15 August 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : राजकारणातील घोटाळे

‘‘आता सगळ्याच गावांतून अशा तक्रारी यायला लागल्यात. अगदी आपल्या जामगावातूनसुद्धा. दोन दिवसांपूर्वी रोहिदास आला होता. विहिरीला मिळणाऱया अनुदानासंदर्भात काहीबाही सांगत होता. सतूने विहिरीसाठी पैसे घेऊन

| September 9, 2014 01:15 am

विद्या या सर्व गोष्टींनी अस्वस्थ होणं साहजिकच होतं. गोरगरिबांसाठी आलेल्या योजनांचा फायदा भलतीच लोकं घेतात याची चीड येणारच. आमदार होण्याआधी विद्या या गोष्टींची तक्रार लगेच करायची. असं करणाऱयांना वेठीस धरायची. आपल्यावर अन्याय होतोय म्हणून लोकांना सावध करायची. साक्षरतेच्या वर्गामधून विकास योजनांविषयी माहिती सांगायची. सध्या गावात कोणकोणत्या योजना आल्यात त्या कोणासाठी आहेत, त्याचा फायदा कसा घ्यायचा या सर्व गोष्टींनी ती भाबडी लोकं सावध व्हायची.
दोन वर्षांपूर्वी जामगावात स्त्रियांना स्वयंरोजगार मिळावा, म्हणून काही गरीब स्त्रियांना मुंबईतल्या एका संस्थेने काही शिलाई मशिन्स भेट दिल्या होत्या. संस्थेची लोकं गावात येऊन सरपंचाच्या हाती त्या मशिन्स सोपवून गेली. तेव्हाही सरपंच होती नंदा. पण कारभार बघत होता तिचा नवरा. त्याने चार मशिन्स मधल्या दोन आपल्याच घरात ठेवल्या. एक चेअरमनच्या पुतणीला आणि एक म्हारवाडय़ात त्याच्यापुढं लाळ घोळणाऱया म्हादाच्या बायकोला. अशी मनाला येईल तशी त्यांची विल्हेवाट लावली.
रोहिदासने विद्याला ही गोष्ट सांगितली तेव्हा सगळा बोभाटा झाला आणि एक दिवस साक्षरतेचे वर्ग सरपंचाच्या दारात जाऊन उभे राहिले. पार अण्णासाहेबांच्या कानावर ही गोष्ट गेली, तेव्हा कुठं त्या मशिन्स चार गरीब स्त्रियांच्या घरात गेल्या.
तेव्हा विद्याने जामगावापुरता आवाज उठवला होता. पण आता तिला फक्त जामगावाकडे बघायचं नव्हतं. सगळ्या तालुक्यावर नजर ठेवायची होती. तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या दु:खाचं, त्यांच्यावर होणाऱया अन्यायाचं निराकरण करायचं होतं.
पण ती आता अजून तरी गप्पा होती. मंजूर झालेल्या विकास योजनांचं काय होतंय, हे तिला कळत होतं. आज तर तिच्या हातात सत्ता होती, अधिकार होते, तरी सुद्धा ती गप्प होती!
आणि याच गोष्टीमुळे ती खरी अस्वस्थ होत होती. सगळं कळत असताना आपण काहीच करू शकत नाही. तोंड शिवल्यासारखे, हात बांधून ठेवल्यासारखे आपण वागत आहोत, याची तिला खंत वाटत होती.
परिस्थितीत काही फरक पडत नसेल तर माझ्या निवडून येण्याला काय उपयोग. उलट अधिकार नसताना, सत्ता नसताना आपण खऱया तळमळीने काम करत होतो. अन्याया विरुद्ध आवाज उठवत होतो.
पण सत्ता आली आणि आपल्यातल्या सच्च्या कार्यकर्तीला तिनं खाऊन टाकली.
माणसाला जर खरंच समाजासाठी काही करायचं असेल तर त्यानं या सत्तेच्या मागेच लागू नये. सत्तेच्या मागे लागल्याने आपली सगळी शक्ती ती सत्ता मिळविण्यात आणि ती टिकविण्यातच खर्ची होते.
आपल्याबाबतीत वेगळं काहीच घडत नाही. आरक्षणाने इथं केवळ सत्तांतर झालंय. सत्तेचा वापर करण्याच्या पद्धतीत काहीच फरक नाही. फक्त शरीरं बदलल्यात. आतली मनं मात्र तीच आहेत. आणि ती केवळ आरक्षणाने बदलू शकत नाहीत.
समाजात खरंच काही क्रांती घडवून आणायची असेल, तर तिथं अशा आरक्षणाचा आणि राखीव जागांचा उपयोग नाही. पन्नास वर्षे मागासवर्गीयांना आरक्षण देऊन काय साध्य झालंय. खऱया मागासांना त्याचा किती फायदा होतोय? आर्थिकदृष्टय़ा सबळ असणारेच केवळ जातीच्या नावाखाली त्याचं भांडवल करताहेत. आणि मागास सगळ्याच जातींमध्ये आहेत. मग द्याचंच असेल तर जातीवर देण्यापेक्षा आर्थिक निकषावरच द्यायला पाहिजे हे आरक्षण. केवळ जातीवर आरक्षण देऊन जात आणखीनच बळकट करत आहे आपण. याचा फायदा घेऊन ठरावीक नेते आपला जातसमूह बळकट करत आहे. यातून समाजात एक गट दुसऱया गटाचा, पर्यायाने जातीचा द्वेषच करत आहे…मग आरक्षणाने साध्य काय होत आहे? संप, मोर्चे… या गोष्टी पाहता त्या आरक्षणाने समाजात दुही माजवण्याची, आपल्या लोकांना आपल्याच लोकांसमोर उभं करण्याची पार्श्वभूमी मात्र चांगली निर्माण केली आहे.
