12 July 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : उपोषण आणि राजकारण

मारहाणीची ही गोष्ट विद्याला नवीनच होती. अशा गोष्टी घडायला लागल्या तर आपल्यासारखीचं अवघड होऊन बसणार. कारण त्याबाबतीत आपण दुबळ्या आहोत. यांच्याशी दोन हात नाही करू

| September 5, 2014 01:15 am

दोन-तीन दिवसांतच विद्याने तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली. जनतेचे नेते असतानाही अण्णासाहेबांनी केवळ स्वत:चा स्वार्थ पाहिला, म्हणून त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे, असं सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणनं आलं. पण विद्याला तो मार्ग योग्य वाटला नाही. तिला खात्री होती, जनतेने आवाज उठवला तर बंधाऱयाची जागा नक्की बदलेल. आणि अण्णासाहेबांचं खरं रूपही जनतेला कळेल. म्हणून काही कार्यकर्त्यांना घेऊन तिनं पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसायचं ठरवलं. तिच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांनीही संमती दिली. तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱयांना तसं निवेदन देऊन तिनं उपोषणाची तारीखही नक्की केली.
लोकशाहीसह सर्वच वर्तमानपत्रांमध्ये उपोषणाच्या आणि बंधाऱयाच्या बातम्या आल्या. बंधाऱयापाठीमागचं सर्व राजकारण जनतेपुढं आलं. तालुकाभर नुसती त्याचीच चर्चा सुरू झाली.
अण्णासाहेबांची तळपायाची आग मस्तकाला गेली. या सर्व घटनांमागे प्रकाशच असला पाहिजे असं समजून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या हातून प्रकाशला एकटय़ाला गाठून बेदम मारहाण केली.
पोलीस केस झाली.
मारहाण करणारे कार्यकर्ते सापडले, पण त्यांनी आपली तोंडं उघडली नाहीत म्हणून अण्णासाहेब वाचले.
मारहाणीची ही गोष्ट विद्याला नवीनच होती. अशा गोष्टी घडायला लागल्या तर आपल्यासारखीचं अवघड होऊन बसणार. कारण त्याबाबतीत आपण दुबळ्या आहोत. यांच्याशी दोन हात नाही करू शकणार. दंडुकेशाहीने ते आपल्याला दाबून टाकण्याची भीतीही तिला वाटायला लागली.
सत्ता  मिळवायला तिला काहीच अवघड गेलं नाही. कशी अगदी अलगद मिळाली! कसलेही कष्ट न घेता.
पण आता ती टिकवणं तिला अवघड वाटू लागलंय. आजच्या प्रकरणाने ती जितकी भेदरली, तितकी या अगोदर कधीच घाबरली नव्हती.
आज प्रकाशला मारहाण. उद्या आपल्यालाही… अशा गोष्टी पुरुषांच्याबाबतीत नवीन नाही. पण आपण पडलो स्त्री. कोणी नुसता हात उचलला तरी आपल्याला सहन होणार नाही. मग त्यावरची चर्चा ऐकूण तर वेड लागायचीच पाळी येणार… या सर्वच गोष्टींच्या कल्पनेने विद्या अस्वस्थ झाली.
प्रकाश केवळ मार खाऊन घेणार नाही, हे तिला माहिती  होतं. वेळ येताच या माराची तो परतफेड करणार. जशास तसं वागून तो आपल्याला आणि आपल्या सत्तेला धक्का पोहोचू देणार नाही याचीही तिला खात्री होती. पण त्यासाठी तिला त्याचा आधार घ्यावा लागणार होता. थोडं त्याच्या मर्जीने वागावं लागणार होतं. आणि नेमकं तेच तर तिनं झिडकारलं होतं.
पण आता स्वत:च्या अस्तित्वासाठी तडजोड करण्याशिवाय दुसरा पर्याय तिला दिसत नव्हता. कारण आता हा खेळ अर्धवट सोडणंही तिच्या हातात नव्हतं.  आणि सोडला तरी ती जनतेची फसवणूकच होती.
मनात आलं अण्णासाहेबांना भाची म्हणून भेटावं. आपल्या नवऱयाला झालेल्या मारहाणीचा जाबही विचारावा, पण पुढच्याच क्षणी तिला त्यांच्यातला राजकारणी पुरुष आठवला. राजकारणात इतकी वर्षे राहून ते पार भावनाशून्य झालेले  आहेत. सत्तेची चटक लागली की नात्याची ओळख राहत नाही. तसं नसतं तर त्यांनी आपल्या नवऱयाला मारण्याचं धाडस केलं नसतं. या सर्व गोष्टींचा विचार करून ती मनातली भीती मनातच दाबत गप्प राहिली.
उपोषणाचा दिवस जवळ येऊ लागला, तशी तिच्या मनातली भीती अधिकच वाढत गेली. प्रकाश मात्र तिला एकदम निश्चिंत दिसत होता. परवापर्यंत तोही उपोषणाला बसायचं म्हणत होता. पण आज त्याने अचानक विचार बदलला. विद्या विचारात पडली. प्रकाशने काही तरी ठरवूनच हा निर्णय घेतला असणार. उपोषणाच्या काळात काही गोंधळ नको म्हणून ती घाबरत होती. त्यातच प्रकाशचं असं वागणं.
