महापालिका मुख्यालय इमारतीवर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवशिल्पाशेजारीच असलेल्या भिंतीवर दोन भले मोठे भगवे झेंडे लावण्यात आले असून यामुळे शिवशिल्पाच्या निमित्ताने पालिकेवर निवडणुकांच्या आधीच ‘भगवा’, अशी खमंग चर्चा निवडणुकीच्या तोंडावर शहरात सुरु झाली आहे. याशिवाय, पालिकेच्या प्रवेशद्वारावर वाघाचे चित्र रेखाटण्यात आले असून यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीवर यापूर्वीच शिवशिल्पाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही प्रतिकृती जुनी असल्यामुळे ती धोकादायक बनली होती. त्यामुळे ही प्रतिकृती काढून त्या जागी नवीन शिवशिल्पाची प्रतिकृती उभारणी करण्याची मागणी होत होती. ही मागणी मान्य करत तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामाचा प्रस्ताव तयार केला होता. तसेच त्यासाठी निधीचीही तरतूद केली होती. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर जुनी प्रतिकृती काढून नवीन शिवशिल्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेशद्वारालगतच्या भिंतीवर वाघाचं चित्र

काही दिवसांपूर्वीच हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे लोकार्पण करण्यात आले. या शिवशिल्पाशेजारीच असलेल्या भिंतीवर आता दोन भले मोठे भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. यापूर्वीच्या शिवशिल्पाशेजारी भगवे झेंडे लावण्यात आलेले नव्हते. त्यातच येत्या काही महिन्यात पालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवशिल्पाच्या निमित्ताने पालिकेवर ‘भगवा’ अशी खमंग चर्चा शहरात सुरु झाली आहे. त्यातच पालिका मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंतींवर वारली पेंटिंग, तसेच इतर चित्र रेखाटण्यात आले असून त्यामध्ये प्रवेशद्वारालगतच्या भिंतीवर वाघाचे मोठे चित्र रेखाटण्यात आले आहे. या चित्रामुळेही शहरात वेगवेगळी चर्चा रंगली आहे.