ही निवडणूक म्हणजे अण्णासाहेबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न तर होताच, पण आता तो त्यांच्या अस्तित्वाचाही प्रश्न झाला होता. त्यामुळेच आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांपेक्षा या निवडणुकीला त्यांनी अधिक महत्त्व दिलं. प्रत्येक गावात सभा घेण्याचा सपाटा सुरू केला. कधी नाही ते आपल्या सुनेला-निर्मलाला घेऊन प्रत्येक घरासमोर हात जोडून उभे राहिले. या प्रचाराच्या धुमाळीत अण्णासाहेबच निवडणुकीला उभे असल्याचा भास होत होता. बॅनर, पोस्टर, भिंती अण्णासाहेबांच्या नावाने रंगल्या होत्या. कोपऱयात कुठंतरी निर्मलाचा फोटो नावासह दिसत होता. त्यातही निर्मलापेक्षा ‘मोहिते’ नाव मोठं. त्यातूनच आपलं बदललेलं चिन्ह अधिक मोठं करून लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न.
निर्मलाच्या प्रचारासमोर विद्याचाही प्रचार कुठे कमी पडत नव्हता. प्रकाशने गावोगावी सभा घेतल्या. तालुक्यात विद्याचं साक्षरतेचं काम, तिचा सत्कार या सर्व गोष्टींचं भांडवल करण्याची ही वेळ. प्रकाशने ते चांगलं सांभाळलं. विद्याचा भर मात्र घराघरांत जाऊन तिथल्या माणसांशी आत्मीयतेने बोलण्यावर होता. त्यांच्या मनात बसण्याचा प्रयत्न होता. कारण सभेतली भाषणं तिला अजून तरी मानवत नव्हती. त्याची सवयी झाली नव्हती. स्त्रीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडायला ती अजून तयार नव्हती. म्हणून तर सभेतल्या पुरुषांमध्ये तिचा जीव गुदमरून जायचा. तिला बोलायचं असतं एक आणि प्रकाश तिला बोलायला लावतो एक. सगळंच मनाविरुद्ध.
कधीकधी अलका आणि नंदाही तिच्याबरोबर नसायच्या. मग प्रकाश कुठल्यातरी चार बायका गोळा करून घ्यायचा. मग नटूनथटून येऊन त्या आपल्याच नादात मिरवायच्या. अशा वेळी मात्र सर्व पुरुषांमध्ये विद्याला अगदी नको होऊन जायचं. पण आता त्यात पडलोच आहे तर ते सर्व स्वीकारलंच पाहिजे. म्हणून निमुटपणे सहन करत राहिली.
या सर्व काळात रोहिदास आणि त्याचं युवक मंडळ मात्र कायम विद्याच्या मागं उभं राहिलं. विद्याला मोठा आधार वाटत होता त्याचा! त्या आधारावरच ती हे सर्व करू शकत होती.
गावोगावी हिंडताना अनोळखी पुरुषांच्या अंगभर खिळणाऱया नजरा तिला बाभळीच्या काटय़ासारख्या टोचत होत्या. त्याने तिचा सगळा उत्साह मावळत होता. पण रात्री घरी आली की आपल्या माणसात बसून तिला पुन्हा नवा जोम यायचा. मग पुन्हा प्रचाराचे नवे आराखडे तयार व्हायचे.
प्रचाराचा हा महिना तिला राजकारणातले अनेक धडे देऊन गेला. आरोप-प्रत्यारोपाने घायाळ होऊन पुन्हा उभारी घ्यायला शिकवलं. आपल्याच माणसांची विद्रूप रूपं पाहायला मिळाली. सत्याच्या मार्गाच्या मर्यादा समजल्या, आणि असत्याचा जय दिसला. यातून राजकारण भल्या माणसाचं काम नाही, ते गुंडगिरीचा उच्चांक आहे. हे तिच्या मनावर अगदी घट्ट रुतून बसलं.
सत्ता मिळवण्यासाठी गुंडगिरी आणि नंतर ती टिकविण्यासाठीही गुंडगिरी. सगळंच विचित्र!
सगळीकडं तेच चित्र.
अशा विचित्र अवस्थेत मुठभर गुंड शाबूत राहणार आणि बाकी सामान्य जनता मात्र कायम चांगल्या दिवसाची वाट पाहत, खितपत पडून राहणार आणि एक दिवस मरून जाणार.
असंच जर राहिलं तर मात्र भल्या माणसांचं जगणंच अवघड होऊन बसणार.
विद्या या सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ होत होती. आपला नवरा आपल्याला निवडून आणण्यासाठी जे काही करतो त्याला अप्रत्यक्षपणे जबाबदार आपणच आहोत, म्हणजे गुंडगिरीशी आपणही हातमिळवणी केली आहे, याची तिला खंत वाटत होती. तिचं मन तिलाच खात होतं.
पण आता माघार शक्य नव्हती.
आपली माघार म्हणजे या गरिबांचे रक्त पिण्यास निघालेल्या राक्षसांना वाट मोकळी.
