बेरोजगारीच्या समस्येवरून रोजच्या रोज नवनवे वाद उभे राहत असताना प्रत्येक नोकरी इच्छुक व्यक्ती “कुठे एकदाचा इंटरव्ह्यू क्लिअर करतोय” याची वाट पाहत असतो. पण सारासार विचार न करता समोर येणाऱ्या कोणत्याही संधीला स्वीकारणे हे आपल्या भविष्यासाठी धोक्याचे ठरू शकते. डिजिटल जगात नोकरीच्या अनेक संधी आपल्याला सोशल मीडियावर दिसतात, अनेकदा आपण तिथे अर्ज करतो, आपल्याला मुलाखतीला बोलावलं जातं, अगदी अधिकृत वाटावं अशाच पद्धतीने सर्व प्रक्रिया पार पडते मात्र जेव्हा तुम्ही कामावर रुजू होता तेव्हा भलतंच चित्र डोळ्यासमोर येतं. सांगितलेल्या वेळेपेक्षा कित्येक पट अधिक काम अंगावर येणे, वेळेवर पगार न देणे, पगारामध्ये विनाकारण कपात होणे अशा अनेक तक्रारी मागील काही काळात अनेकदा समोर आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा नोकरीच्या इंटरव्ह्यू मध्ये फसवणूक म्हणजे अर्जाचे पैसे मागणे इतकेच आपल्याला वाटू शकते. पण सर्व काही प्रक्रिया वैध पद्धतीने होत आहे का हे पाहणेही गरजेचे असते कारण यातूनच आपले त्या कंपनीसोबतचे भविष्य ठरणार असते.

आता आपण असे काही मुद्दे पाहणार आहोत जे तुम्ही इंटरव्ह्यू फेरीत धोक्याचे संकेत म्हणून आवर्जून लक्षात घ्यायला हवेत.

१) कामाविषयी अस्पष्ट माहिती

तुम्हाला काय काम करायचे आहे? तुमच्यासोबत किती जणांची टीम असणार आहे किंवा तुम्हाला एकट्याला काम सांभाळावे लागणार आहे का? कामाची वेळ कशी असणार आहे? तुमच्या मूळ कामाशिवाय तुम्हाला कोणत्या गोष्टी करणे अपेक्षित आहे? हे सर्व प्रश्न विचारून घेणे आवश्यक आहे. यावर जर का आपल्याला तुम्ही काम सुरू केल्यावर बघू किंवा तुम्हाला रोज जे सांगितले ते जाईल ते करावे लागेल अशी उत्तरं दिली गेली तर तुम्ही वेळीच सावध व्हा.

२) रुजू होण्याची घाई

काही वेळा कंपनीला अगदी त्वरित कामावर रुजू होतील असे कर्मचारी हवे असतात, त्यात गैर नाही मात्र आवश्यक कागदपत्रे मिळाल्याशिवाय घाई करू नका. जर तुम्ही कंपनी बदलत असाल तर नव्या कंपनीत रुजू होण्याआधी व आधीच्या कंपनीतून रिजाईन करण्याआधी ऑफर लेटर घ्या, ज्यात तुमच्या नव्या कामाचे स्वरूप, पगार, व अन्य नियमावली नमूद करून एकाप्रकारे शिक्कामोर्तब केले जाते. जर का तुम्हाला आवश्यक व्यवहार होण्याआधी काम सुरू करण्याची घाई केली जात असेल तर सावधान!

३) अवाजवी नफ्याचे रेकॉर्ड

इंटरव्ह्यूला जाण्याआधीच त्या कंपनीविषयी पूर्ण माहिती घ्या. केवळ कामच नाही तर त्या कंपनीचे नफ्याचे साधारण रेकॉर्ड्स तपासून पहा. अलीकडे अनेक स्टार्टअप्स मध्ये अवाजवी मिळकत वा नफा दाखवला जातो, हे आकडे चुकीचे जरी नसले तरी ते प्रत्येक वेळी होणाऱ्या फंडिंग नुसार बदलू शकतात. जर का कंपनीच्या नफ्याचा एक स्थिर आकडा उपलब्ध नसेल तर कामाच्या स्थिरतेवर प्रश्न उभा राहतो. हे सर्व प्रश्न आपण विनम्रपणे मुलाखतकाराला विचारू शकता.

४) उडवाउडवीची उत्तरे

सर्वात सामान्य उदाहरण म्हणजे, कामाची वेळ किती असणार? आणि त्यावर मिळणारं उत्तर म्हणजे बघू! कॉर्पोरेट जगात शिफ्ट पलीकडे काम करण्याचा ट्रेंड आहेच मात्र तुम्हाला अधिक वेळेचा मोबदला मिळतोय का? हे ही तपासून घेणे गरजेचे आहे. विशेषतः पगाराच्या तारखेबाबत ‘बघू’ किंवा पहिल्या दुसऱ्या आठवड्यात अशी उत्तरे सुद्धा फार विश्वसनीय नसतात. तुमच्या सर्व प्रश्नांवर एचआर किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर देणे बंधनकारक असते त्यावर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नसल्यास सावधान!

५) अनौपचारिक माध्यमातून संवाद

शक्य असतील तितके व्यवहार ई- मेल च्या माध्यमातून करून घ्या. लिखित स्वरूपात असल्यास उत्तम. पण जर का तुम्हाला केवळ फोनवर किंवा अधिकृत ऑफिस व्यतिरिक्त इतरत्र बोलावून मीटिंग घेतली जात असल्यास सतर्क रहा. सुरुवातीला जर तुमचे संभाषण कॉल किंवा मॅसेज वरून होत असतील तरी अधिकृत माहिती ई मेल आयडीवर सुद्धा मागून घ्या.

६) अनौपचारिक कागदपत्र

वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही कामावर रुजू होण्याआधी ऑफर लेटर व कंपनी नियमावलीचे माहितीपत्र असणे आवश्यक आहे.या ऑफर लेटर वर कंपनीचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक ही माहिती असणे गरजेचे आहे. आपल्याला कोऱ्या कागदावर ऑफर लेटर दिले जात नाही. तसेच संबंधित एचआर व अधिकाऱ्यांची सही सुद्धा तपासून पहा.

अनेकदा आपल्याला नोकरी मिळाल्याचा आनंद इतका असतो की त्यातील बारकावे आपण तपासायला विसरतो. यातूनच पुढे मानसिक तणाव व अनेकदा आर्थिक नुकसानही होऊ शकते. त्यामुळे जितक्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तयार करत आहात तितकेच अधिकाऱ्यांना विचारण्याचे प्रश्नही तयार करा. ऑल द बेस्ट!

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview hacks 6 signs to look out when joining a new firm svs
First published on: 02-08-2022 at 17:10 IST