अखेर निकाल लागला.
विद्या जाधव मोठय़ा फरकाने निवडून आली. राजकारणातल्या एका प्रस्थापित  घराण्याचा अंत झाला आणि नवं घराणं जन्माला आलं.
प्रकाशने सगळा तालुकाभर गुलाल उधळला, तर कार्यकर्त्यांनी ढोल-लेझीमने हादरवून सोडला. तालुक्यातली पहिली स्त्री आमदार म्हणून मोठय़ा कौतुकाने तिची मिरवणूक काढली. तिच्याबरोबर प्रकाशही गळाभर हारांचा मानकरी झाला. आपल्या भोवताली एवढी माणसं पहिल्यांदाच पाहून विद्या पूर्ती भांबावून गेली.  आनंद गगनात मावत नाही म्हणजे काय, हे प्रकाश प्रथमच अनुभवत होता. आज त्याचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
विद्या आनंदी होणं साहजिकच होतं, पण तिला जबाबदारीचीही जाणीव होती. आणि म्हणूनच ती अशा आनंदाच्या क्षणीही दबल्यासारखी दिसत होती.

पुढे दोन-तीन महिने मोठय़ा संकोचाने ती कौतुक स्वीकारत राहिली. हारतुऱयातल्या त्या महिन्यात आपण दगडी मूर्तीच झालोत असं तिला वाटायला लागलं. पण त्याला पर्याय नव्हता. येणारी माणसं येतच राहणार होती. सुष्टदुष्ट, शत्रूमित्र… सगळ्यांनाच सांभाळावं लागणार होतं. विद्यापेक्षा प्रकाशनेच ती बाजू चांगली सांभाळली.
हारतुऱयातल्या त्या कौतुकातले दोन-तीन महिने गेले आणि मग विद्याच्या कामाला खऱया अर्थाने सुरुवात झाली.

