12 July 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : विकासकामं आणि राजकारण

गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सदस्य, तहसीलदार, शिक्षण संस्थांचे संस्थापक, अध्यक्ष, सहकारी दूध संघाचे संचालक, काँन्ट्रक्टर... अशा सर्व क्षेत्रातील लोकांशी तिचा प्रत्यक्ष संबंध येऊ

| September 2, 2014 01:15 am

आता कार्यालयात तिचं रोजचं येणं-जाणं सुरू झालं.                                            विद्या कार्यालयात यायला  लागली हे कळल्यावर तालुक्यातील बहुतेक लोक प्रकाशऐवजी तिलाच भेटू लागले. गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सदस्य, तहसीलदार,  शिक्षण संस्थांचे संस्थापक, अध्यक्ष, सहकारी दूध संघाचे संचालक, काँन्ट्रक्टर… अशा सर्व क्षेत्रातील लोकांशी तिचा प्रत्यक्ष संबंध येऊ लागला. आपल्या पार्टीतले कार्यकर्ते, विरोधी पक्षातले कार्यकर्ते यांचे दिसणारे संबंध आणि असणारे संबंध यातील फरक कळू लागला. पंचायत समितीवर अण्णासाहेबांचं वर्चस्व. त्यांचं तालुक्यातलं महत्त्व, त्यामुळे आपल्याला कामं करताना येणाऱया अडचणी. राजकीय मंडळींची सांभाळावी लागणारी मर्जी, त्यांचे हेवेदावे, त्यांच्या अपेक्षा… या सगळ्या गोष्टींची तिला खरी ओळख होण्यास सुरुवात झाली. तिनंही या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिलं. त्या समजून घेतल्या. अनुभवाने तर ती शहाणी होतच होती. पण तरीही कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं याचे अडाखे ती मनाशी बांधू लागली. आणि त्यातूनच तिला आपल्याला कराव्या लागणाऱया व्यापक कामाची ओळख झाली.
या सर्व गोष्टी समजून घेताना प्रकाशने तिला कोठेच अडवलं नाही. पण तिनं डोंगरगावच्या रस्त्याच्या दुरुस्तीचा विषय काढला तेव्हा आतापर्यंत गप्प बसलेला प्रकाश तिच्यावर गरजला. म्हणाला,
‘‘नको त्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. डोंगरगावचा रस्ता चांगला आहे. फक्त पावसाळ्यात पाण्यामुळे दोन-तीन महिने एस.टी. बंद राहील. त्याने फरक पडत नाही.’’
 ‘‘फरक कसा पडत नाही? दोन-तीन महिने त्या अडवळणी गावचा संपर्क तुटतो. वीस किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती आणि मधल्या ओढय़ावर एक पूल, यासाठी पैसे मंजूर झालेले दिसतात…’’
‘‘ते होणारच होते.’’
‘‘मग टेंडर काढून काम सुरू करायला काय हरकत आहे.’’
विद्या एकदम भाबडेपणाने बोलून गेली. तसा तिच्या विचारांची कीव करून बोलल्यासारखा प्रकाश म्हणाला,
‘‘म्हणून तुला म्हणत होतो, या गोष्टी तुला नाही जमायच्या. मी सांभाळतो.’’
‘‘काय झालं?’’
तिनं पुन्हा भाबडेपणाने विचारलं.
तसा तो शांतपणे तिच्या नजरेला नजर देत म्हणाला,
‘‘राजकारणात राजकारण केलं तरच टिकाव धरता येतो. प्रामाणिकपणा करायला गेलीस, तर तांदळातल्या खडय़ासारखी उचलून बाजूला टाकतील तुला. अशी कामं आता खूप करावी लागणार आहेत. ती कशी करायची तेही शिकून घे.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे त्या रस्त्यावर वीस-पंचवीस मुरमाचे ट्रक टाकू. ओढय़ातल्या पुलाची नुसती पडझड झाली आहे. तो सगळा पाडून नवा बांधण्यापेक्षा त्याचीच डागडूजी करून जुन्यांचा नवा करता येईल… आतापर्यंत सगळ्या गावांमध्ये अण्णासाहेब तेच करत आलेत.’’
विद्याला राजकारणातलं हे राजकारण अनोळखी होतं असं नाही. पण आपल्यावर विश्वास टाकलेल्या लोकांच्या भावनांशी इतक्या बेमालूमपणे खेळलं जातं याची कल्पना नव्हती.
