भारतीय द्विपकल्पीय पठार : भारतीय द्विपकल्पीय पठाराचा सर्वसाधारण आकार अनियमित व त्रिकोणाकृती असून उत्तर भारतातील महामदानाच्या दक्षिणेपासून कन्याकुमारीपर्यंत ही पठारे पसरलेली आहेत. या पठाराची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे १६०० किमी तर पश्चिम पूर्व रुंदी सुमारे १४०० किमी इतकी आहे. भारतीय द्विपकल्पीय पठाराचे प्राकृतिक विभाग पुढीलप्रमाणे होतात- मध्यवर्ती उंचवटय़ाचा प्रदेश, पूर्वेकडील पठार, दख्खनचे पठार, पश्चिम घाट, पूर्व घाट.
मध्यवर्ती उंचवटय़ाचा प्रदेश : मध्यवर्ती उंचवटय़ाच्या प्रदेशात काही पर्वत, टेकडय़ा, पठारे, दऱ्या यांचा समावेश होतो.
अरवली पर्वत : हा भारतातील सर्वात जुना वलित पर्वत आहे. याचा विस्तार दिल्लीपासून उत्तर गुजरात पालमपूपर्यंत पसरलेला आहे. सुरुवातीला अरवली पर्वत उंच होता. आता हवा, पाणी यांचा परिणाम होऊन याचा थोडा भाग शिल्लक राहिला आहे. म्हणून याला रिलिक्ट माऊंटन असेही म्हणतात. अरवली पर्वतरांगेमध्ये सर्वात उंचशिखर गुरुशिखर आहे.
पूर्व राजस्थानच्या उंचवटय़ाचा प्रदेश : अरवलीच्या पूर्वेला राजस्थानच्या उंचवटय़ाचा प्रदेश आहे. या प्रदेशाची उंची २८० ते ५०० मी. इतकी आहे. पूर्व राजस्थानच्या उंचवटय़ाच्या प्रदेशात चंबळ खोऱ्याच्या सखल प्रदेशाचा समावेश होतो. चंबळ नदीचे खोरे म्हणजे भारतामधील अपक्षरण कार्यामुळे होणाऱ्या झीजेचे उदाहरण आहे.
बुंदेलखंड उंचवटय़ाचा प्रदेश : बुंदेलखंड उंचवटय़ाच्या प्रदेशाची उत्तर सरहद्द यमुना नदी तर दक्षिणेस विंध्य पर्वत आहे. यांच्या सीमा वायव्येस चंबळ आणि आग्नेयस पन्ना- अजयगड यांनी निश्चित केलेल्या आहेत.  
माळवा पठार : या पठाराची निर्मिती लाव्हा रसापासून झालेली आहे. बराच भाग काळ्या मुद्रेचा असणाऱ्या या पठाराची पश्चिम-पूर्व लांबी ५३० किमी तर उत्तर दक्षिण रुंदी ३९० किमी इतकी आहे.
विंध्य पर्वत : उत्तरेकडे गंगेच्या गाळाचा मदानी प्रदेश आणि दक्षिणेकडे दख्खनचा पठार यादरम्यान विंध्य श्रेणी आहे. पूर्वेकडे विंध्य पर्वतरांगा भारनेर टेकडय़ांमध्ये विलीन होतात.
छोटय़ा नागपूरचे पठार : भारतीय द्विपकल्पीय पठाराच्या ईशान्येकडील भाग छोटय़ा नागपूरच्या पठाराने तयार झालेला आहे. छोटय़ा नागपूर पठारात झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेशाचा ईशान्य भाग तसेच पश्चिम बंगालचा पुरोलिया जिल्हा यांचा समावेश होतो. या पठाराचे क्षेत्रफळ ८६,२३९ चौ. किमी इतके आहे. या पठारावरून दामोदर सुवर्णरेखा, उत्तर कोयल, दक्षिण कोयल इ. नद्या वाहतात. या प्रदेशांत खनिज संपत्ती मोठय़ा प्रमाणात आढळते म्हणून या पठाराला भारताचे ऱ्हुर असे म्हणतात.
मेघालय पठार : यालाच शिलाँग पठार असेही म्हणतात. हे पठार द्विपकल्पीय पठाराच्या मुख्य भागापासून गारो-राजमहल खिंडीमुळे मेघालय पठारापासून वेगळे झाले आहे. मेघालय पठाराचे क्षेत्रफळ सुमारे ३५,००० चौ. किमी आहे. या पठाराची पश्चिम सरहद्द बांगलादेशासोबत जोडली जाते. या पठारावर गोरा-खाँसी व मिकिर टेकडय़ा आढळतात.
दख्खनचे पठार : दख्खनच्या पठाराची निर्मिती लाव्हा रसापासून झालेली आहे. भारतीय द्विपकल्पीय पठाराचा हा सर्वात मोठा प्राकृतिक विभाग आहे. दख्खनच्या पठाराचे- उत्तर दख्खनचे पठार व  दक्षिण दख्खनचे पठार असे दोन उपविभाग आहेत.
उत्तर दख्खनचे पठार : उत्तर दख्खनच्या पठारात सातपुडा पर्वतरांगा आणि महाराष्ट्राचे पठार याचा समावेश होतो.
=    सातपुडा पर्वतरांगा : यामुळे नर्मदा व तापीचे खोरे परस्परांपासून अलग झाले आहेत. सातपुडा पर्वतरांगेत धुपगड हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. सातपुडा पर्वतरांगेचा पश्चिम भाग हा दख्खनच्या पठाराचा असून या पर्वताची रुंदी २० ते ४० किमी इतकी आहे तर ९०० मी. उंचीपेक्षा जास्त उंचीची काही शिखरे आहेत. उदा. तोरणमाळ (१,१५० मी.), अस्तंभा डोंगर (१,३२५ मी.). सातपुडा पर्वताच्या पूर्व भागास मकल पठार असे म्हणतात.
* महाराष्ट्राचे पठार : सह्य़ाद्रीच्या पूर्वेकडे मंद उताराचा आणि नद्यांच्या खोऱ्यांचा जो प्रदेश आहे, त्याला महाराष्ट्र पठार असे म्हटले जाते. महाराष्ट्र पठारात अजिंठा टेकडय़ा, गोदावरीचे खोरे, अहमदनगर-बालाघाट पठार, भीमा-कृष्णा नदीचे खोरे व महादेव डोंगरांचा भाग या भागांचा समावेश आहे. तापी आणि गोदावरी नदीत जलविभाजक म्हणून अजिंठा टेकडय़ांचा उल्लेख करावा लागेल. अजिंठा टेकडय़ांमध्ये जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या आहेत. गोदावरी ही दख्खनच्या पठारावरील ही सर्वात मोठी नदी आहे.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com