आणि आता हे स्त्रियांचं आरक्षण. त्याने साध्य काय होणार? पुरुषांच्या विरोधात आपल्या हक्कासाठी भांडण्यातच त्यांची सर्व शक्ती खर्च होणार. आरक्षणाच्या फायद्यापेक्षा खुल्या जागेत, खुल्या जागेवर पुरुषांशी टक्कर देऊन मी पुढं जाईल, असं म्हणणारी स्त्री जेव्हा पुढं येईल, तेव्हा खऱया अर्थानं ती मनानं स्वतंत्र झाल्यासारखी वाटेल, मानसिकदृष्टय़ा बदललेली दिसेल. आणि मग अशा स्त्रीकडून काही वेगळी अपेक्षा बाळगणं सार्थ ठरेल.
पण केवळ आरक्षणासाठी  भांडत बसणाऱया स्त्रिया पुरुषांपेक्षा वेगळं असं काहीच करू शकणार नाहीत. उलट त्या केवळ पुरुषांच्या हातातल्या बाहुलं बनून राहतील. मग त्याला माझ्यासारखी काही ठरवून राजकारणात उतरलेली स्त्रीही अपवाद राहणार नाही.
विद्याच्या डोक्यात असे एक ना अनेक विचार सुरू झाले. घरी आली तरी तिच्या डोक्यात हेच विचारचक्र सुरू होतं.
आपण कुठंतरी चुकत आहे, आपण कोणाचा तरी विश्वासघात करत आहे  याची तिच्या मनाला सतत टोचणी लागून राहिली होती. ती रोज ठरवत होती, की आज प्रकाशशी या विषयावर बोलायचं. पण परिस्थिती तिचं तोंड दाबून धरत होती. ज्या लोकांविषयी  तक्रारी होत्या त्याच लोकांना प्रकाशने हाताशी धरलं होतं. आणि त्यांच्याशिवाय राजकारणात तग धरून राहणंही अवघड होतं.
पण तरी आज फणसीच्या त्या माणसाचं बोलणं ऐकूण तिला राहावलं नाही. सहन न होऊन ती प्रकाशला म्हणाली,
‘‘फणसीतून तक्रार आली आहे आज.’’
‘‘काय?’’
‘‘तिथं सदाभाऊ ग्रामविकास योजनेत घोटाळा करायला लागलेत.’’
विद्याने सदाभाऊचं नाव घेतल्यावर प्रकाश एकदम गप्प बसला. तो काही बोलेना म्हणून मग विद्याच पुढं बोलायला लागली. म्हणाली,
‘‘आता सगळ्याच गावांतून अशा तक्रारी यायला लागल्यात. अगदी आपल्या जामगावातूनसुद्धा. दोन दिवसांपूर्वी रोहिदास आला होता. विहिरीला मिळणाऱया अनुदानासंदर्भात काहीबाही सांगत होता. सतूने विहिरीसाठी पैसे घेऊन त्याची गाडी घेतली. फणसीमध्ये सदाभाऊनेही हेच केलंय आणि या मागे तुमचा हात आहे म्हणत होता.’’
प्रकाशला रोहिदासची ही गोष्ट लागणारीच होती. तेव्हा थोडा रागाला येऊनच तो बोलायला लागला. म्हणाला,
‘‘हे बघ विद्या, सत्तेबरोबर आपल्याला दुश्मनही खूप मिळालेत. सत्तेला चिकटूनच येतात ते. यश मिळालं, की त्याच द्वेष करणारे, मत्सर करणारे आपल्यातूनच निर्माण होतात. जितकी जवळीक जास्त तितकी या द्वेषाची तीव्रता अधिक. अशा अवस्थेत राहतील ती आणि मिळतील ती माणसं हाताशी धरण्यात शहाणपणा असतो. त्यासाठी कधीकधी अशा माणसाच्या मनासारखं वागावं लागतं. अगदी मनात नसतानाही! सत्ता टिकवण्यासाठी अशी माणसं दावणीला बांधून त्यांना पोसावी लागतात. सगळंच प्रामाणिकपणे करून नाही भागत. सदाभाऊ, सतू पहिलवान खूप कामाची माणसं आहेत. पुढचा विचार करून त्यांना खूश ठेवणंच हिताचं आहे. त्यासाठी चार लोकांचा रोष पत्करावा लागेल, पण तो एवढा घातक नसतो…’’
प्रकाश बोलतच राहिला. विद्याला हे कुठंतरी ऐकल्यासारखं, पाहिल्यासारखं वाटलं, आणि तिला एकदम अण्णासाहेबांची आठवण झाली.
आपल्या घरातही अण्णासाहेबांचं राजकारण घुसलं आहे. म्हणजे एवढय़ा मोठय़ा सत्तांतराचा उपयोग सामान्य लोकांना काहीच नाही! या बदलाने केवढय़ा अपेक्षा वाढल्या असतील त्यांच्या! पण सगळं पाणी पालथ्या घडय़ावर. आपण असंच वागत राहिलो, तर या गरीब, भोळ्याभाबडय़ा लोकांनी कोणाकडे पाहायचं?

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 37 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : लाभार्थी आणि योजना
2 ऑनलाईन मालिका : उपोषण आणि राजकारण
3 ऑनलाईन मालिका : मायबाप सरकार
Just Now!
X