scorecardresearch

रवी पुजारी गँगच्या नावे धमकावणाऱ्या एकाला अटक

विवेक प्रॉडक्शन हाऊसच्या संचालिकेशी मैत्री करून नंतर त्यांनाच धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सत्येंद्र त्यागी

विवेक प्रॉडक्शन हाऊसच्या संचालिकेशी मैत्री करून नंतर त्यांनाच धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात सत्येंद्र त्यागी आणि कमालसिंग राजपूत उर्फ कमालुद्दीन यांना अटक करण्यात आली. विवेक प्रॉडक्शन हाऊसच्या संचालिकेसोबत सत्येंद्र त्यागी याने ओळख करून घेतली आणि मैत्रीही केली. गाझियाबादमध्ये आपण बांधकाम व्यावसायिक असून आपला जमिनीचा व्यवसायही आहे असे सत्येंद्रने तिला सांगितले. तसेच आपल्याला सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचेही त्याने या संचालिकेला सांगितले. काही दिवस बरे गेल्यानंतर सत्येंद्र या संचालिकेलाच धमकी देऊ लागला आणि आपण रवी पुजारी गँगचा हस्तक असल्याचे सांगू लागला. या प्रकरणी पोलिसांनी सत्येंद्र त्यागी आणि त्याचा साथीदार कमालुद्दीन या दोघांना अटक केली. या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले. या दोघांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

विवेक प्रॉडक्शन हाऊसच्या संचालिकेसोबत ओळख झाल्यानंतर कलाकार म्हणून आपल्याला काम दिले तर मी तुम्हाला ५० लाख रुपये देईन असे सत्येंद्रने या महिलेला सांगितले. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ३० लाख रुपये देईन आणि त्याआधी २० लाख रुपये देईन असा तोंडी करारही झाला. ठरल्याप्रमाणे संचालिका महिलेने सत्येंद्र त्यागीला काश तुम होते या सिनेमात कामही दिले. मुंबईत शुटिंग असल्याने सिनेमाचे बजेट वाढले. सत्येंद्र त्यागी मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने सहाय्यक सुरेंद्रला हाताशी धरले आणि मनमानी करू लागला. सेटवर रोज नवीन मुलींना आणण्यासही सुरुवात केली. फिर्यादी संचालिका महिला घरी नसताना तो तिच्या घरीही गेला. त्याच्यासोबत तेव्हा आणखी एक नवीन मुलगीही होती. या संदर्भात महिलेने त्याला जाब विचारला असता मी तुझ्या सिनेमासाठी ३५ लाख रुपये खर्च केले आहेत. आता मी काहीही करू शकतो. तुझे घर, वस्तू, ऑफिस, कार सगळे वापरू शकतो असे सत्येंद्रने या महिलेला धमकावले.

१२ डिसेंबर २०१६ला या महिलेला तीन वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल आले. या सगळ्यामध्ये तिचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली. तसेच एका क्रमांकावरून एक लाखाच्या बदल्यात शरीरसुखाचीही मागणी करण्यात आली. सत्येंद्र त्यागीचा सिनेमाचे कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्यासोबतही वाद झाल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले. आता या प्रकरणी सत्येंद्र आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून या दोघांची कसून चौकशी सुरु आहे.

 

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police arrested to members of ravi pujari gang for extortion

ताज्या बातम्या