पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आज शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका सामान्य माणसाला राज्यातील सर्वोच्च पदासाठी निवडल्याबद्दल काँग्रेस हायकमांडचे आभार मानताना ते भावूक झाले. चन्नी म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वाने एका सामान्य माणसाला मुख्यमंत्री बनवले आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना क्रांतिकारी नेते म्हटलंय. पक्षाचं पहिलं निवडणूक वचन म्हणून गरिबांची पाणी बिलं माफ करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

चन्नी म्हणाले, “मी सामान्य माणूस आहे, इतर पक्ष केवळ सामान्य माणसाबद्दल बोलत असताना सामान्य माणून इथे बसला आहे. हे सामान्य माणसाचे सरकार आहे. पंजाबसाठी या सरकारला अनेक महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. मी सामान्य माणूस, शेतकरी आणि दडपशाहीला बळी पडलेल्या लोकांचा प्रतिनिधी आहे. मी श्रीमंतांचा प्रतिनिधी नाही. जे वाळू उत्खनन आणि इतर बेकायदेशीर कामं करतात, त्यांनी माझ्याकडे येऊ नये, मी तुमचा प्रतिनिधी नाही,” असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, काँग्रेसने मला अशा ठिकाणी आणून बसवलंय जिथे पोहोचण्याचा मी कधीच विचार करू शकलो नाही, असं म्हणत ते भावूक झाले आणि त्यांनी त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगितली. ते म्हणाले, की “माझे वडील इतरांच्या घरांचे तंबू लावायचे. राहुल गांधी हे क्रांतिकारी नेते आहेत आणि  त्यांचे विचार क्रांतिकारी आहेत. तो एकमेव असा माणूस आहे जो गरीबांबद्दल बोलतो.” शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ केली जातील, अशी घोषणा चन्नी यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता, तो पुन्हा जोडला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, की “कामगारांनी त्यांचे संप संपवावेत, मी लवकरच त्यांच्या सर्व मागण्यांकडे लक्ष देईन. एवढेच नाही तर त्यांनी केंद्र सरकारला कृषी कायदे रद्द करण्याची विनंती केली आहे. तसेच पोलीस सामान्य लोकांना त्रास देणार नाहीत. अधिकारी सामान्य लोकांच्या प्रत्येक तक्रारी ऐकतील, आज आदेश लवकरच जारी केले जातील,” असंही चन्नी म्हणाले.

तसेच पक्ष सर्वोच्च आहे, मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ नाही. सरकार पक्षाच्या विचारसरणीनुसार काम करेल. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या लोकांसाठी चांगले काम केले आहे. आम्ही त्यांचे काम पुढे नेऊ, असंही चन्नी यांनी म्हटलंय.