ओशनोग्राफी या विद्याशाखेत सागराचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला जातो. या विद्याशाखेतील उपलब्ध विषयांचा आणि त्यातील करिअर संधींचा आढावा.
ओशनोग्राफी म्हणजे सागराचा अभ्यास. सागराच्या पोटात दडलंय तरी काय, याचे संशोधन करणारी विद्याशाखा म्हणजे ओशनोग्राफी. ओशनोग्राफी हा आंतरशाखीय विषय असून त्यात विज्ञान शाखेतील इतर विषयही अंतर्भूत होतात. विशेषत: प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र आणि अशनीशास्त्र (मीटिऑरॉलॉजी) या शास्त्रांची विविध तत्त्वे ओशनोग्राफीच्या अभ्यासात समाविष्ट असतात. या विषयांच्या अभ्यासाने सागरशास्त्राचा अभ्यास अधिक वस्तुनिष्ठ होतो.
करिअरच्या संधी
सागरशास्त्राचा अभ्यास रंजक असला तरी या विषयाशी संबधित करिअर हे रंजकतेसोबतच आव्हानात्मक असते. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविधांगी संधी मिळू शकतात. यामध्ये विविध प्रकारचे सर्वेक्षण, नमुने गोळा करणे, आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने सागरी माहितीचे विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे आदी बाबींचा समावेश होतो.
o मरिन बायोलॉजी– सागरी जैविक प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास या शाखेत केला जातो. यामध्ये वनस्पती आणि जलचर या दोन्ही घटकांचा समावेश आहे. पर्यावरणीय बदलांचा जीवसृष्टी आणि वनस्पतिसृष्टीवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास यात केला जातो.
o फिजिकल ओशनोग्राफी- सागराचे तापमान, क्षारता, सागरी लाटा, लाटांमधील ऊर्जा, सागर आणि हवेचे संबंध, हवामान, ग्लोबल वाìमग, ओझोन थर आदींचा अभ्यास यात केला जातो.
o जिऑलॉजिकल ओशनोग्राफी- सागरी तळाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. शिवाय सागरतळाची निर्मिती, सागरतळाचा आकार, सागरतळातील पाषाणे, सागरी किनाऱ्यांचे भूगर्भीय- भौतिकी आणि भूगर्भीय गुणधर्म, सागरतळात दडलेल्या धातू आदींचा अभ्यास या ज्ञानशाखेत केला जातो.
o मरिन ऑर्किऑलॉजिस्ट- सागराच्या पोटात दडलेल्या अनेक रहस्यांत प्राचीन काळातील निवासस्थाने, जहाजे, नौका, मानवी सांगाडे, यंत्रसाहित्ये यांचा समावेश होतो. या भूतकाळाचा अभ्यास या शाखेत केले जाते.
o कोस्टल अॅण्ड ओशन इंजिनीअरिंग- किनाऱ्यांचा विकास, बंदरांची बांधणी आणि विकास, देखभाल आदींचा समावेश या शाखेत होतो. स्थापत्य अभियांत्रिकीची ही शाखा आहे.
o मरिन केमिस्ट्री- सागरी जलाची गुणवत्ता आणि त्याची तत्त्वे, सागरी जलातील रसायने, संयुगे यांचा अभ्यास या ज्ञानशाखेत केला जातो. सागरी जलापासून मौल्यवान पदार्थ कसे प्राप्त करता येतील, याचेही संशोधन या शाखेत केले जाते. औद्योगिक कचरा आणि सांडपाण्यामुळे प्रदूषित होणाऱ्या सागरीय जलाच्या शुद्धीकरणाच्या विविध प्रकिया आणि पद्धतींचा अभ्यास यांत केला जातो.
o ‘मरिन पॉलिसी’ तज्ज्ञ- सागरशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे, अर्थशास्त्र यांचा संयुक्त अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. सागर आणि सागर किनाऱ्याच्या सुयोग्य वापरासाठीची मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली तयार करण्याचे काम या विषयातील तज्ज्ञ करतात. या शाखेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने कोणत्याही एका सामाजिक शास्त्राचा अभ्यास केलेला असावा.
o मेडिकल ओशनोग्राफी- या ज्ञानशाखेतील तज्ज्ञांना औषधनिर्मिती कंपन्यांमधील संशोधन आणि विकास विभागात संधी उपलब्ध होऊ शकते.
o पर्यायी करिअर- सध्या मरिन विषयातील तज्ज्ञांना सल्लागार म्हणून कार्य करण्याची संधी मिळू शकते. मरिन पर्यावरण हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे या विषयातल्या तज्ज्ञ/ अभ्यासक/ संशोधकांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो. त्याचे त्यांना चांगले मूल्यही प्राप्त होऊ शकते. विधीविषयक मोठय़ा कंपन्या, विज्ञान पत्रकारिता, मत्स्यालय यांनाही असे तज्ज्ञ लागतात.
० अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या विविध संस्था
o डिपार्टमेन्ट ऑफ मरीन सायन्स, युनिव्हर्सिटि ऑफ कोलकाता (वेबसाइट-www.caluniv.ac.in)- मास्टर ऑफ सायन्स इन मरिन सायन्स. कालावधी- दोन वर्षे.
o स्कूल ऑफ ओशनोग्राफिक स्टडीज- जाधवपूर युनिव्हर्सिटि, कोलकाता- ७०००३२. अभ्यासक्रम- एम. फिल इन ओशनोग्राफी अॅण्ड कोस्टल मॅनेजमेंट. कालावधी- चार सत्रे.
वेबसाइट- http://www.oce-ju.org
o सेन्टर फॉर अॅटमोस्फेरिक अॅण्ड ओशनिक सायन्सेस, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स. बेंगळुरू- ५६००१२, अभ्यासक्रम- एमटेक इन क्लायमेट सायन्स. अर्हता- कोणत्याही विषयातील बीटेक किंवा बीई. वेबसाइट- caos.iisc.ernet.
ईमेल- office@caos.iisc.ernet
o अण्णामलाई युनिव्हर्सिटि- या संस्थेच्या सेंटर ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज इन मरिन बायोलॉजीमध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
* एमएस्सी इन मरिन बायोलॉजी अॅण्ड ओशनोग्राफी
* एमएस्सी इन कोस्टल अॅक्वाकल्चर
* एमएस्सी इन मरीन बायोटेक्नॉलॉजी
* एमएस्सी इन मरिन फूड टेक्नॉलॉजी
* एमएस्सी इन मरिन मायक्रोबायोलॉजी
* एमएस्सी इन मरिन फार्माकॉलॉजी
* एमएस्सी इन मरिन केमिस्ट्री. अर्हता- बीएस्सी
* मास्टर ऑफ ओशन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरूकेला आहे. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये अभ्यास केलेला असावा. पत्ता- अण्णामलाई नगर ६०८००२. तामिळनाडू, वेबसाइट- http://www.annamalaiuniversity.org
ईमेल- info@ annamalaiuniversity.org
o सेंटर फॉर ओशन अॅण्ड कोस्टल स्टडीज, युनिव्हर्सिटि ऑफ मद्रास- अभ्यासक्रम- मास्टर ऑफ सायन्स इन ओशन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी. पत्ता- डेप्युटी रजिस्ट्रार, मद्रास- ६००००५.
वेबसाइट- http://www.unom.ac.in
o डिपार्टमेंट ऑफ मरिन जिऑलॉजी, मेंगलोर युनिव्हर्सिटि- अभ्यासक्रम- एमएस्सी इन मरिन जिऑलॉजी. पत्ता- मंगलागंगोत्री, मेंगलोर- ५७४१९९. वेबसाइट- http://www.mangloreuniversity.ac.in
ईमेल- marinegeology@mangloreuniversity.ac.in
o डिपार्टमेन्ट ऑफ ओशन इंजिनीअिरग, आय आयटी मद्रास, चेन्नई- ६०००६३. वेबसाइट- http://www.oce.ittm.ac.in
ईमेल- headsec@iitm.ac.in
अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (ऑनर्स) इन ओशन इंजिनीअरिंग अॅण्ड नेव्हल आíकटेक्चर आणि बीटेक- एमटेक इन ओशन इंजिनीअरिंग अॅण्ड नेव्हल आर्किटेक्चर (डय़ुअल डिग्री). अर्हता- बारावी विज्ञान शाखा. प्रवेश – जेईई अॅडव्हान्स्डद्वारे.
डॉक्टोरेट ऑफ ओशनोग्राफी
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी ही सागरी विज्ञान क्षेत्रातील शिक्षण – प्रशिक्षण देणारी आणि संशोधन करणारी जगातील महत्त्वाची संस्था होय. ही संस्था केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेत ओशनोग्राफीमधील पीएच.डी.चा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम डॉक्टोरेट ऑफ ओशनोग्राफी या नावाने ओळखला जातो. या संशोधनात्मक अभ्यासक्रमात मरिन बायोलॉजी, मरिन केमिस्ट्री, मरिन जिऑलॉजी आणि जिओफिजिक्स, फिजिकल ओशनोग्राफी, मरिन इन्स्ट्रमेन्टेशन, ओशन इंजिनीअरिंग, मरिन ऑíकऑलॉजी, अर्थ सिस्टीम सायन्स या विषयांचा ढोबळमानाने समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम गोवा, मुंबई, कोचीन, विशाखापट्टणम येथे करता येतो. अर्हता- कोणत्या विषयातील एमएस्सी किंवा बीई किंवा बीटेक किंवा एमए इन मरिन ऑर्किऑलॉजी.
अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इन्स्पायर किंवा सीएसआयआर किंवा यूजीसी किंवा गेट (GATE), JEST यांची फेलाशिप मिळायला हवी. प्रवेशजागा- ३५. ऑनलाइन अर्ज करता येतो. वर्षांतून दोनदा प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीनंतर केली जाते. पत्ता- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्रॉफी, डोना पावला- गोवा. वेबसाइट- http://www.nio.org
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2014 रोजी प्रकाशित
ओशनोग्राफी अर्थात सागराचा अभ्यास
ओशनोग्राफी या विद्याशाखेत सागराचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला जातो. या विद्याशाखेतील उपलब्ध विषयांचा आणि त्यातील करिअर संधींचा आढावा.

First published on: 13-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oceanography the study of all aspects of the oceans