राजकारणात राहून-राहून प्रकाशच्या मनाची घडणच तशी झाली होती. म्हणून त्याच्या मनात हा विचार आला असेल. तो त्याच्या स्वभावानुसार वागतोय. जसं मनात तसं कृतीत. पण आपली घडण तशी नाही. आपण त्या जातीचे नाही, याची जाणीव तिला होती.
 म्हणूनच तिनं ठरवलं. आता हे असलं चालून द्यायचं नाही.
 तिने प्रकाशचा विरोध न जुमानता डोंगरगावच्या रस्त्याचं काम चालू केलं. डोंगरगावच्या सरपंचाच्या आग्रहावरून नव्या पुलाच्या भूमिपूजनाला स्वत: गेली. तेव्हा तिथल्या लोकांच्या चेहऱयावरील आनंद पाहून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो याचं आत्मिक समाधान मिळवू शकली.
प्रकाशला मात्र या गोष्टीचा राग येणं स्वाभाविकच होतं. डोंगरगावच्या रस्त्याचं काम त्याने जाणीवपूर्वक मागं टाकलं होतं. पावसाळ्याच्या तोंडावर थोडी डागडूजी करायची आणि पावसाळ्यात पुन्हा रस्त्याचं नुकसान झाल्याचं दाखवून आपली झोळी भरण्याचा त्याचा डाव होता. पण विद्याने त्याचा तो बेत हाणून पाडला.
ती कामात असं लक्ष घालून आपल्याला अडथळा होईल, असं प्रकाशला या अगोदर वाटलं नव्हतं. आमदार जरी ती असली, तरी कारभार आपल्याच हाती असणार याची त्याला खात्री होती. आमदार झाल्यावर सरकारकडून मिळालेल्या गाडीवर तिनं कधीच हक्क दाखवला नाही. अधूनमधून मंत्रालयात, विधानसभेत जाताना जेवढा वापर केला असेल तेवढाच. त्यावेळेसही प्रकाश तिच्याबरोबर. तिथंही कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं, काय बोलायचं…हजार सूचना. पार्टीने महिलांना आरक्षण देत, समानतेच्या नाऱयाचा फायदा घेत मिळवलेली सत्ता. मंत्रिमंडळ. त्यांचे निर्णय. विधानसभेची अधिवेशनं… या सगळ्या ठिकाणीही ती असूनही नसल्यासारखीच. कारण तिथं प्रत्येक ठिकाणी पुढे असतो तो प्रकाश. त्यामुळे गाडीवर हक्क कायम त्याचा. अगदी घरच्यासारखी ती प्रकाशच वापरत राहिला. इथं कुठंच विद्याने त्याला रोखलं नव्हतं.
पण डोंगरगावच्या पुलाच्या भूमिपूजनाला ती गाडी घेऊन गेली, तेव्हा तिच्या लक्षात आलं, की सरकारने दिलेली ही गाडी आपल्यासाठी नसून या लोकांसाठीच आहे. ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे त्या लोकांपर्यंत आपल्याला सहज पोचता यावं यासाठी ती गाडी आहे. तिचा आपण गैरवापर करता कामा नये. पण ती गाडी म्हणजे आपली खासगी मालमत्ता मानत असलेल्या प्रकाशच्या ताब्यातून ती लगेच घेणं तसं अवघडच होतं. आणि त्याला एकदम सर्व बाबतीत  डावलनं तिला पटतही नव्हतं. म्हणून तिनं धिराने, हळूहळू एकेक गोष्ट त्याच्या ताब्यातून घ्यायचं ठरवलं.
ज्याज्या गोष्टींवर प्रकाश अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत होता. त्या सर्व गोष्टी तिनं आपल्या अधिकाराखाली घेतल्या. सर्व निर्णय स्वत: घेऊ लागली. भाषण स्वत:च्या मर्जीनी करू लागली. माणसं पारखू लागली. आणि विद्या आता खऱया अर्थानं आमदार झाली.
तिनं प्रकाशचा हस्तक्षेप थांबवायला सुरुवात केली असली, तरी प्रकाश तिच्या मार्गातून बाजूला झालेला नव्हता. सभासमारंभात तिच्या बरोबर जाणं, भाषणं करणं त्यानं बंद केलं असलं, तरी तिच्या अंतर्गत कारभारावर त्याचं लक्ष होतंच.
विद्याचे अडथळे असले तरी, आलेल्या संधीचा फायदा घेऊन पाच वर्षांत त्याला आपले पाय असे रोवायचे होते, की दहा अण्णासाहेब आले तरी ते उखडू शकणार नाहीत. तालुक्यात असं घराणं निर्माण करण्यासाठी धडपडणारी खूप. पण ते आता उभारण्याचे दिवस प्रकाशला आपल्याकडे वाटतात.

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 32 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : पुढाकार
2 ऑनलाईन मालिका : राजकारणाचं भान आणि वास्तव
3 ऑनलाईन मालिका : धक्का प्रस्थापित राजघराण्याला
Just Now!
X