पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना फक्त प्रश्न विचारण्याची सवय आहे. पण मध्य प्रदेशसाठी त्यांनी काय केले हे नाही सांगत. काँग्रेसच्या राज्यात मध्य प्रदेशमध्ये सगळीकडे अंधार पसरला होता. लोकांमध्ये फक्त निराशा होती. पण मागील १५ वर्षांत मध्य प्रदेशमध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी झाबुआ येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या काळात फक्त स्वप्ने दाखवली जात. त्यांच्या काळात कर्ज मेळावे भरत होते. पण आज लोक मुद्रा योजनेच्या माध्यमातून पुढे जात आहेत. आम्ही विकास आणि विचार करण्याचा मार्ग बदलला आहे. आधी लोकांना अंधारात जगण्याची सवय लागली होती. पण आज चित्र बदलले आहे. मध्य प्रदेशमध्ये ज्यांनी तुम्हाला अंधारात टाकले, पुन्हा तसेच सरकार सत्तेवर यावे, असे वाटते का, असा सवाल त्यांनी केला. मागील ५० वर्षांत या राज्यात जे झाले नाही. ते मागील १५ वर्षांत झाल्याचे ते म्हणाले.

जे सरकार तुमच्या मुलांना त्रास देते ते काय कामाचे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेने गावातील चित्र बदलले आहे. काँग्रेसच्या काळात गावातील लोक रस्त्यांसाठी आसुसलेले होते. पण भाजपा सरकारने विचार करण्याची पद्धत बदलल्यानंतर मध्य प्रदेशातील या परिसरात विकासाची मोठी कामे झाली. आधी विकासाचा अर्थ माती टाका आणि त्याला रस्ता माना, असा होता, असा टोलाही त्यांनी लगावला. मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya assembly election 2018 pm narendra modi slams on congress
First published on: 20-11-2018 at 14:40 IST