पण आपल्या हाती सत्ता आल्याने समाजाच्या बसलेल्या घडीत कोणता बदल होणार?
इथंसुद्धा तेचं चित्र…
तिच्या डोळ्यासमोर नंदा खाली मान घालून उभी राहिली. काशीबाई विचित्र हसायला लागली.
समाजातलं हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे का? आपल्या एकटीने ते होणार आहे का? नाही. निश्चित नाही. ते एकटय़ादुकटय़ाचं काम नाही. पण म्हणून काय त्यांच्याकडे नुसतं पाहत राहायचं. फार मोठा बदल आपल्याला नाही करता आला, तरी तो बदल होण्याच्या दिशेनं आपण पाऊल तर उचलू.
विद्याला खात्री होती, आपल्याला या गोरगरिबांना काही देता आलं नाही, तरी त्यांच्याकडून काही हिरावूनही घेतलं जाणार नाही.
म्हणूनच तिनं तालुक्याच्या ठिकाणी प्रचाराच्या समारोपाचे भाषण मोठय़ा आत्मविश्वासाने, कोणाच्याही दबावाशिवाय केलं आणि तालुक्यातल्या घराघरांत त्याची चर्चा झाली. प्रतापने दैनिक लोकशाहीमध्ये ते भाषण तिच्या फोटोसह छापलं. त्यातून विद्याचं पारडं निर्मलापेक्षा निश्चितच जड दिसायला लागलं, आणि त्याच विषयाचं चर्वण साऱया तालुकाभर सुरू झालं. मतदारसंघातल्या घराघरांत विद्याचं नाव पोहोचलं. राष्ट्रीय लोकसंघ पार्टीचं मतदारसंघात रुजलेलं चिन्ह आणि वलय हीसुद्धा तिची जमेची बाजू होती. अशा वेळी अण्णासाहेबांचा तालुक्यात दबदबा असतानाही निर्मलासमोर उमेदवार म्हणून चर्चेत राहिली ती विद्याच.
निवडणूक झाली.
अण्णासाहेबांच्या माणसांनी जेवढे करता येतील तेवढे गैरप्रकार याही निवडणुकीत केले. प्रकाश आणि त्याची माणसंही त्याबाबतीत मागं राहिली नाहीत. गैरप्रकाराची मापं दोन्हीकडे समान राहिली. इकडची चार मतं तिकडं, तर तिकडची चार मतं इकडं झाली.
एक वादळ शांत झालं.
विद्या आता पुढची पर्वा न कता आपलं काम पार पाडून शांत बसली. निवडून आली तर पुन्हा वादळाच्या भोवऱयात. अटळ संघर्षांत. त्याची तयारी तिनं ठेवलीच होती. त्यामुळेच तिला निकालाची चिंता नव्हती.
तिच्याभोवती घुटमळणाऱया प्रकाशची अवस्था मात्र अण्णासाहेबांसारखीच झाली होती. दोघंही आपापल्या ठिकाणी अस्वस्थ. स्वार्थाने बरबटलेली त्यांची मनं आता भीतीने थरथरत होती. मृत्यूच्या भयाने कोणाचा थरकाप होणार नाही. मोहिते घराण्याची हार म्हणजे अण्णासाहेब मोहित्यांचा एक प्रकारचा अंतच होता.
एका घराण्याचा अंत आणि दुसऱया घराण्याचा उदय!
आजपर्यंत पाय रोवून बसलेलं घराणं विद्यामुळं उखडलं जाणार आणि ते घडणार केवळ सत्तांतराने!
मग नवं घराणं, नवी माणसं, नवे खेळ, नवी धोरणं..
स्त्री आरक्षणाने घडून येणारी ही सत्तांतराची क्रांती. आरक्षण. मग ते सरकारी असू नाहीतर पार्टी-पक्षाचं.
पण ती क्रांती केवळ सत्तांतरापुरतीच मर्यादित राहणार, का तिच्याकडून सुशासनाची, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेची अपेक्षा बाळगली जाणार? महिला आरक्षणाने राजकारणाचं असं शुद्धीकरण होणार असेल तर त्याचं स्वागतच आहे. पण स्त्री जातीला मागास म्हणून हे आरक्षण दिलं असेल आणि तिच्यातला माणूस जागा असेल तर फुकट जाणार ते. शेवटी बाई ही सुद्धा माणूसच आहे. मग या बाईमाणसातला राजकारणी पुरुषमाणसातल्या राजकारण्यासारखा वागला तर नवल ते काय! विद्याच्या मनात असले विचार येत असले तर त्या खूप पुढच्या गोष्टी होत्या. या सत्तांतराने नवीन विधायक बदल घडून येतोय. की केवळ नवं घराणं निर्माण होतंय ते अजून ठरायचं आहे.
गावपातळीवर सत्तांतराने केवळ घराणी बदलली. गावाची घडी मात्र तशीच राहिली.
आता पुढच्या पातळीचं काय होणार? या उत्सुकतेपोटीच सगळा तालुका निवडणुकीच्या निकालाकडे कान आणि डोळे लावून बसला होता.
(क्रमश:)
– बबन मिंडे