जांभूळवाडीसारख्या मोठय़ा गावात पंचायत समितीला अण्णासाहेबांचा उमेदवार कधीच पडलेला नाही. आपण उभे राहिलो असतो तरी निवडून आलो असतो आणि आता काशीबाई उभी राहिली तरी ती निवडून येणार यात शंका नाही. मनातल्या मनात भविष्यातील काशीबाईची विजयी मिरवणूक मोठय़ा कष्टी मनानी पाहातच त्याने अण्णासाहेबांचा निरोप घेतला.

अण्णासाहेबांनी पंचायत समितीसाठी आपला, आपल्या पक्षाचा एकेक उमेदवार निश्चित केला. सगळे आपल्या आवाक्यातले. डोईजड होणार नाही असे. पाहिजे तसे वळवता येणारे.
पण जामगाव गणाच्या उमेदवारासंबंधात मात्र विद्या एक दिवस अण्णासाहेबांकडे गेली. बरोबर दोन-तीन स्त्रियासुद्धा होत्या. त्यांच्याकडे बघून अण्णासाहेबांच्या चाणाक्ष नजरेने विद्या कशाला आली असेल हे बरोबर हेरलं.
त्यातल्या एक जणीला अण्णासाहेबांच्या पुढं उभं करून विद्या म्हणाली,
‘‘अण्णा, ही अलका, साक्षरतेच्या कामात पहिल्यापासून माझ्याबरोबर होती. शिकलेलीसुद्धा आहे चांगली. आणि समाजकार्याची आवडही आहे.’’
‘‘मग?’’
अण्णासाहेब हे मला कशाला सांगतीस, अशा स्वरात बोलले. विद्याला ते थोडं खटकलं. पण त्याचा विचार करत न बसता ती पुढं बोलायला लागली. म्हणाली,
‘‘तिला आपण आपल्या पक्षाकडून पंचायत समितीला उभी केली असती तर…’’
‘‘इथंल्या उमेदवाराची निवड झाली आहे. पुढं ग्रापंचायतीच्या निवडणुकीला बघू.’’
‘‘पण…’’
विद्याने पुढं बोलण्याचा प्रयत्न केला.
 ‘‘आता काहीच करता येणार नाही.’’
अण्णासाहेबांनी तिला बोलूनच दिलं नाही. आणि बोलण्यातही काही अर्थ नाही हे विद्याला कळून चुकलं. पण तरीही आमदारांच्या जामगावचा उमेदवार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिनं विचारलं,
‘‘नाव कळेल का इथल्या उमेदवाराचं?’’
‘‘दोन दिवसांनी सगळीच नावं जाहीर करणार आहोत आम्ही. पण तरी सुद्धा इथला उमेदवार तुला आज कळायला हरकत नाही… इथं कांबळेसरांना संधी देतोय आपण.’’
विद्याला डोक्यावर कोणीतरी प्रहार केल्यासारखं झालं. पण एकही शब्द न बोलता, राग गिळून ती अण्णासाहेबांच्या समोरून चालती झाली.
तिथं बसलेले चेअरमन आणि पुढारी मात्र अण्णासाहेबांच्या या बोलण्याने गोंधळात पडले. त्यांच्या चेहऱयावरच्या शंकेचं निरसन मग अण्णासाहेबांनीच केलं. म्हणाले,
‘‘आश्चर्य वाटलं ना? घडतं असं. मला तरी कांबळेसर योग्य वाटतात इथं. तुमची काही हरकत?’’
‘‘आमची काय हरकत असणार आहे. पण आम्ही इथं सतू पहिलवाणाला धरून चाललो होतो.’’
चेअरमन थोडं चाचरत बोलला. पण पुढं लगेच चेअरमनला काय म्हणायचं आहे ते पुढाऱयाने धीटपणे सांगितलं. म्हणाला,
‘‘गावातले तरुण कार्यकर्ते तरुणांना संधी द्या म्हणून हटून बसलेत. सतूला संधी दिली असती, तर कोणी नाराज झालं नसतं. म्होरक्या आहे तो सगळ्यांचा.’’
अण्णासाहेबांनी पुढाऱयाचं बोलणं शांतपणे ऐकूण घेतलं. बराच वेळ डोकं खाजवत विचारमग्न असल्यासारखे बसले. चेअरमन पुढारीही ते काय बोलतात ते ऐकण्यासाठी कान लावून बसले.
मग गंभीर आवाजात पण शांतपणे अण्णासाहेब बोलायला लागले. म्हणाले,
‘‘पुढारी, बरोबर आहे तुमचं म्हणनं, तरुणांना संधी दिली असती तर पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने ते आपल्याला फायद्याचंच होतं. सतूसारखे दहा-वीस तरूण हाताशी असतील तर रान चांगलं उठवता येतं. गोडीगुलाबीनेही घेता येतं आणि धाक दडपशाहीनेही घेता येतं. सगळ्याच गोष्टी सरळ मार्गाने होत नाहीत. अशा वेळी हे गरम रक्त उपयोगी पडतं. सतू पहिलवाण त्यासाठी चांगला होता. थोडय़ा दबदब्यासाठी दारात अर्ध्या डोक्याची माणसं असणं बरं असतं. एकदम कोणी घरात घुसण्याचा प्रयत्न करत नाही…’’
