राष्ट्रीय लोकसंघ पार्टीकडून विधानसभेत स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण.
अण्णासाहेब मोहित्यांचा मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव.
पहिल्या पानावरील ठळक अक्षरातील ही बातमी वाचून सर्व तालुकाभर खळबळ उडाली.
विधानसभेत स्त्रियांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा भविष्यात येणार असला तरी, राष्ट्रीय लोकसंघ पार्टीने याचंही मतांवर डोळा ठेवून राजकारण करायचं ठरवलं. आणि कायदा संमत होऊन सरकार देईल तेव्हा देईल म्हणत आपल्या पार्टीत मात्र स्त्रियांचा सन्मान राखला जातो आणि तिला संधीही दिली जाते म्हणत पार्टीकडून आरक्षण देण्याचा नवा पायंडा पाडला.
सत्ता मिळविण्यासाठी एकमेकांवर उठलेल्या एकाच पार्टीतील तालुक्यातील दोन्ही गट बर्फासारखे गार पडले.
अण्णासाहेबांना आपल्या बंडखोरीचा पश्चात्ताप झाला, तर प्रकाशला तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्याचं दु:ख झालं. अण्णासाहेबांना ही बातमी थेट वर्तमानत्र आणि वृत्तवाहिनीवरून समजल्याने आपल्याला आता पार्टीने निर्णय प्रक्रियेतूनही बाहेरचा रस्ता दाखवल्याची जाणीव झाली.
या बातमीने दोन दिवस वादळानंतरच्या शांततेसारखे गेले आणि मतदारांना नव्या उमेदवारांची उत्सुकता लागून राहिली.
अचानक झालेल्या बदलाने प्रकाश अस्वस्थ झाला होता. भाऊंना आणि सरूअाक्काला मात्र थोडय़ा दिवसांसाठी तरी सुटल्यासारखं वाटलं. प्रकाशने असल्या फंदात पडू नये, म्हणून त्यांचा पहिल्यापासून विरोध. पण त्याला राजकारणाने पछाडलं होतं. या राजकारणापायीच आतापर्यंत त्याने चार एकर जमीन घालवली आहे. लग्नानंतर तर ते सोडायचं म्हटलं तरी तो सोडू शकत नव्हता. कारण अण्णासाहेब पडले बायकोचे नातेवाईक. मग दोन्ही घराण्याची तुलना आली. त्यातूनच बायकोपुढे कमीपणाची भावना वाढत गेली.
विद्या प्रकाशची ही मानसिक अवस्था ओळखून नव्हती असं नाही. अगदी लग्नात झालेल्या पाहुण्यांच्या सत्कारापासूनच प्रकाशचा चेहरा त्याच्या मनातलं तिला सर्व सांगत होता. मुलीकडच्या पाव्हण्यांमध्ये आमदार, खासदार. त्यांचे सत्कार मोठय़ा थाटात. आमच्याकडे अशी प्रतिष्ठित मंडळी नाही म्हणून आमचे सत्कार कुतरघाईत उरकले… विद्याला त्याच्या मनातली ही अढी कधी कमी झालेली दिसलीच नाही. उलट ईर्षा मात्र वाढत गेली. आणि आरक्षणाच्या नावाखाली मतांचा खेळ खेळणाऱया पार्टीतल्या नेत्यांच्या नावाने तो खडे फोडायला लागला.
अण्णासाहेबांशी बरोबरी करण्याची संधी स्त्रियांच्या राखीव जागेमुळे हुकली. झालेला संताप व्यक्त करायला दुसरी जागाच नव्हती. मग जो कधी घरात थांबत नव्हता, तो घरात बसून राहायला लागला. सगळं घर डोक्यावर घेऊ लागला. पार्टीला देता येतील तेवढय़ा शिव्या देऊ लागला. अशा पांगुळगाडय़ाचा वापर करून कर्तृत्वाचा टेंभा मिरविणाऱया स्त्रियांविषयीचा राग तो उघडउघड व्यक्त करायला लागला. आपली क्षमता, आपलं कर्तृत्व दाखविण्याची एवढीच हौस असेल, तर पुरुषांशी खुल्या मैदानात लढा, म्हणजे आपली शक्ती आपल्याला आपोआप कळेल. समोरच्याला साखळदंडानी बांधून ठेवायचं आणि बाजी मारल्याचा आनंद लुटायचा. असलाच प्रकार आहे हा.
मनात असे असंख्य विचार येऊन तो अस्वस्थ होत होता. आजपर्यंत स्त्रियांच्या आरक्षणाविषयी त्याने एवढी आगपाखड केली नव्हती. पण आता स्वत:वरच घाला आल्याने त्याला आरक्षणाची किंमत कळली. त्यात किती जणं होरपळत असतील याची जाणीवही झाली.
अस्वस्थ प्रकाश एक दिवस मात्र हताश होऊन घराबाहेर पडला. पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये गेला. तेव्हा विचार करण्याची दिशाच बदललेल्या प्रकाशला कार्यकर्त्यांमधील चर्चा अनपेक्षितच होती. या गोष्टीचा त्याच्या मनाला कधी स्पर्शही झाला नव्हता. निराश झालेल्या त्याच्या मनाला कार्यकर्त्यांमधील चर्चेने पुन्हा उभारी दिली. त्याच्या विचारचक्राने पुन्हा दिशा बदलली. प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष मार्गाने उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा विचार त्याच्या मनात सुरू झाला.
