इंदूर : गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला मंगळवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. डावखुऱ्या रायली रूसोच्या (४८ चेंडूंत नाबाद १०० धावा) अप्रतिम शतकाच्या जोरावर आफ्रिकेने हा सामना ४९ धावांनी जिंकला.

इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २२७ अशी मोठी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना भारताचा डाव १८.३ षटकांत १७८ धावांत आटोपला.   

भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने मालिकेत विजयी आघाडी मिळवली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताने संघात काही बदल केले. भारताने या सामन्यात सहा गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, रविचंद्रन अश्विनचा अपवाद वगळता भारताच्या सर्व गोलंदाजांनी ११ हून अधिकच्या धावगतीने धावा दिल्या. हर्षल पटेल (०/४९), दीपक चहर (१/४८), मोहम्मद सिराज (०/४४) आणि उमेश यादव (१/३४) हे चारही वेगवान गोलंदाज महागडे ठरले. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने एका षटकात १३ धावा दिल्या. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी भारताची चिंता वाढली आहे.

आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बव्हुमा (३) तिसऱ्या सामन्यातही अपयशी ठरला. मात्र, क्विंटन डीकॉक (४३ चेंडूंत ६८) आणि रूसो यांनी आक्रमक शैलीत खेळताना ९० धावांची भागीदारी रचली. रूसोच्या नाबाद १०० धावांच्या खेळीत ७ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकांत डेव्हिड मिलरनेही (५ चेंडूंत नाबाद १९) फटकेबाजी केल्याने आफ्रिकेला २२० धावांचा टप्पा ओलांडता आला.

प्रत्युत्तरात भारताने सुरुवातीपासून ठरावीक अंतराने गडी गमावले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने (२१ चेंडूंत ४६) काही चांगले फटके मारले. मात्र, त्याला इतरांची फारशी साथ लाभली नाही. अखेरीस दीपक चहर (१७ चेंडूंत ३१) आणि उमेश यादव (१७ चेंडूंत नाबाद २०) यांनी भारताचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश मिळाले नाही.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ३ बाद २२७ (रायली रूसो नाबाद १००, क्विंटन डीकॉक ६८; उमेश यादव १/३४) विजयी वि. भारत : १८.३ षटकांत सर्वबाद १७८ (दिनेश कार्तिक ४६, दीपक चहर ३१; ड्वेन प्रिटोरियस ३/२६, केशव महाराज २/३४, वेन पार्नेल २/४१)

’ सामनावीर : रायली रूसो

’ मालिकावीर : सूर्यकुमार यादव

१००*