‘‘तेच आमचं सुद्धा म्हणनं होतं. तुमच्या कृपेने तो दोन वर्षे कोल्हापूरला राहिला. रेडय़ासारखं शरीर झालंय ते तुमच्या पैशावर. त्या जाड कातडय़ाचा चांगला उपयोग करून घेता आला असता.’’
चेअरमन मध्येच अण्णासाहेबांनी सतूवर केलेल्या उपकाराची आठवण करून द्यायला लागला.
पण अण्णासाहेबसुद्धा अशा गोष्टी सहजासहजी विसरणारे नव्हते. त्यांनी मनात कोणता तरी हेतू ठेवूनच सतूला मदत केलेली असणार. कधी काठी चालवायची वेळ आली तर ती काठी चालवण्यासाठी मजबूत हात आपल्याकडे असावेत, एवढा मुत्सद्दीपणा त्यांच्याकडे आहे.
तरीसुद्धा सतूला डावलण्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असणार. कारण अनेक वर्षे राजकारण खेळलेल्या अण्णासाहेबांची चाल नेहमी विचारपूर्वकच असते. कांबळेसरांना उभं करण्यामागचा खुलासा मग त्यांनीच केला. म्हणाले,
‘‘मंडळी, सतूलाच उभा करण्याच्या विचारात होतो मी. पण गावच्या युवक मंडळाच्या पोरांशी त्याची भांडणं आहेत. गावच्या विकास योजनांमध्ये गैरप्रकार झाला, म्हणून त्यांच्यात्यांच्यात हाणामाऱयाही झाल्या. तुम्हाला माहीतच आहेत त्या. नंदाच्या नवऱयाने सतूला हाताशी धरला होता. हे तुमच्याकडूनच कळलं होतं मला मागे.’’
 ‘‘पण त्याने काय फरक पडतोय. कुणाची टाप आहे सतूच्या पुढं बोलण्याची.’’
पुढारी मध्येच आपल्या पोकळ आत्मविश्वासाने बोलला. पण आपण या संदर्भात अजून किती कच्चे आहोत, हे अण्णासाहेबांच्या पुढच्या बोलण्यातून त्याच्या लक्षात आले. ते म्हणाले,
‘‘पुढारी, या युवक मंडळाचा अध्यक्ष रोहिदास आहे. शहरात राहून नजर उघडी करून आलेलं पोरगं आहे ते…’’
‘‘मंग काय, त्यालाच उभं करण्याचा विचार होता की काय तुमचा?’’
चेअरमनने आपली शंका उपस्थित केली.
‘‘केलाही असता. पण ते आपल्या दावणीचं जनावर नाही. बळं बांधून ठेवलं तरी दावं तोडून जाईल, नाहीतर हिसके देऊन जीव देईल! चेअरमन, आपल्याला रोहिदाससारखी आदर्शवादी लोकं नकोत. आदर्श राजकारणाला बाधक आहे. जीवनात तत्त्व असणं वाईट नाही. पण त्याला कवटाळून बसून राहणं वाईट. अशी लोकं इथं तोंडघशी पडतात. मग परत कधी उठतच नाहीत. इथं जास्त भावनिक होऊन चालत नाही. कधीकधी भावनांचा बाजार मांडून व्यापार करावा लागतो. भावनेत अडकला की संपला… रोहिदास त्या साच्यात घडलाय. अशी लोकं आपल्याकडं असणं आपल्यालाच धोकादायक आहे.. म्हणून तर युवक मंडळाचा प्रस्ताव मी नाकारला.’’
‘‘कसला प्रस्ताव?’’
पुढाऱयाने उत्सुकतेनं विचारलं. तसे अण्णासाहेब युवक मंडळाच्या तरुणांनी दिलेलं लेखी निवेदन हातात घेऊन, त्याकडे बघत बोलायला लागले. म्हणाले,
‘‘या वेळेस पंचायत समितीला तरुणांना संधी द्यायची झाल्यास रोहिदासचा विचार व्हावा. गुंडांना पाठीशी घालून  गावच्या लौकिकास बाधा येईल आणि सामान्य लोकांचा आपल्यावरील विश्वास कमी होईल, असे वर्तन आपल्याकडून घडू नये. ही विनंती.’’
आतून रागाने भरलेले अण्णासाहेब बोलताना मात्र हसत हसतच बोलले.
पुढारी मात्र आपला राग दाबून ठेवू शकला नाही. तो तावाने बोलायला लागला. म्हणाला,
‘‘हे त्या निवेदनात कुणी लिहिलंय? रोहिदासाने?’’
‘‘हे कुणी लिहिलंय त्याला महत्त्व नाही. महत्त्व आहे ते गावच्या युवक मंडळातील तरुणांच्या मानसिकतेला. त्यांची मानसिकता अशी घडणं आपल्याला धोकादायक आहे. त्यांनी आमदार, आमदाराच्याच गावात उपरा होईल.’’
 अण्णासाहेब गंभीरपणे बोलले.

(क्रमश:)

– बबन मिंडे