आपल्या घरात अण्णासाहेबांना टक्कर देणारी एवढी मोठी शक्ती आहे याची त्याला जाणीवच नव्हती. ती जाणीव झाली तेव्हा मात्र त्याच्यातला सर्व धूर्तपणा जागा होऊन एकवटला. आणि अण्णासाहेबांनीच वाढवलेल्या शक्तीला त्यांच्याच विरोधात उभी करण्याचा डाव तो मनातल्या मनात रचू लागला.
आता प्रश्न होता तो फक्त विद्याचा. तिला तयार करण्याचा.
तिला हे सर्व सांगण्याच्या विचारानेच तो रात्री घाईघाईने घरी आला. तेव्हा नंदा आणि अलका घरीच येऊन बसल्या होत्या. त्यांच्यासमोर विद्या गोंधळलेल्या अवस्थेत बसली होती. प्रकाश त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाला,
‘‘आज पुढारनी आमच्या घरी कशा?’’
प्रकाशच्या या टोमन्याने नंदाला थोडा राग आला, पण तो राग गिळत हसत हसतच ती प्रकाशला म्हणाली,
‘‘प्रकाशभावजी, आता एक पुढारीण तुमच्या घरातही तयार करण्याच्या विचारात आहे आम्ही.’’
नंदाच्या या वाक्याने प्रकाशला एकदम सर्व गोष्टींचा उलगडा झाला. त्याचं कुत्सित बोलणं एकदम मवाळ झालं. मनातला आनंद तो लपवू शकला नाही. मात्र आपल्याला काहीच कळलं नाही असं दाखवत तो म्हणाला,
‘‘म्हणजे? मी समजलो नाही.’’
अलका मात्र भाबडेपणाने त्याला सांगायला लागली. म्हणाली,
‘‘भावजी, आता आपल्या तालुक्यात राष्ट्रीय लोकसंघ पार्टीचाच आमदार होणार असं सगळे म्हणतात.’’
‘‘मग?’’
‘‘मग काय! आलेल्या संधीचा फायदा घेऊन विद्याने आमदारकीला उभं राहवं असं आम्हाला वाटतंय. तुम्ही पार्टीकडं तशी मागणी केली तर सगळं होईल.’’
‘‘मग तिचं काय मत आहे?’’
प्रकाश अलगद सगळी माहिती काढून घ्यायला लागला. तशी नंदा म्हणाली,
‘‘तिचं काय मत असणार! तिला तुमची परवानगी असली म्हणजे झालं. शेवटी तिच्यावर अधिकार तुमचाच.’’
मग प्रकाश आपली काहीच हरकत नाही. ती तिचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. असा स्त्री पुरस्कर्त्यांचा आव आणत बोलायला लागला. म्हणाला,
‘‘आपण एकविसाव्या शतकात आलो आहोत. आता स्त्री पुरुषांच्या अधिकाराखाली राहिलेली नाही. ती तिची स्वतंत्र आहे. तिला जसं हवं तसं ती वागेल.’’
विद्याने प्रकाशकडे आश्चर्याने पाहिलं. पार्टीचा निर्णय जाहीर झाल्यापासून कालपर्यंत स्त्रियांवर आग पाखड करणाऱया प्रकाशमधला हा बदल तिला गोंधळात टाकणारा होता. पण या मागेही काहीतरी हेतू असणार हे तिनं आजवरच्या अनुभवावरून बरोबर हेरलं. म्हणून ती प्रकाशला काहीच न बोलता नंदाकडे पाहात म्हणाली,
‘‘तू गावाच्या राजकारणात पडून काय वेगळं केलंय, तेव्हा मी विधानसभा लढवून राज्याच्या राजकारणात पडून करणार आहे. तुमची गावात जी अवस्था आहे तीच माझी तालुक्यात होणार. आणि सगळ्या राज्यात हसू होणार. पुरुषांच्या इशाऱयावर बाहुलीसारखं नाचणं मला नाही जमणार.’’
‘‘पण तुझा आमच्यासारखा उपयोग करून घेणारं कोण आहे?’’
नंदाने विचारलेल्या प्रश्नाने विद्या प्रकाशकडे पाहून गप बसली. तशी नंदा पुन्हा बोलायला लागली. म्हणाली,
‘‘उलट तुझ्यामुळे आमच्यासारख्या स्त्रियांना आधार मिळेल.’’
‘‘राजकारणातल्या प्रस्थापितांनी मला नीट ठेवली तर मी तुम्हाला आधार देईल ना! आणि दुसऱयाच्या आधारावर मला तग नाही धरता येत बाई. म्हणून म्हणते अगोदर आपण सक्षम झालं पाहिजे. त्यांचे हुकूम झिडकारण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. तरच आपल्याला बाहुलीगत नाचवणारे त्यांच्या बोटातले दोर गळून पडतील. जोपर्यंत ते धाडस आपल्यात येत नाही, तोपर्यंत केवळ आरक्षण आहे म्हणून त्यात उडी घेणं आणि मग तडफडत जगणं चुकीचं आहे…आणि ती गोष्ट खूप लांबची आहे. आमदार वगैरेची स्वप्नं मी कधी पाहिलेली नाहीत. शिवाय पार्टीत अशा शेकडो स्त्रिया असतीलच.’’
विद्याने आपलं मन आज खऱया अर्थानं मोकळं केलं. पुरुषांच्या बरोबरीने राहायचं असेल, तर सर्वप्रथम त्यांच्यासारखे गुण आपण आत्मसाद केले पाहिजेत. कोणताही निर्णय घेण्यासाठी भावनिक न होता मानसिकदृष्टय़ा कणखर झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपली मानसिकता बदलली पाहिजे.
(क्रमश:)
– बबन मिंडे