॅनेटाझर पाठवल्याबद्दल हृतिक तुझे आभार’ असे हृतिकचे आभार मानणारे ट्विट मुंबई पोलिसांनी केली आहे.

यापूर्वी हृतिकने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी N95 व FFP3 मास्कचे वाटप केले होते. त्याने सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली होती. ‘अशा कठीण परिस्थितीत आपल्या समाजाची व शहराची काळजी घेणाऱ्यांची आपण जमेल तशी मदत करायला हवी. मी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करणार आहे’ असे म्हणत हृतिकने ट्विट केले होते.