ती त्याला अलीकडं काही विचारत नव्हती, त्यामुळे ही गोष्टही विचारता येत नव्हती.
दिवसभर ती प्रकाशने काय ठरवलं असेल, त्याच्या मनात काय आहे याच विचारात होती. पण सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला तो रात्रीच.
पार अंधार पडायच्या वेळेला प्रकाश सतू पहिलवानाला घेऊन आला. बरोबर गावात फिरणारी चार-पाच टारगट पोरंही होती. प्रकाशबरोबर त्यांना बघून विद्याला आश्चर्य वाटलं. प्रकाश काही वाकडं पाऊल उचलण्याच्या विचारात आहे याची तिला खात्री झाली. भीती अधिकच दाट झाली. तिच्या घाबरलेल्या चेहऱयाकडे बघून मग प्रकाशच बोलला. म्हणाला,
‘‘हा सतू, तू ओळखतच आहेस… याच्याबरोबरही अण्णासाहेबांनी गद्दारी केली. पंचायत समितीला संधी देतो म्हणाले होते, पण मध्येच कांबळेसरांना पुढं केलं त्यांनी… आता त्यांच्याबरोबर काम करायचं नाही असं ठरवलंय त्याने… आपल्या पार्टीत येतोय तो. उद्या उपोषणाला बसण्याआधी तो पार्टीत आल्याची घोषणा करायची.’’
विद्या प्रकाशकडे नुसती पाहतच राहिली.
काम झालं असं समजून प्रकाशने सतूला खुणेनेच जायला सांगितलं. आडदांड सतू नुसताच खांबासारखा उभा राहिला होता. प्रकाशने जाण्याची खूण केल्याबरोबर काही न बोलताच तो निघून गेला.
तो दिसेनासा झाल्यावर विद्या प्रकाशला म्हणाली,
‘‘उद्या तुम्ही काय करण्याच्या विचारात आहात?’’
‘‘तुझं उपोषण सुरू होऊन संपेपर्यंत तरी काही करण्याच्या विचारात नाही.’’ प्रकाश शांतपणे बोलला.
‘‘तुम्ही उपोषणाला बसणार होते ना?’’
‘‘हो. पण आता नाही बसणार.’’
‘‘का?’’
‘‘कारण मी उपोषणाला बसलो की तुमचं उपोषण यशस्वी होणार नाही. अण्णा अर्ध्या दिवसात उठवून लावीन तुम्हाला तिथून.’’
‘‘मग बाहेर राहून तुम्ही काय करणार आहात?’’
विद्याने थोडं चिंतेनंच विचारलं.
‘‘काही नाही, सतू आणि मी अण्णांच्या कुत्र्यांना तुमच्या आसपासही फिरकू देणार नाही.’’
सत्तूचं नाव घेताच थोडी चिडून ती म्हणाली,
‘‘हा सतू जिकडं मिळेल तिकडं धावणारा आहे. अण्णासाहेबांच्या भाकरीला जागला नाही, तो तुमच्याशी काय प्रामाणिक राहणार? अशा स्वार्थी लोकांना कशाला जवळ करायचं.’’
यावर प्रकाश थोडावेळ गप्प बसला. आणि मग मनातलं कपट एकदम उघडं करीत म्हणाला,
‘‘तो स्वार्थी असेल, पण आपण तरी कुठं त्याला निस्वार्थीपणे जवळ करतोय! आपल्यालाही आता अशा माणसांचीच गरज आहे. नाही तर फाडून खातील समोरची  लोकं आपल्याला. तेव्हा स्वत:च्या अस्तित्वासाठी अशा गोष्टी राजकारणात कराव्याच लागतात. त्यासाठी सतूसारखी हत्यारं वापरता येतील तोपर्यंत वापरायची आणि गंजली की टाकून द्यायची.’’
बधिर होऊन विद्या प्रकाशचं बोलणं नुसतंच ऐकत राहिली. प्रकाशच्या या अशा गोष्टींना विरोध करण्याची हिम्मत तिला झाली नाही. कारण प्रकाशला रोखलं तर आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार याची तिला कल्पना होती.
विद्याच्या उपोषणाच्या दिवशी सतूने अण्णासाहेबांचा पक्ष सोडल्याची घोषणा केली. त्याच्या अलीकडच्या वागण्यावरून तो असं काही तरी करेल याची चेअरमन आणि पुढाऱयाला कल्पना होती. पण या घटनेचा अण्णासाहेबांना चांगलाच धक्का बसला. राजकारणात अशा गोष्टी नवीन नाहीत. पण तरी आपल्या अन्नावर वाढलेला एक दिवस आपल्यावरच उलटेल याची त्यांनी कल्पना केली नव्हती.
राजकारणातल्या आजच्या तरुण पिढीला झटपट सत्ता पाहिजे. ती मिळविण्यासाठी मग अशी धडपड. निष्ठेने एका जागेवर कधी स्थिर नाही. त्यामुळे सतराशेसाठ पक्ष. सळसळत्या रक्ताचा सतू त्याला अपवाद कसा राहणार!

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 35 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : मायबाप सरकार
2 ऑनलाईन मालिका : स्वार्थ आणि राजकारण
3 ऑनलाईन मालिका : विकासकामं आणि राजकारण
Just Now!
X