विद्या शिकलेली,  चार गोष्टींची माहिती असणारी, तरी ती ज्या क्षेत्रात गेली आहे त्यात तिला आपण अडाणी असल्यासारखंच वाटू लागलं. सुरुवातीच्या पाच-सहा महिन्यांत तिला कोणतीच गोष्ट नीट बोलता आली नाही की करता आली नाही. त्यामुळे आपोआपच सगळा कारभार प्रकाशच्या हातात गेला. कोणाच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची? मिटिंगमध्ये काय बोलायचं? आश्वासनं द्यायची किती आणि पाळायची किती, विकासकामे, त्यांचे ठेके, काँन्ट्रक्टर…? असे सगळे निर्णय प्रकाश विद्याला नुसतं नावाला विचारून घेऊ लागला. आजपर्यंत ती आपल्या नवऱयाची राजकारणातील लुडबूड सहन करणाऱया नंदाला बोलत होती. नवऱयाचा अन्याय सहन करते म्हणून तिला दोष देत होती. पण आज तिच्या नकळत तिच्याबाबतीतही तेच घडायला लागलंय. निवडून आली तेव्हा तिनं आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याभोवती एवढी लोकं पाहिली. मनातून इच्छा असतानाही त्या लोकांशी तिला म्हणावं तसं बोलता आलं नाही, वागता आलं नाही. कारण बघावं तेव्हा तिच्या शेजारी प्रकाश. त्यामुळे आलेल्या लोकांचा ताबा तोच घेत असे. साहजिकच राजकारणात लोकांशी थेट संबंध प्रकाशचेच राहिले.
बरं, भेटायला येणाऱया या राजकारणी लोकांचा समज तोच! काय तर राखीव जागा आहे म्हणून केवळ बायकोला उभी केलीये, नाहीतर तिला कुठलं राजकारणातलं काही कळायला. सगळा व्यवहार पाहणार नवराच. त्यामुळे आपोआपच या मानसिकतेमुळे सगळ्यांची पावले तिकडे वळत. त्यांचा तरी काय दोष म्हणा, त्यांना जे दिसतंय, जे अनुभवाला येतंय त्या पद्धतीनेच ते वागणार. विद्याला मात्र हे सगळं कमीपणाचं वाटायचं. निवडून आलोय आपण, आमदार झालोय आपण, पण महत्त्व वाढतंय प्रकाशचं. तो अभिमानानं तालुकाभर मिरवतोय आणि आपण मात्र कोणी बांधून ठेवल्यासारखं घरात बसून राहतोय. असंच राहिलं तर नंदामध्ये आणि आपल्यामध्ये  काय फरक राहिला. उद्या नंदाच्या नवऱयासारखा प्रकाशही आपल्याला बाहुलीसारखी नाचवेल. आपण आमदार राहू नुसतं नावाला. असंच होणार होतं, तर मग आपण कशाला पाहिजे? कोणतीही स्त्री चालली असती की इथं.
विद्या या सगळ्याच गोष्टींच्या विचाराने अस्वस्थ होऊ लागली. पण इतर स्त्रियांपेक्षा वेगळ वागायचं म्हणजे काय करायचं, हे सुद्धा तिला नीटसं समजत नव्हतं. निवडून आल्यापासून सगळा व्यवहार प्रकाश बघतोय. तो सगळा व्यवहार आपण पाहायचा म्हटलं तर त्यातली नीटशी माहिती नाही. कोणतंही काम स्वत: करायला गेलं तर त्याला विचारावं लागणारच.
तिला मोठय़ा कोंडीत सापडल्यासारखं आलं.
सगळा व्यवहार आपला आपणच कसा सांभाळायचा, या विचारात असतानाच एक दिवस तिच्याकडे अलका आली. तिला पाहून विद्याला थोडं हायसं वाटलं. इकडच्या – तिकडच्या चार गोष्टी झाल्या. मग काही मार्ग निघण्याच्या आशेने विद्याने आपली अडचण अलकापुढं मांडली. म्हणाली,
‘‘अलका, निवडून आले पण नुसती नावालाच. सहा महिन्यात एकही काम करण्याचं धारिष्टय़ झालं नाही. यांनी करूनही दिलं नाही. चार लोकांसमोर बोलायचं म्हटलं तरी माझ्या आधी हेच बोलून मोकळे होतात. कोणाशी संपर्कही साधता येत नाही. घरात फोन आहे, हातात मोबाइल आहे पण त्याच्यावरही त्यांचाच ताबा! मी कुणाशी बोलायचं, काय बोलायचं हेसुद्धा तेच ठरवणार.. बरंच कायकाय करण्याच्या विचाराने राजकारणात उतरले, पण काही करता येईल असं वाटत नाही.’’
‘‘आता कळलं ना तुला नंदा अशी का? मनात असताना मीही पंचायत समितीत का काम करू शकत नाही ते. हे पुरुष बायकांच्या शरीराप्रमाणे तिच्या कर्तृत्वावरही हक्क सांगतात, अधिकार गाजवतात. तिचं सर्व काही आपल्यासाठीच आहे, अशी समजूतच झालीये त्यांची. आपल्या बायकोला तिच्या क्षेत्रात मुक्तपणे वावरण्याचा अधिकार असतो हे त्यांना मान्यच नाही. तिचा उपयोग कसा करून घ्यायचा हे मात्र त्यांना चांगल माहीत.’’
अलका पंचायत समितीवर आरक्षणाचा लाभ घेऊन निवडून आलेल्या स्त्रियांची अवस्था बघून बोलत होती. विद्याला मात्र ती एकूणच स्त्रियांची अवस्था वाटत होती. आणि त्या स्त्रियांमध्ये आपणही आहोत याची खंतही वाटत होती. अलकाकडे आता असल्या अनुभवाची कमतरता नव्हती. ती पुढं बोलतच राहिली.
‘‘गावात ग्रामविकास योजना आल्या, त्यात सरपंच म्हणून नंदाने काय काम केलं? काही नाही. योजना कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तिला माहीत नाही. सगळा कारभार बघतो तिचा नवरा. त्याला असल्या योजनांसाठी आपलीच माणसं दिसतात. जनुकाय त्या योजना त्यासाठीच मंजूर होऊन आल्यात. आता विहिरीचंच बघ, नंदाच्या नवऱयाने आपल्या शेतात चार फूट खड्डा घेऊन तो पाण्याने भरला, अधिकाऱयांना बोलवून दाखवला. वीस फूट खोल खोदलाय म्हणून सांगितलं. अधिकारी कशाला पाण्यात उतरून बघतात. झालं विहिरीसाठी पैसे मिळाले. आता  खड्डा बुजायला लागलाय. पैसे गेले नंदाच्या नवऱयाच्या खिशात. संडासाचं तेच. पहिला संडास त्याच्याच परसात. नळ आले ते त्यांच्याच घरासमोर, घरकुल योजनेत तर गरीब राहिले बाजूला. हात ओला करील त्याचीच डाळ शिजत आहे तिथं. आणि हे एवढं चाललंय त्याचा नंदाला काही पत्ता नाही. परवा पंचायत समितीसाठी नव्याने निवडून आलेल्या सदस्यांसाठी पुण्यात कार्यशाळा होती. त्यात सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला. मागे अशीच एक नव्याने निवडून आलेल्या सरपंचांसाठी कार्यशाळा होती. तेव्हा तिला जा म्हटले तर गेली नाही. म्हणाली, हे जाऊन देत नाहीत. अशी नुसती घरात बसून सगळ्या गोष्टींची माहिती होणार आहे का?’’
अलका बोलत होती, पण विद्याच्या मनात मात्र वेगळंच विचारचक्र सुरू झालं होतं. गेली सहा महिने आपणही नंदासारखेच वागत आहोत. तिच्यात आणि आपल्यात कसलाच फरक नाही. आपल्याला तरी कुठं काय माहिती आहे? तालुक्याच्या गरजा, इथल्या योजना, त्या मंजूर करून घेण्याच्या पद्धती… काहीच माहीत नाही. गाडीत बसून विधानसभेत जायचं.  तिथं घाबरत मूग गिळून गप बसायचं आणि परत यायचं. ठेंभा मात्र मिरवायचा विधानसभेत आज अमकं झालं तमकं झालं, अधिवेशनाला जाऊन आले…खरं तर यातलं काय कळतंय आपल्याला.  सगळं प्रकाशच्या ताब्यात. आपण नुसते नावाला. निवडून आल्यापासून किती कागदांवर सह्या घेतल्या. ते कागद वाचण्याचेही आपण कष्ट घेतले नाहीत. मग त्याविषयी विचारणं तर लांबच राहिलं.
तिला एकदम प्रकाशचा सत्ता मिळविण्यासाठीचा आटापिटा आठवला. त्याला प्रत्यक्षपणे ते शक्य झालं नाही, पण आता आपली ढाल करून अप्रत्यक्षपणे त्या सत्तेचा उपभोग घेण्यास त्याने सुरुवात केली आहे.

(क्रमश:)

– बबन मिंडे