अंबरनाथ: नदीत बुडणाऱ्या अनोळखी व्यक्तीला वाचवण्यासाठी दोन तरुणांनी नदीत उडी घेतली. यात तो व्यक्ती वाचला सुद्धा. मात्र वाढता पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचा अंदाज न आल्याने वाचवणाऱ्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील आंबे गावाजवळ मलंगड नदीत या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला अंकित जैस्वाल  (१९ ) आणि निखिल कनोजिया (१९ ) अशी या तरुणांची नवे असून ते डोंबिवलीतून येथे पावसाळी सहलीसाठी आले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

डोंबिवलीतील १२ महाविद्यालयीन तरुणांनाच समूह सोमवारी दुपारी मलंगगड नदीत भागात पावसाळी सहलीसाठी आले होते. आंभे गावाजवळील बंधाऱ्याजवळ मलंगगड नदीत यातील काही तरुण पोहण्यासाठी उतरले होते. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागली. त्याला वाचवण्यासाठी अंकित आणि निखिल नदीपात्रात गेले होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघांना पाण्या अंदाज आला नाही. त्यामुळेच दोघे पाण्यात बुडाले.

नक्की वाचा >>>>Maharashtra Political Crisis Live :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना, अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

स्थानिक गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांचा शोध सुरू केला होता. हिललाईन पोलीस ठाण्याचे रणजित ढेरे  यांनी आपल्या पोलीस सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधून बाहेर काढले. ते उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्तीसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या दोन तरुणांच्या मृत्यूनंतर आता हळहळ व्यक्त होते आहे.